सफरचंद – Apple :
सफरचंद हे जगभरातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक फळ आहे. सफरचंद आरोग्यासाठी चांगले असून यात विविध पौष्टिक घटक असतात. सफरचंदमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक घटक मुबलक असतात.
सफरचंद हे पौष्टिक फळ असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. वजन आटोक्यात राहते. यातील फायबरमुळे नियमित पोट साफ होते. सफरचंद खाण्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते.
सफरचंद खाण्याचे 5 प्रमुख फायदे –
1) हृदयाच्या आरोग्यासाठी सफरचंद हितकारी असते.
सफरचंदमध्ये असणाऱ्या फायबर ह्या घटकामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. तर यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. पर्यायाने हृदयाच्या आरोग्यासाठी सफरचंद उपयुक्त असते.
2) डायबेटिस रुग्णांसाठी सफरचंद चांगले असते.
सफरचंदातील फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवली जाते. त्यामुळे डायबेटिस रुग्णांसाठी सफरचंद चांगले असते.
3) विविध प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळते.
सफरचंदात असणाऱ्या क्वेर्सेटिन सारख्या अँटीऑक्सिडंट्समुळे विविध प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळते.
4) दम्याचा त्रास कमी होतो.
क्वेर्सेटिन ह्या घटकामुळे दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.
5) वजन आटोक्यात राहते.
सफरचंदातील फायबरमुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
सफरचंद खाण्याचे तोटे व होणारे नुकसान –
सफरचंद खाल्ल्याने काहीजणांना ऍलर्जी होऊ शकते. अधिक प्रमाणात सफरचंद खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते.
सफरचंद संबंधित काही FAQ –
सफरचंद खाताना काय काळजी घ्यावी?
सफरचंदांवर कीटकनाशके फवारली जातात. तसेच त्यावर मेणाचा थर देखील दिलेला असू शकतो. विक्री वाढवण्यासाठी सफरचंद अधिक आकर्षक दिसण्यासाठी बरेच विक्रेते त्यावर मेणाचा किंवा केमिकलचा थर देतात. अशी सफरचंद खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे सफरचंद खाण्यापूर्वी ते कोमट पाण्याने स्वच्छ धुवून मगच खावे.
सफरचंद कसे खावे व कसे खाऊ नये?
कोमट पाण्याने स्वच्छ धुतलेले सफरचंद खावे. तसेच सफरचंद हे सालीसकट खाल्ले पाहिजे. सफरचंद सालीसकट खाल्यास अधिक पोषक घटक मिळतात. याशिवाय बराच वेळ कापून ठेवलेले सफरचंद खाऊ नये. कारण त्यातील पोषकघटक नष्ट झालेले असतात.
सफरचंद कधी खावे?
सफरचंद हे सकाळी किंवा दुपारी खावे. रात्रीच्या वेळी सफरचंद खाणे शक्यतो टाळावे.
सफरचंद कोणी खाऊ नये?
ज्यांना सफरचंदांशी संबंधित ऍलर्जीचा त्रास आहे त्यांनी सफरचंद खाऊ नये. तसेच ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) हा त्रास आहे त्यांनीही सफरचंद खाऊ नये.
मधुमेह रुग्ण सफरचंद खाऊ शकतात का?
मधुमेह रुग्णांसाठी सफरचंद हे फळ उपयुक्त असते. सफरचंदांत असणाऱ्या फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे डायबेटिस असल्यास तुमच्या आहारात सफरचंदाचा जरूर सामावेश करा.
सफरचंद फळातील पोषणतत्वे –
एका मध्यम आकाराच्या सफरचंद मधून खालील पोषक द्रव्ये मिळतात.
कॅलरी : 104
चरबी : 0.3 ग्रॅम
कर्बोदके : 27.6 ग्रॅम
फायबर : 4.8 ग्रॅम
साखर : 20.8 ग्रॅम
प्रथिने : 0.5 ग्रॅम
पोटॅशियम : 214 मिग्रॅ
व्हिटॅमिन सी : 9.2 मिलीग्राम
व्हिटॅमिन ए : 6mcg
हे सुध्दा वाचा – केळे खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about Apple Health Benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.