पांढरे डाग व कोड – Vitiligo :
पांढरे कोड ह्या त्वचेसंबंधीत समस्येला पांढरे डाग या नावानेही ओळखतात. बऱ्याच जणांना त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या असते. त्वचेला रंग देण्यास आवश्यक असणाऱ्या पेशींमध्ये विकृती निर्माण झाल्याने ही समस्या होते. ह्या पेशींना melanocytes असे म्हणतात. ह्या पेशींमधून मेलॅनीन नावाचे स्किन pigment तयार होत असते. मात्र पांढरे कोडमध्ये त्वचेवरील ठराविक भागातील पेशींमधून हे मेलॅनीन स्किन pigment तयार होत नाही. तेंव्हा त्याठिकाणच्या त्वचेवर पांढरे डाग येतात त्या समस्येला पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात.
पांढरे कोड ही समस्या संसर्गजन्य नाही. एकमेकांच्या संसर्गतून पांढरे डाग होत नाही. पांढरे कोड असणाऱ्या व्यक्तिपासून याचा प्रसार दुसऱ्या व्यक्तीमध्ये होत नाही. कोड असलेल्या व्यक्तीबरोबर राहिल्याने कोड काही निर्माण होत नाहीत. त्यामुळे पांढरे कोडविषयी कोणताही गैरसमज बाळगू नये. हा काही आजार नसून ही केवळ एक त्वचेसंबंधी समस्या आहे.
पांढरे कोड लक्षणे (Symptoms of vitiligo) :
- शरीराच्या काही भागांवर लहान मोठ्या आकाराचे पांढरे डाग येतात.
- प्रामुख्याने सुरवातीला हातापायांची बोटे, ओठ, कोपर, गुडघा येथे डाग येतात.
- डाग आलेल्या ठिकाणी वेदना, खाज वैगेरे त्रास होत नाही. केवळ रंगामध्येच बदल झालेला असतो.
- पांढरे कोड आलेल्या ठिकाणच्या त्वचेचा रंग पांढरा होतो तसेच तेथील केसांचा रंग सुध्दा बदललेला असतो.
- या डागांमुळे प्रखर उन्हामध्ये काहीवेळा त्रास जाणवू शकतो.
कोणत्या भागांवर पांढरे कोड येऊ शकतात..?
मेलॅनीनच्या कमतरतेमुळे त्वचेवर कोठेही असे पांढरे डाग येऊ शकतात. त्यातही प्रामुख्याने हात, पाय, चेहरा, ओठ यामध्ये असे पांढरे डाग आलेले अधिक आढळतात. याशिवाय तोंडाच्या आत, नाकामध्ये, कानामध्ये, लैंगिक अवयव यांवरही असे पांढरे डाग येऊ शकतात.
पांढरे कोड आणि त्याचे प्रकार –
पांढऱ्या डागांच्या आकारानुसार याचे Segmental आणि Non-segmental असे दोन मुख्य प्रकार होतात.
Segmental या प्रकारात त्वचेवर एकाच ठिकाणी व कमी आकाराचे पांढरा डाग येतो. हे अगदी सावकाशपणे पसरत असतात. तर Non-segmental या प्रकारात त्वचेवर अनेक ठिकाणी पांढरे डाग येतात तसेच त्यांचा आकार वाढू शकतो. यामधील पांढरे डाग शरीरभर वेगाने पसरत असतात.
आनुवंशिकतेने पांढरे कोड होतो का..?
आनुवंशिकतेतून एका पिढीडून दुसऱ्या पिढीकडे पांढरे कोड होतात की नाही याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. कारण बऱ्याच लोकांच्या घरातील कोणालातरी पांढरे कोड असूनही त्यांच्या पुढच्या पिढीतील व्यक्तीमध्ये ही समस्या नाही. तसेच आनुवंशिकतेतून पांढरे कोड होण्याचे प्रमाण साधारण तीस टक्के इतके असल्याचे दिसते. त्यामुळे आनुवंशिकतेतून 30% लोकांना पांढरे कोड होऊ शकतात तर उरलेल्या 70% लोकांच्या कुटुंबात ही समस्या असूनही त्यांना मात्र ही समस्या होत नाही.
त्यामुळे असा निष्कर्ष काढता येईल की, कुटुंबात पांढरे कोड ही समस्या असल्यास आनुवंशिकतेतून पुढच्या पिढीत पांढरे कोड होण्याचा धोका काहीप्रमाणात असतो.
पांढरे डाग येण्याची कारणे (Vitiligo causes) :
पांढरे कोड ह्या त्रासाला जेनेटिक दोष प्रामुख्याने कारणीभूत असतात. या समस्येत जनुकामधील बिघाडामुळे त्वचेतील मेलॅनीन तयार करणाऱ्या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. त्यामुळे मेलॅनीनच्या कमतरतेमुळे त्वचेवर पांढरे डाग होतात.
याशिवाय इतर काही ऑटोइम्युन संबधित आजार असल्याससुध्दा पांढरे कोड होण्याचा जास्त धोका असतो. यामध्ये खालील ऑटोइम्युन आजारांचा समावेश होतो.
