हायपरथायरॉईडीझम – Hyperthyroidism :
हायपरथायरॉईडीझम ही एक थायरॉईडची समस्या आहे. यामध्ये थायरॉईड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती झाल्यामुळे ही समस्या होत असते.
थायरॉईड ही गळ्याच्या ठिकाणी असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. थायरॉईडमधून टेट्रायोडायोथेरोनिन (T4) आणि ट्रायोडायोथेरॉनिन (T3) हे हार्मोन्स तयार होत असतात. आपल्या शरीरातील ऊर्जा नियंत्रित करण्यास आणि ऊर्जा वापरण्यास मदत करण्यासाठी ह्या ग्रंथीतून येणारे हार्मोन्स महत्त्वाचे असतात.
मात्र जेव्हा थायरॉईड ओव्हरएक्टिव्ह होऊन जास्त प्रमाणात T4, T3 किंवा या दोन्हीही हार्मोन्सची जास्त निर्मिती करू लागते तेंव्हा, हायपरथायरॉईडीझमची स्थिती निर्माण होते.
हायपरथायरॉईडीझमची कारणे (Causes of hyperthyroidism) :
अनेक कारणांमुळे हायपरथायरॉईडीझमचा त्रास होत असतो. प्रामुख्याने ग्रॅव्हज डिसीज (Graves’ disease) ह्या ऑटोम्यून्यून डिसऑर्डरमुळे ही समस्या होऊ शकते. हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक आढळतो. या आजाराची कुटुंबात अनुवंशिकता असल्यासही हा आजार होत असतो.
हायपरथायरॉईडीझमची इतर सहाय्यक कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- आहारातून आयोडीनच्या अतिवापरामुळे,
- थायरॉईडला सूज आल्यामुळे,
- स्त्रियांच्या अंडाशयातील किंवा पुरुषांच्या
- टेस्टीज मधील ट्युमर्समुळे,
- थायरॉईड किंवा पिट्यूटरी ग्रंथीतील ट्युमर्समुळे,
- प्रेग्नन्सीतील हार्मोन्समधील बदलांमुळे,
- स्मोकिंग सारख्या व्यसनांमुळे,
- आहारातून किंवा औषधांद्वारे टेट्रायोडायटेरिन हा घटक मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्यामुळे, हायपरथायरॉईडीझमची समस्या होऊ शकते.
हायपरथायरॉईडीझमची लक्षणे (Hyperthyroidism symptoms) :
थायरॉईडमध्ये टी4, टी3 किंवा दोन्हीही हार्मोन्स मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळे शरीरातील मेटाबोलिक रेट वाढतो. याला हायपरमेटाबोलिक स्टेट असे म्हणतात. हायपरमेटाबोलिक स्थितीमुळे हृदय स्पंदने वाढतात, छातीत धडधड होऊ लागते, रक्तदाब वाढतो आणि हात थरथरू लागतात. घाम जास्त प्रमाणात येऊ लागतो.
हायपरथायरॉईडीझममध्ये खालील लक्षणे जाणवू शकतात.
- वजन कमी होणे,
- गळ्याजवळ थायरॉईडची वाढ झालेली असणे,
- छातीत अधिक धडधड होणे,
- अनियमित हृदयाचे ठोके पडणे,
- हातामध्ये कंप सुटणे,
- वारंवार शौचास होणे,
- स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे,
- भूक वाढणे,
- गरम वाटू लागणे,
- घाम अधिक येणे,
- चिंताग्रस्त होणे,
- अस्वस्थ वाटणे,
- अशक्तपणा,
- झोपेच्या तक्रारी सुरू होणे,
- केस गळणे,
- अंगावर पित्त उटणे,
- मळमळ किंवा उलटी होणे,
- डोळे लालसर व कोरडे होणे,
- डोळे मोठे दिसू लागणे, अशी लक्षणे यामध्ये असतात.
खालील लक्षणे जाणवत असल्यास त्वरित दवाखान्यात जावे.
- चक्कर येणे,
- धाप लागणे,
- शुद्ध हरपणे,
- वेगवान, अनियमित हृदयाचे ठोके पडणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांकडे तात्काळ जावे.
कारण हायपरथायरॉईडीझममुळे हृदयविकार, स्ट्रोक (पक्षाघात), एट्रियल फायब्रिलेशन अशा गंभीर समस्या होऊ शकतात.
