कोलेस्टेरॉल कमी करणे –
कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा एक मेणासारखा पदार्थ असून शरीराच्या सामान्य क्रियेसाठी ठराविक प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते. कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL कोलेस्टेरॉल) आणि वाईट (LDL कोलेस्टेरॉल) असे दोन प्रकार असतात. रक्तात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्यास हृद्याचे आरोग्य धोक्यात येते.
चुकीचे खानपान, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह, हायपोथारॉईड, मानसिक ताण, आनुवंशिकता, सिगारेट-अल्कोहोल सारखी व्यसने अशा अनेक कारणांमुळे रक्तात वाईट कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढत असते. वाईट प्रकारच्या LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 100 mg/dL पेक्षा जास्त असणे धोकादायक असते. यामुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, हाय ब्लडप्रेशर ह्यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. यामुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण आजकल वाढलेले आहे. म्हणून वाईट कोलेस्टेरॉल कमी करणे गरजेचे असते. यासाठी कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपयुक्त उपाय खाली दिले आहेत.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी 7 सोपे घरगुती उपाय –
1) जवस –
जवस हे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. दररोज 3 चमचे जवसची चटणी जेवणात असल्यास 20% वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. तर हार्टसाठी आवश्यक असे चांगले कोलेस्टेरॉल 15% नी वाढते. तसेच जवसमध्ये हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे जवस खाल्याने हार्ट अटॅक, पक्षाघात येण्याचा धोका कमी होतो. म्हणून कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जवसची चटणी जेवणात जरूर समाविष्ट करावी. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जवसचा उपाय हा खूपच उपयुक्त आहे. जवस खाण्याचे फायदे जाणून घ्या..
2) लसूण –
लसूण खाण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी होते तर चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढते. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते यासाठी दररोज दोन ते तीन लसूण पाकळ्या जरूर खाव्यात. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण फायदेशीर असते. लसूण खाण्याचे फायदे जाणून घ्या..
3) अक्रोड –
दररोज अक्रोड खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि triglycerideची पातळी कमी होण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच अक्रोडमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अक्रोड खाणे हे उपयुक्त असते. अक्रोड खाण्याचे फायदे जाणून घ्या..
4) ऑलिव्ह ऑइल –
ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, ओमेगा-6 फॅटी ऍसिड यांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे ऑलिव्ह तेल खाण्यामुळे चांगले कोलेस्टेरॉल वाढते तसेच वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. त्यामुळे भविष्यात हृदयविकार, पक्षाघात (Strokes) यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
5) मनुके व बदाम –
रात्रभर पाण्यात 10 मनुके व 4 बदाम भिजवत ठेवावेत. सकाळी उठल्यावर भिजलेल्या बदामाची साले काढून ते बदाम व मनुके उपाशीपोटी खावेत. हा घरगुती उपाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगी पडतो.
6) ओमेगा 3 फॅटी ऍसिडयुक्त पदार्थ –
ओमेगा-3 फॅटी ऍसिड हा घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो. यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते तसेच यामुळे हृदयविकाराचा धोकासुध्दा कमी होतो. त्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ऍसिड असणारे पदार्थ म्हणजे सॅल्मन, ट्यूना सारखे मासे, अक्रोड, कॅनोला तेल, सोयाबीन, तीळ तेल यांचा जेवणात जरूर समावेश करावा.
7) व्हिटॅमिन C युक्त फळे –
कोलेस्टेॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी व्हिटॅमिन-C आणि सायट्रिक असिडयुक्त फळे ही अधिक उपयुक्त असतात. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आवळा, संत्री, मोसंबी, लिंबू, डाळींब अशी फळे खावीत.
कोलेस्टेरॉलचे योग्य प्रमाण –
HDL हे चांगले कोलेस्टेरॉल 60 mg/dL पेक्षा अधिक आणि LDL हे वाईट कोलेस्टेरॉल 100 mg/dL पेक्षा कमी असले पाहिजे.
नियमित तपासणीही करून घ्या..
जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशर, लठ्ठपणा, डायबेटिस किंवा थायरॉईड समस्या असे त्रास असल्यास वर्षातून किमान एकदा नियमित कोलेस्टेरॉलची तपासणी करुन घ्यावी. तसेच वयाच्या 20 वर्षानंतर प्रत्येकाने दर पाच वर्षातून एकदा कोलेस्टेरलची लिपिड प्रोफाइल टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे.
हे सुध्दा वाचा – कोलेस्टेरॉल टेस्ट विषयी अधिक माहिती जाणून घ्या.
Read Marathi language article about Home remedies to Reduce cholesterol naturally. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.