- स्क्लेरोडर्मा (scleroderma),
- ल्युपस (lupus),
- थायरॉईडायटीस (thyroiditis),
- सोरायसिस,
- चाई (alopecia areata),
- टाईप-1 डायबेटिस,
- pernicious अनेमिया,
- आमवात (rheumatoid arthritis) यासारखे ऑटोइम्युन आजार असल्यास पांढरे कोड होण्याचा धोका वाढतो.
याव्यतिरिक्त प्रखर उन्हामध्ये काम करण्याची सवय, त्वचेवर विषारी केमिकलचा परिणाम झाल्याने तसेच जास्त मानसिक ताण यासारखी कारणे सुध्दा पांढरे डाग ही समस्या होण्यास जबाबदार ठरू शकतात.
पांढरे कोड आणि त्यामुळे होणारे परिणाम –
पांढरे कोड असण्याचा कोणताही विपरीत परीणाम त्या व्यक्तीच्या आरोग्यावर होत नाही. केवळ त्वचेतील रंगामध्ये हा थोडाफार बदल असतो. पांढरे कोड असणाऱ्या व्यक्तींना काहीवेळा उन्हाचा त्रास मात्र जास्त जाणवू शकतो. अशावेळी SPF 30 असणारी सनस्क्रीन त्वचेला आपण लावू शकता.
याशिवाय कोणताही विशेष असा परिणाम आरोग्यावर होत नाही. पांढऱ्या डागांचा परिणाम त्या व्यक्तीचा शरिरापेक्षा मुख्य मनावर अधिक झालेला जाणवतो. तथाकथित सौंदर्याला यामुळे बाधा आल्यासारखे वाटून एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. काही व्यक्तींना चारचौघात मिसळण्याची भीती यामुळे वाटू शकते. विवाहाच्या समस्या येऊ शकतात. यामुळे मानसिक ताण, घुसमट, डिप्रेशन यांना अनेकजण विनाकारण बळी पडतात.
त्यामुळे असा कोणताही न्यूनगंड न मनात बाळगता आत्मविश्वासाने वाटचाल केली पाहिजे. त्वचेवर केवळ काही पांढरे डाग आहेत म्हणून मागे का राहायचे? त्वचेवरील काही डाग तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकतात का? याचा विचार करून सकारात्मकता बाळगून जीवन ‘सुंदर’ बनवण्यासाठी प्रयत्न करावेत.
पांढरे कोड आणि उपचार (Vitiligo treatment) :
पांढरे डागांचे प्रकार त्यांचा आकार यानुसार उपचार अवलंबून असतात. उपचारामध्ये त्वचेवर लावण्यासाठी क्रीम, तोंडातून घेण्यायोगी काही औषधे यांचा समावेश असतो. आज औषध घेतले आणि उद्या ही समस्या लगेच दूर झाली असे यामध्ये होत नाही. त्यामुळे पांढरे कोडवरील कोणत्याही उपचारामध्ये किमान तीन महिन्याचे सातत्य ठेवणे गरजेचे आहे. योग्य उपचारातून पांढऱ्या डागांचा आकार हळूहळू कमी होत असल्याचे आपणास दिसू शकते.
पांढरे डाग व कोड यावरील घरगुती उपाय –
पपई –
पांढरे कोड असणाऱ्या व्यक्तींना पपई खाणे उपयुक्त असते. तसेच कोड असलेल्या ठिकाणी पपईचा गर चोळावा. पांढरे डाग जाण्यासाठी हा उपाय काही दिवस करून पाहावा.
तुळशीची पाने व लिंबू रस –
तुळशीच्या पानांच्या रसात थोडा लिंबू रस मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दररोज पांढऱ्या डागांवर लावावे. पांढरे डाग जाण्यासाठी हा उपाय उपयुक्त आहे.
हळद व मोहरीचे तेल –
हळदीमध्ये थोडे मोहरीचे तेल मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा पांढऱ्या डागांवर 20 मिनिटांसाठी लावावे.
अक्रोड –
पांढरे कोड असणाऱ्या व्यक्तींनी दररोज 4 ते 5 अक्रोड खाणे फायदेशीर असते. अक्रोड खाण्याचे फायदे जाणून घ्या..
तांब्याच्या भांड्यातील पाणी –
रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील ग्लासभर पाणी प्यावे. यामुळे मेलानिनची निर्मिती होण्यास मदत होते. पांढऱ्या डागावर हे सर्व घरगुती उपाय उपयुक्त पडतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या..
पांढरे डाग असणाऱ्यांनी घ्यायची काळजी :
- पोटात जंतांचा, कृमींचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. कारण कृमींमुळेही त्वचेवर पांढरे डाग होत असतात. यासाठी वर्षातून किमान एकदा जंतनाशक औषध आपल्या डॉक्टरांकडून घ्या.
- आंघोळीसाठी केमिकलयुक्त साबण वापरू नका. हर्बल साबण किंवा आयुर्वेदिक उटणे (दिवाळीत लावतो ते उटणे) लावा.
- मऊ, सुती कपडे वापरा.
- टेरिलीनप्रमाणे घाम न शोषणारी कपडे, पायमोजे वापरू नका.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही क्रीम, पावडर यांचा त्वचेवर ‘प्रयोग’ करू नका.
- मानसिक ताण घेऊ नका.
- झिंक, व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा. मटण, चिकन, काजू, बदाम यामध्ये झिंक मुबलक असते तर लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा यात व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते.
Read Marathi language article about Vitiligo causes, symptoms, treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.