केळे – Banana :
केळे हे आरोग्यवर्धक व बलदायक असे सर्वांना आवडणारे फळ आहे. बाराही महिने केळी बाजारात उपलब्ध असतात. केळ्यामध्ये 110 कॅलरीज असतात त्यामुळे भूक लागलेली असल्यास केळे खाणे उपयोगी ठरते. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केळी खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.
आरोग्यासाठी केळी खाण्याचे भरपूर फायदे असतात. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. रक्तदाब आटोक्यात राहत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे फायदेशीर असते. केळी खाल्याने मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. केळे खाण्यामुळे एसिडीटी, पित्ताचा त्रास, मळमळ, अल्सर कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते.
केळी खाण्याचे आरोग्यदायी 8 फायदे –
1) केळी हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात ..
केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ह्या दोन्ही घटकांचे मुबलक प्रमाण असते. हे दोन्ही घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. आहारात पुरेसे पोटॅशियम असल्यास हृदयविकाराचा धोका 27% पर्यंत कमी होत असतो. केळ्यात पोटॅशियम भरपूर असते. पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींनी केळी जरूर खावीत. यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित राहिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे एकूणच केळी ही हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
2) केळी खाल्याने पचनक्रिया सुधारते ..
केळ्यात असणाऱ्या फायबर्स आणि प्रीबायोटिक्स घटकांमुळे पचनक्रिया सुधारते. एका केळ्यामध्ये 3 ग्रॅम तंतुमय पदार्थ (फायबर्स) असतात. त्यामुळे केळी खाण्यामुळे नियमित पोट साफ होण्यासाठी मदत होते. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास असल्यास केळे खाल्याने आतड्यांच्या स्नायूंची हालचाल व्यवस्थित होऊन आतड्यात साचलेला मल पुढे ढकलण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता समस्या असल्यास केळी जरूर खावीत.
3) केळी खाल्याने महत्वाची अँटिऑक्सिडंट्स मिळतात ..
केळ्यात फ्लेव्होनॉइड्स आणि अमाइन्स यासारखी अनेक प्रकारची उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स असतात. ह्या अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयविकार तसेच कॅन्सरसारखे डिजनरेटिव्ह आजार होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
4) केळे खाल्याने हाडे मजबूत होतात ..
केळ्यामध्ये कॅल्शिअम आणि मँगॅनीज हे हाडांच्या आरोग्यासाठी गरजेचे असणारे घटक असतात. त्यांमुळे हाडांच्या आरोग्यासाठी तसेच हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टीओपोरॉसीस) हा आजार टाळण्यासाठी रोज एक केळे जरूर खावे.
5) केळी वजन वाढवते तसेच वजन आटोक्यातही ठेवते ..
एका केळ्यामध्ये जवळपास 100 ते 120 कॅलरीज असतात शिवाय अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. त्यामुळे तुम्ही कृश असाल किंवा वजन वाढत नसल्यास आहारात आरोग्यवर्धक व बलदायक असणाऱ्या केळ्याचा समावेश करा. केळी खाल्याने मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. याशिवाय जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल तर तेंव्हाही आपण केळी खाऊ शकता. कारण केळे खाण्यामुळे बराचवेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक कमी लागून वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
6) केळी ही मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात ..
मेंदूच्या विकासासाठी पोटॅशियमची गरज असते, म्हणून वाढत्या वयातील मुलांना केळी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पौष्टिक व सकस आहार म्हणून लहान मुलांना रोज एक केळे खाण्यास द्यावे. केळे खाल्यामुळे जर मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होत असल्यास दुपारच्या वेळेस मुलांना केळे खाण्यास द्यावे.
7) केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते ..
केळ्यामध्ये लोहाचे व व्हिटॅमिन B6 चे प्रमाण मुबलक असल्यामुळे हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी रोज एक केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
8) केळ्यामुळे व्यायामानंतर होणारी झीज भरून काढली जाते ..
व्यायामानंतर शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स घामावाटे निघून जातात. त्यामुळे शरीरात क्षार घटकांचे असंतुलन होते. याचा परिणाम म्हणून मांसपेशीमध्ये गोळे येतात. पायात पेटके येण्याची कारणे अशीच असतात. याला Muscle cramps असे म्हणतात. अशावेळी जर व्यायमापूर्वी तसेच व्यायामानंतर केळे खाल्ले असल्यास पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे क्षार भरून काढण्यास मदत होते. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्समध्ये असंतुलन होत नाही. यामुळे स्नायूमध्ये पेटके येण्याची समस्या होत नाही. त्यामुळे व्यायमापूर्वी तसेच व्यायामानंतर केळे जरूर खावे.
केळी कधी खावी आणि केळी खाण्याची योग्य वेळ कोणती आहे ..?
केळ्याचे फायदे अनेक आहेत मात्र त्या फायद्यांचा शरीरास उपयोग होण्यासाठी केळी ही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. यासाठी केळी कधी खावी आणि केळी खाण्याची योग्य वेळ कोणती याविषयी महत्वाच्या सूचना खाली दिल्या आहेत.
- एका दिवसात एक किंवा दोनच केळी खावीत.
केळे हे एकदम सकाळी उपाशीपोटी किंवा रात्रीच्या वेळी खाऊ नये, कारण यामुळे कफाचा त्रास होण्याची शक्यता असते. - सकाळी उपाशीपोटी केळी खाल्यामुळे पोटात गॅस होणे, पोटदुखी, उलटी, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात.
