पाठीत आग होणे –
त्वचा, मांसपेशी किंवा नसा (Nerves) यासंबधी विविध कारणांमुळे पाठीत आग होऊ शकते. पाठीतील मांसपेशी अवघडल्यास किंवा तेथे दुखापत झाल्यास, तेथील मांसपेशीला सूज आल्यास किंवा पाठीतील एखादी नस दबल्यामुळे पाठीत आग होत असते. यावेळी पाठीत आग होण्याबरोबरच पाठीत दुखणे, मुंग्या येणे असे त्रास देखील होऊ शकतात.
पाठीत आग होण्याची कारणे –
- पाठीतील एखादी नस दबली गेली असल्यास त्यामुळे पाठीत आग होऊ शकते.
- पाठीतील मांसपेशी अवघडल्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. तसेच अधिक वेळ पाठ टेकून बसल्याने पाठीत आग होऊ शकते.
- हर्नियेटेड डिस्क, स्पाइनल स्टेनोसिस, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटीस, सायटिका अशा त्रासामुळे पाठीत आग होऊ शकते.
- डायबेटीस, हायपरथायरॉईडीझम, आमवात (Rheumatoid arthritis), मल्टिपल स्क्लेरोसिस, नागीण अशा आजारात पाठीत आग होऊ शकते.
- याशिवाय शरीरातील व्हिटॅमिन-B12, व्हिटॅमिन-D च्या कमतरतेमुळे देखील पाठीत आग होऊ शकते.
पाठीत आग होणे यावरील घरगुती उपाय –
पाठीत आग होत असल्यास पाठीला थंड शेक द्यावा. यामुळे तेथील मांसपेशी सैल होऊन सूज व वेदना कमी होतात. यासाठी बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळून पाठीला शेक द्यावा.
पाठीत आग होत असल्यास तेथे आयुर्वेदिक वेदनाहर तेलाने मसाज करावा. यासाठी महानारायण तेल, निर्गुंडी तेल या आयुर्वेदिक तेलांचा वापर करू शकता.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे..?
पाठीत होणारी आग कमी होत नसल्यास डॉक्टरांकडे जावे. तसेच जर पाठीत आग होण्याबरोबरच हातपाय बधीर होणे, हातापायात कमजोरी जाणवणे, चालताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
Read a Marathi language article about Causes and Treatment of Burning Sensation in Back. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 25, 2024.