हायपरथायरॉईडीझमचे निदान असे केले जाते :
पेशंटला होणारे त्रास, लक्षणे व शारीरिक तपासणी करून डॉक्टर हायपरथायरॉईडीझमचे निदान करू शकतात. तसेच निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी ब्लड टेस्ट करावी लागते. या टेस्टला thyroid function test असे म्हणतात. या टेस्टमध्ये TSH, T3 व T4 या थायरॉईड हार्मोन्सचे रक्तातील प्रमाण तपासले जाते.
ह्या टेस्टमध्ये जर, TSH चे प्रमाण कमी असल्यास व T3 किंवा T4 चे प्रमाण जास्त असल्यास हायपरथायरॉईडीझमचे निदान होते. थायरॉईड टेस्टविषयी अधिक माहिती जाणून घ्या..
हायपरथायरॉईडीझमवर हे आहेत उपचार (Hyperthyroidism treatments) :
हायपरथायरॉईडीझमवर औषध उपचार उपलब्ध आहेत. यामुळे हार्मोन्सची लेव्हल नॉर्मल होण्यास मदत होते. यासाठी एक ते दोन वर्षे उपचार घेणे आवश्यक असू शकते. मात्र जर हायपरथायरॉईडीझमच्या समस्येवर वेळीच योग्य उपचार न केल्यास, अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
उपचारामध्ये अँटिथिरॉईड औषधे किंवा रेडियोएक्टिव आयोडीन यासारखी औषधे वापरली जातात. यामुळे थायरॉईडमधून थायरॉक्साइन किंवा ट्रायडोथायटेरिन ह्या हार्मोन्सची अधिक प्रमाणात निर्मिती होणे थांबवले जाते. याशिवाय हार्ट बीट नॉर्मल होण्यासाठी किंवा थायरॉईडला आलेली सूज कमी करण्यासाठीही काही औषधे दिली जातील.
औषध उपचारांनी हायपरथायरॉईडीझमकची समस्या कमी न झाल्यास सर्जरी करून थायरॉईड ग्रंथीच्या प्रभावित भागाला काढून टाकले जाते.
हायपरथायरॉईडीझम आणि आहार:
हायपरथायरॉईडीझमचा त्रास झाल्यास काय खावे, काय खाऊ नये याची माहिती खाली दिली आहे.
हायपरथायरॉईडीझम समस्या असल्यास काय खावे..?
हिरव्या पालेभाज्या, शेंगभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, आयोडीन नसणारे मीठ, धान्ये, कडधान्ये, मसूर, हरभरा, शेंगदाणे, काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, चिकन, मांस, अंड्याचा पांढरा भाग, बांबूचे कोंब, ब्रोकोली, पालक, फ्लॉवर, भेंडी, हळद, मिरी, हिरव्या मिरच्या, मोहरी, बटाटा, मध ह्या पादार्थांचा आहारात समावेश करू शकता.
हायपरथायरॉईडीझममध्ये काय खाऊ नये..?
हायपरथायरॉईडीझमचा त्रास झाल्यावर आयोडीनयुक्त पदार्थ खाणे टाळावे. आहारातील आयोडीनयुक्त मिठाचा वापर टाळावा. तसेच आयोडीन असणारे पूरक औषधे खाणे टाळावे. मीठ लावलेले मासे, झिंगा, कोळंबी, दूध व दुधाचे पदार्थ, अंड्यातील पिवळा भाग, सोया प्रोडक्ट खाऊ नये. याशिवाय कॅफेनयुक्त पदार्थ म्हणजे चहा, कॉफी, सोडा चॉकलेट यांचे प्रमाण कमी करावे. यामुळे छातीत अधिक धडधडू लागते. याशिवाय सिगारेट, तंबाखू, अल्कोहोल ह्या व्यसनांपासून दूर राहावे.
त्याचप्रमाणे नायट्रेट्सयुक्त पदार्थ खाणे कमी करावे. नायट्रेट्समुळे थायरॉईडमध्ये अधिकप्रमाणात आयोडीन शोषले जात असते. यासाठी हायपरथायरॉईडीझम समस्या असल्यास नायट्रेट्सयुक्त पदार्थ खाणे कमी करावे. बीट, गाजर, काकडी, भोपळा, बडीशेप, कोबी ह्यामध्ये नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने हे पदार्थ खाणे टाळा.
महत्वाची बाब म्हणजे वर्षांतून किमान एकदा थायरॉईड टेस्ट करून घ्यावी.
हे सुद्धा वाचा..
हायपोथायरॉईडीझम विषयी माहिती जाणून घ्या..
Read Marathi language article about Hyperthyroidism symptoms, causes and treatments. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.