- केळे खाल्याने मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ नये यासाठी मुलांना केळे हे दुपारच्या वेळेसच खाण्यास द्यावे.
केळी कोणी खाऊ नयेत ..?
सर्दी, खोकला झालेला असताना किंवा दम्याचा (अस्थमाचा) त्रास असल्यास केळी खाऊ नयेत. तसेच मधुमेह असल्यास एकाचवेळी जास्त केळी खाणे टाळावे.
कशाप्रकारे केळी खाऊ नयेत ..?
आयुर्वेदानुसार दूध आणि केळी एकत्र करून खाऊ नये असे सांगितलेले आहे. दूध व केळी एकत्र करून खाणे हे विरुद्ध आहार मानले आहे. त्यामुळे दूध आणि केळी एकत्र करून खाऊ नये.
तसेच, कृत्रिमरीत्या पिकविलेली केळी खाऊ नयेत यासाठी बाजारातून केळी आणताना ती नैसर्गिकरीत्या पिकलेली आहेत की नाही ते पाहावे. शक्यतो थोडी कच्ची असणारी केळी आणावीत. आणि जास्त पिकलेली केळी खाऊ नयेत.
केळी खाण्याचे तोटे व नुकसान –
अधिक प्रमाणात केळी खाल्यास त्यामुळे शरीरास फायदा न होता, नुकसानच होऊ शकते. केळी खाण्याचे तोटे पुढीलप्रमाणे आहेत.
- जास्त केळी खाल्यामुळे पोट बिघडते, पोटात गॅस होणे, पोटदुखी, उलटी, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात.
- केळे अधिक प्रमाणात खाण्यामुळे वजन वाढू शकते.
- मधुमेह रुग्णाची साखर वाढू शकते.
डायबेटीस असल्यास केळी खाऊ शकतो का ..?
मधुमेह असल्यास एखादे केळे जरूर खाऊ शकता. मात्र एकाचवेळी अनेक केळी खाणे टाळले पाहिजे. केळ्यात 14 ग्रॅम साखर असून कर्बोदकेही भरपूर प्रमाणात असतात. केळी खाण्याने रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी केळी खाणे शक्यतो टाळले पाहिजे.मधुमेह असल्यास कोणती फळे खावीत हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
गरोदरपणात केळी खावी का..?
गरोदरपणात केळी खाऊ शकता. केळ्यातील उपयुक्त पोषकतत्वे, व्हिटामिन्स व मिनरल्समुळे बाळाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल शिवाय गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठतेपासूनही दूर राहता येईल. गरोदरपणात कोणता आहार घ्यावा, काय खावे, काय खाऊ नये हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
केळ्यातील पोषक घटक (Nutrition content) :
केळ्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. केळ्यात पोटॅशियम, मँगनीज, लोह, फॉलिक अॅसिड, फायबर्स, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, अल्फा कॅरॉटिन व बीटा कॅरॉटिन ही कॅरॉटिनाइड फायटोकेमिकल्स तसेच स्टार्च व सेल्युलोज अशी कर्बोदके यासारखी आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषकतत्वे केळ्यात मोठ्या प्रमाणात असतात. एका केळ्यात साधारण 110 कॅलरीज असतात.
केळी फॅट आणि कोलेस्टेरॉल फ्री असतात ..
केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या फॅट आणि कोलेस्टेरॉल नसतात त्यामुळे हेल्दी डायटमध्ये केळ्याचा समावेश असतोच. फॅटमुळे चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे यासारख्या समस्या होतात. केळी खाल्याने कोलेस्टेरॉलही कमी होण्यास मदत होते.
केळ्यात पोटॅशियम भरपूर असते ..
एका केळ्यामध्ये 400 mg पोटॅशियम असते. आपल्या शरीराला अनेक खनिज व क्षारांची गरज असते. शरीरासाठी जसे कॅल्शियम महत्त्वाचे असते तसेच पोटॅशियमही गरजेचे असते. मांसपेशी आणि नाड्यांच्या (Nerves) कार्यासाठी पोटॅशियमची गरज असते. पोटॅशियममुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्यामुळे हाय ब्लडप्रेशरच्या त्रासामध्येही केळे उपयोगी ठरते. याशिवाय व्यायामामुळे येणारे muscle cramps किंवा पायात पेटके येणे (पायात गोळा येणे) यासारखा त्रासही पोटॅशियममुळे होत नाही.
केळ्यात व्हिटॅमिन B6 मुबलक असते..
प्रत्येक व्यक्तीला साधारण दोन मिलीग्रॅम इतकी B6 या जीवनसत्त्वाची गरज असते. केळ्यात भरपूर प्रमाणात B6 जीवनसत्त्व असते. एका केळ्यामध्ये दिवसाच्या गरजेपैकी तब्बल 35% व्हिटॅमिन B6 असते. या जीवनसत्वामुळे शरीरात नवीन पेशी निर्माण होण्यास मदत होते. B6 जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी घटते, शरीराची वाढ खुंटते, हात-पायही भरपूर दुखतात. लहान मुलांमध्ये B6 जीवनसत्त्वांचं प्रमाण घटल्यास त्यांना सारख्या फिट्स येतात.
हे सुद्धा वाचा – फणस खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या.
Bananas are a very popular fruit with many potential health benefits. Read Marathi language article about Banana Health Benefits and Side effects. Last Medically Reviewed on March 3, 2024 By Dr. Satish Upalkar.