पाठीत मुंग्या येणे –
काहीवेळा पाठीत मुंग्या आल्यासारखे होते. यावेळी पाठीत सुया टोचल्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. पाठीत अनेक कारणांमुळे मुंग्या येऊ शकतात. पाठीच्या कण्यातून शरीराच्या विविध भागात नसा (nerves) जात असतात. अशावेळी काही कारणांनी नसांवर दबाव पडल्याने किंवा नसा दुखावल्या गेल्याने पाठीत मुंग्या येत असतात. वारंवार जर पाठीत मुंग्या येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते.
पाठीत मुंग्या येण्याची कारणे –
- नसांवर दबाव पडल्याने किंवा नसा दुखावल्या गेल्याने पाठीत मुंग्या येतात. याशिवाय खालील कारणांनी देखील पाठीत मुंग्या येत असतात.
- पाठीच्या कण्यासंबंधित त्रासामुळे जसे हर्नियेटेड डिस्क, स्पाइनल स्टेनोसिस, फायब्रोमायल्जिया, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटीस, ब्रॅचियल प्लेक्सोपॅथी यांमुळे पाठीत मुंग्या येऊ शकतात.
- वृद्धावस्थेमुळे पाठीत मुंग्या येऊ शकतात.
- डायबेटीस, हायपरथायरॉईझम, आमवात (Rheumatoid arthritis), मल्टिपल स्क्लेरोसिस, नागीण अशा आजारात पाठीला मुंग्या येऊ शकतात.
- शरीरातील व्हिटॅमिन-B12 च्या कमतरतेमुळे पाठीला मुंग्या येतात.
- प्रेग्नन्सीमध्येही काही स्त्रियांना पाठीला मुंग्या येण्याचा त्रास होऊ शकतो.
- सिगारेट, तंबाखू, दारूचे व्यसन यांमुळेही हा त्रास होऊ शकतो.
पाठीत मुंग्या आल्यास जाणवणारी लक्षणे –
पाठीत मुंग्या आल्यास त्याठिकाणी सुन्न होणे, पाठ बधिर होणे, सुया टोचल्याप्रमाणे जाणवणे, पाठीत दुखणे अशी लक्षणे यावेळी जाणवू शकतात.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे..?
पाठीत मुंग्या येण्याबरोबर जर हातपाय अचानक कमजोर झाल्यास किंवा चालताना अडचण येत असल्यास, शौच आणि लघवी यावर कंट्रोल राहत नसल्यास किंवा डोके अतिशय दुखत असल्यास तातडीने दवाखान्यात जाणे आवश्यक असते.
पाठीत मुंग्या का येतात याचे निदान कसे करतात..?
पाठीत मुंग्या कशामुळे येत आहेत याचे निदान करण्यासाठी MRI स्कॅन, CT स्कॅन, मज्जातंतू बायोप्सी, Electromyography (EMG) यासारख्या न्यूरोलॉजिकल तपासण्या केल्या जातात. या तपासणीतून पाठीत मुंग्या का येतात याचे नेमके निदान होण्यास मदत होईल. जेणेकरून त्यावर योग्य उपचार करता येतील.
पाठीत मुंग्या येणे यावरील उपचार –
कारणांनुसार यावरील उपचार ठरतात. जर वारंवार पाठीत मुंग्या येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. पाठीत मुंग्या येण्याचा त्रास अधिक प्रमाणात होत असल्यास न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाचे निदान करून त्यांच्याकडून उपचार घ्या.
जर किरकोळ कारणांमुळे पाठीत मुंग्या येत असल्यास डॉक्टर या त्रासावर Neuropathic painkillers गोळ्या औषधे व व्हिटॅमिन B12 सारखी सप्लिमेंट्स देऊ शकतात. याशिवाय एक्यूपंक्चर, फिजिओथेरपी, मसाज थेरपी याद्वारेही पाठीत मुंग्या येणे यावर उपचार होऊ शकतात.
पाठीत मुंग्या येणे यावर घरगुती उपाय –
पाठीला मुंग्या येत असल्यास आयुर्वेदिक तेलाने पाठीला मसाज करावा. यासाठी तुम्ही महानारायण तेल, निर्गुंडी तेल, अश्वगंधा तेल, धनवंतरम तेल ह्यापैकी कोणत्याही आयुर्वेदिक तेलाचा वापर करू शकता.
पाठीला मुंग्या आल्यास तेथे थोडे खोबरेल तेल लावून हलका मसाज करावा. यामुळे मुंग्या आलेल्या ठिकाणी रक्तप्रवाह वाढून हा त्रास कमी होतो.
पाठीत मुंग्या आल्यास तेथे गरम पाण्याचा शेक द्यावा. या उपायाने तेथील रक्तप्रवाह वाढून आलेल्या मुंग्या दूर होतात.
पाठीत मुंग्या येत असल्यास कपभर पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून ते मिश्रण प्यावे. दालचिनीमध्ये मँगनीज व पोटॅशियम हे पोषकतत्वे भरपूर असतात. त्यामुळेही शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
पाठीत मुंग्या येऊ नये यासाठी काय करावे..?
- बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नका.
- दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा.
- आहारात व्हिटॅमिन-B12 आणि प्रोटीन असणारे पदार्थ असावेत. यासाठी दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश करावा.
- मधुमेह असल्यास ब्लडशुगर कंट्रोलमध्ये ठेवा.
सिगारेट, तंबाखू, दारू अशा व्यसनांपासून दूर राहा.
हे सुध्दा वाचा – डोक्यात मुंग्या येणे याची कारणे व उपाय याची माहिती जाणून घ्या..
Read Marathi language article about Tingling in the back Causes, Symptoms, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.