केसात चाई पडणे याची कारणे व उपाय (Alopecia Areata in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Chai padne upay, kesat chai padne upchar in Marathi, Alopecia Areata in Marathi information.

डोक्यात चाई पडणे :

केसात चाई पडण्याची तक्रार अनेकांना असते. यामध्ये अचानक एखाद्या ठिकाणचे सर्व केस गळून जातात. केस झडल्यामुळे त्याठिकाणी छोटे-छोटे गोलाकार पॅच निर्माण होतो. काही वेळा केस गेलेल्या ठिकाणी गोलाकार छोटासा खळगाही पडू शकतो. या समस्येला वैद्यकीय भाषेत एलोपेशीया एरेटा (Alopecia Areata) किंवा spot baldness असेही म्हणतात.

चाई ही समस्या डोक्यातील केसांशिवाय भुवयांचे केस, दाढीचे केस, मिशा अशा ठिकाणीही होऊ शकते.
चाईमुळे गळलेले केस काही दिवसांनी पुन्हा उगवून येत असतात. हा आजार 90 टक्के वेळा सेल्फ लिमिटींग म्हणजे आपोआप बरा होणारा असतो. मात्र गेलेले केस त्याठिकाणी परत येण्यासाठी तीन महिने ते काही वर्षेही लागू शकतात.

केसांना चाई लागणे याची कारणे :

चाई पडणे हा एक autoimmune संबंधित आजार असतो. जेंव्हा आपलीचं इम्यून सिस्टम ही आपल्याचं हेयर फॉलिकलवर attack करते तेंव्हा हा त्रास प्रामुख्याने होत असतो. यामुळे अचानक केस गळून जातात. याशिवाय खालील कारणेही यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
• आनुवंशिकतेमुळे,
• हार्मोन्सच्या बदलांमुळे,
• प्रेग्नन्सी, रजोनिवृत्ती (मेनोपॉज) ह्या अवस्थेमध्ये,
• डोक्यातील त्वचेत इन्फेक्शन झाल्याने,
• मानसिक ताणतणाव,
• थायरॉईड प्रॉब्लेममुळे,
तसेच टाईप-1 डायबेटीस किंवा आमवात यासारखे autoimmune आजार असल्यासही चाई पडण्याची समस्या होऊ शकते.

केसात चाई पडणे उपाय :

केसांना चाई लागणे यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय खाली दिले आहेत. या उपायांनी चाईमुळे गेलेले केस लवकर येण्यास मदत होईल.

लसूण, कांदा, आले आणि लिंबू रस –
एक चमचा लसूणचा रस, एक चमचा कांद्याचा रस, एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्रित मिश्रण करावे व चाई पडलेल्या ठिकाणी हे मिश्रण सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा लावावे. दोनही वेळेला ताजे मिश्रण करावे व लावावे. सकाळी केलेले मिश्रण संध्याकाळी लावू नये.

जास्वंदाची पाने व फुले –
चाई लागणे यावर पांढऱ्या जास्वंदाची पाने व फुले एकत्रित बारीक करून त्यांचा रस काढून डोक्‍यास चोळावा. याशिवाय जास्वंदीच्या फुलाचे बारीक तुकडे करुन त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून बारीक पेस्ट करावी आणि ही पेस्ट ज्याठिकाणी चाईमुळे टक्कल पडले आहे त्याठिकाणी चोळावे.

मोहरी व खोबरेल तेल –
मोहरी बारीक वाटून त्यात खोबरेल तेल मिसळून एक दिवस मिश्रण भिजत ठेवावे. त्यानंतर रोज सकाळी व संध्याकाळी हे मिश्रण चाई पडलेल्या ठिकाणी चोळावे. यामुळेही चाईवर लवकर केस उगवण्यास मदत होते.

जमालगोटा बी –
जमालगोटा बी उगाळून फक्त चाई पडलेल्या पॅचवर तीन दिवस लावावी. यामुळेही चाईवर लवकर केस येतात. मात्र जमालगोटा बी उष्ण, तीक्ष्ण गुणांची असल्याने त्याठिकाणी जरा आग होत असते. जमालगोटा बियांना आयुर्वेदात जयपाल बीज असेही म्हणतात.

गुंजा बी –
गुंजा बी उगाळून चाई पडलेल्या पॅचवर तीन दिवस लावावी. यामुळेही चाईवर लवकर केस येतात. गुंजा बी आपणास आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये मिळतील.

चाई आजार आणि आहार –

आयुर्वेदात चाई या आजारास इंद्रलुप्त या नावाने ओळखले जाते. चाई आजार वरचेवर होत असल्यास योग्य आहारही घेणे गरजेचे असते. आयुर्वेदानुसार केसांच्या आरोग्यासाठी आहारातील खारट आणि आंबट पदार्थांचे प्रमाण कमी करावे. आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, बदाम, अक्रोड, मनुका, अंड्यातील पांढरा भाग यांचा समावेश आहारात असावा.

Alopecia Areata: Causes, Symptoms, and Treatment in Marathi.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.