Dr Satish Upalkar’s article about Burning Micturition in Marathi.

laghvi la jaljal hone upay in marathi by Dr Satish Upalkar.

लघवीला जळजळ होणे –

काहीवेळा लघवीच्या जागी जळजळ होऊ लागते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने बॅक्टेरियांच्या इन्फेक्शनमुळे लघवीच्या जागेवर जळजळते. ही समस्या स्त्री आणि पुरूष अशा दोघांमध्येही होत असते. मात्र त्यातही लघवीच्या जागेवर जळजळ होण्याचा त्रास स्त्रियांमध्ये अधिक असतो. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी लघवीला जळजळ होण्याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती सांगितली आहे.

लघवीच्या जागी जळजळ का होते ..?

अनेक कारणांनी लघवीच्या ठिकाणी जळजळ होऊ लागते. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • मूत्रमार्गात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे लघवीला जळजळ होते. अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर केल्यास मूत्रमार्गात बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.
  • पाणी कमी पिण्याची सवयीमुळे लघवीच्या जागी जळजळते.
  • वेळच्या वेळी लघवीस न जाणे किंवा बराचवेळ लघवी रोखून धरण्याच्या सवयीमुळे लघवीच्या जागेवर जळजळ होते.
  • वेदनाशामक गोळ्या औषधांच्या परिणामामुळे लघवीची जळजळ होते.
  • ताप, सर्दी, जुलाब, अतिसार किंवा उलट्या अशा आजारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन शरीरात डिहायड्रेशन झाल्यास लघवी कमी होते. अशावेळी लघवीच्या वेळी जळजळ होऊ लागते.
  • लघवीच्या जागी स्वच्छता न राखल्यास त्यामुळेही तेथे जळजळ होऊ लागते.
  • लघवीच्या जागी स्वच्छता ठेवण्यासाठी केमिकलयुक्त साबणाचा वापर केल्याने तेथे जळजळ होऊ लागते.
  • मूतखडा (किडनी स्टोन) असल्यास त्यामुळेही लघवीच्या वेळी जळजळ होऊ लागते.
  • पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीला सूज आल्यास किंवा तेथे इन्फेक्शन झाल्यामुळे लघवी करताना जळजळ होऊ लागते.
  • क्लॅमिडीया (Chlamydia), गोनोरिया, सिफलिस अशा लैंगिक संक्रमित आजारांमुळेही लघवीच्या ठिकाणी जळजळ होते.

अशावेळी लघवी करण्याच्या जागी जळजळ होते. त्याबरोबरच वारंवार लघवीची इच्छा होणे, ताप येणे, लघवीच्या ठिकाणी वेदना होणे असे काही त्रास व लक्षणे यात जाणवू शकतात.

लघवीच्या जागी जळजळ होणे यावरील उपाय –

लघवीला जळजळ होत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिणे हा यावरील सोपा घरगुती उपाय आहे. यामुळे लघवीला साफ होऊन जळजळ कमी होते. त्याचप्रमाणे ताज्या फळांचा रस, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस असे द्रवपदार्थ देखील प्यावेत. तसेच धणे आणि जिरे याचे पाणी पिण्यामुळे लघवीची जळजळ कमी होते. असे घरगुती उपाय लघवीच्या जागी जळजळ होत असल्यास उपयोगी पडतात.

लघवीला जळजळ होत असल्यास काय करावे ..?

1) पुरेसे पाणी प्यावे.

पुरेसे पाणी पिण्यामुळे लघवी साफ होऊन मूत्रमार्गात असणारे बॅक्टरिया लघवीवाटे बाहेर निघून जातात. यामुळे लघवीच्या जागी जळजळ होत असल्यास दिवसभरात वरचेवर पाणी पीत राहावे. एका दिवसात साधारण सात ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.

2) तरल पदार्थ सेवन करावेत.

लघवीची जळजळ होत असल्यास शहाळ्याचे पाणी, ताज्या फळांचा रस, उसाचा रस प्यावा. या तरल पदार्थांमुळे लघवीचे प्रमाण वाढून मूत्रमार्गातील बॅक्टरिया लघवीवाटे बाहेर निघून जातात. त्यामुळे लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.

3) धणे व जिऱ्याचे पाणी प्यावे.

ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा धणे व अर्धा चमचा जिरे मिसळून ते रात्रभर पाण्यात भिजवत ठेवावेत. सकाळी उठल्यावर मिश्रण गाळून घेऊन उरलेले पाणी प्यावे. या आयुर्वेदिक उपायाने लघवीला जळजळ होणे कमी होते.

4) हीटिंग पॅडने ओटीपोटावर शेक घ्यावा.

लघवीच्या जागी जळजळ होत असल्यास ओटीपोटावर गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी करण्यासाठी हा घरगुती उपाय उपयोगी पडतो.

5) व्हिटॅमिन-C युक्त फळे खावीत.

लघवी करण्याच्या जागी जळजळ होत असल्यास आवळा, संत्री, मोसंबी, केळी, कलिंगड, पेरू, किवी ही फळे खावीत. कारण यात व्हिटॅमिन-C मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन-C मुळे लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?

  • घरगुती उपाय करूनही एक-दोन दिवसात लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी न झाल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा.
  • गरोदर स्त्रियांना लघवीच्या जागी जळजळ होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांकडे जावे.
  • लघवीच्या ठिकाणी अतिशय वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
  • लघवीच्या जागी जळजळ होण्याबरोबरच ताप येणे, उलट्या व मळमळ होणे, ओटीपोटात दुखणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

लघवीची जळजळ होणे यावरील उपचार –

मूत्रमार्गात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे लघवीची जळजळ होत असल्यास त्यावर बॅक्टेरीया दूर करण्यासाठी अँटीबायोटिक औषधे दिली जातात. तसेच जर ताप येणे किंवा मूत्रमार्गात वेदना होणे असे त्रास असल्यास त्यासाठीही औषधे दिली जातात.

लघवीच्या जागेवर जळजळ होऊ नये यासाठी काय करावे ..?

  • दिवसभरात पुरेसे म्हणजे किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे.
  • सोडायुक्त कोल्ड्रिंक्स, जास्त आंबट पेये, कॅफिन आणि अल्कोहोल अशी पेये पिणे टाळावे.
  • बराचवेळ लघवी रोखून धरू नये. वेळच्यावेळी लघवीस जावे.
  • मूत्रमार्गाची योग्यप्रकारे स्वच्छता ठेवावी.
  • स्वच्छ व सुती अंडरविअरचा वापर करावा.
  • अस्वच्छ सार्वजनिक स्वछतागृहात जाणे शक्यतो टाळावे.
  • डोकेदुखी, अंगदुखीवरील वेदनाशामक गोळ्या वारंवार खाणे टाळावे.

अशी काळजी घेतल्यास लघवीच्या जागी जळजळ होत नाही.

हे सुध्दा वाचा – मूतखडा होण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..

4 Sources

In this article information about laghvichya jagi jaljal hone or Burning Micturition Causes, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

Medically Reviewed By - Dr. Satish Upalkar
Dr. Satish Upalkar is a Healthcare counsultant. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra University of Health Science, Nashik and is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai.
Qualification: Bachelor of Ayurveda Medicine and Surgery (B.A.M.S.)
Medical Council Registration number: I-72800-A
Contact details -[email protected]
Follow - LinkedIn | Facebook | Twitter | YouTube

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *