घनदाट केसांसाठी हे करा घरगुती आयुर्वेदिक उपाय – Hair growth tips In Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

केसांची काळजी व केस दाट करण्याचे उपाय :

केस घनदाट, मजबूत आणि लांब असावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र धावपळीचे जीवन, चुकीचा आहार, ताणतणाव यांमुळे आजकाल केस पातळ आणि कमजोर होण्याच्या तक्रारी अनेकांना असतात.

केसांचे आरोग्य हे आपल्या संपूर्ण आरोग्यावरच अवलंबून असते. आपण जर योग्य आहार घेतल्यास, केसांची योग्य काळजी घेतल्यास केस निरोगी, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.

केसांचे आरोग्य धोक्यात आणणारी कारणे :

• वातावरणातील बदल, हवेतील प्रदूषण, धूळ आणि कचरा यांमुळे,
• फास्टफूड, जंकफूड सारखा अयोग्य आहार खाण्यामुळे,
• आहारातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे,
• हार्मोन्सच्या असंतुलनामुळे,
• वाढते वय,
• मानसिक ताणतणाव,
• केसांच्या चुकीच्या स्टाईलमुळे,
• हेअर प्रॉडक्टचा अतिवापरामुळे,
• थायरॉईड आणि PCOS सारखे आजार अशा अनेक कारणांमुळे केसांची योग्यरीत्या वाढ होत नाही त्यामुळे केस विरळ, पातळ होतात आणि कमजोर बनून तुटत असतात.

यासाठी केसांची वाढ होऊन केस दाट करण्याचे आयुर्वेदिक उपाय खाली दिलेले आहेत. या उपायांमुळे तुमचे केस घनदाट, लांबसडक, काळे आणि मजबूत होण्यास मदत होईल. 

केस घनदाट होण्यासाठी हे करा घरगुती उपाय :

ऑलिव्ह ऑइल –
ऑलिव्ह ऑइल मध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड सारखे अनेक पोषक घटक असतात. केस घनदाट आणि मजबूत करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप उपयुक्त ठरते. यासाठी थोडे ऑलिव्ह ऑइल कोमट करून केसांच्या मुळाशी लावावे आणि त्यानंतर भिजलेला टॉवेल 30 मिनिटे केसांना गुंडाळून ठेवावा. हा उपाय आठवड्यातून 3 वेळा केल्यास केस मजबूत आणि घनदाट होण्यासाठी मदत होते.

खोबरेल तेल –
केस दाट होण्यासाठी खोबरेल तेल खूप उपयुक्त ठरते. यासाठी रोज झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना कोमट केलेले खोबरेल तेल लावावे व सकाळी अंघोळ करताना केस नेहमीप्रमाणे धुवून घ्यावेत. यामुळे केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.

एरंडेल तेल –
एरंडेल तेल (कॅस्टर ऑईल) थोडे कोमट करून केसांच्या मुळाना लावावे आणि हलका मसाज करावा. त्यानंतर भिजलेला टॉवेल 20 मिनिटे केसांना गुंडाळून ठेवावा. या आयुर्वेदिक उपायांमुळे केस घनदाट आणि मजबूत होण्यास खूप मदत होते. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय आपण करू शकता.

कांद्याचा रस –
केसांच्या मुळांना कांद्याचा रस लावून हलका मसाज करावा. 20 मिनिटांनी केस शाम्पू करून धुवावेत. केसांच्या वाढीसाठी हा उपाय उपयुक्त ठरतो. यामुळे केस गळणेही कमी होते. केस घनदाट आणि मजबूत बनतात. आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय आपण करू शकता.

बदाम तेल –
रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल केसांच्या मुळांना लावून हलका मसाज करावा आणि उठल्यावर सकाळी नेहमीप्रमाणे केस धुवावेत. बदाममध्ये केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन-E मुबलक असते. त्यामुळे या उपायाने केसांची वाढ होण्यास तसेच केस मजबूत, चमकदार होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय आपण करू शकता.

कोरपडीचा गर –
केसांच्या मुळांना कोरपडीचा गर लावून हलका मसाज करावा. 20 मिनिटांनी केस शाम्पू करून धुवावेत. कोरफडमध्ये केसांसाठी आवश्यक असे अनेक पोषकघटक असतात त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

केसांच्या वाढीसाठी असा घ्या आहार :

केसांच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणेही गरजेचे असते. यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटिन्स अशा पोषकतत्वांनीयुक्त असा आहार घ्यावा. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, बदाम, दूध व दुधाचे पदार्थ, मासे, अंडी यांचा समावेश असावा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

केसांच्या आरोग्यासाठी तळलेले पदार्थ, फास्टफूड, जंकफूड खाणे टाळावे. वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. तसेच सिगारेट, तंबाखू, मद्यपान अशा व्यसनांपासूनही दूर राहावे.

केस दाट करण्यासाठी अशी घ्यावी काळजी :

• केसांच्या वाढीसाठी केसांच्या मुळांना तेल लावावे.
• योग्य आहार घ्यावा.
• केसांची निगा आणि स्वच्छताही ठेवावी. लांब केस असल्यास आठवड्यातून दोन वेळा केस धुवावेत.
• हवेतील प्रदूषण, धूळ, कचरा यापासून केसांना दूर ठेवण्यासाठी प्रवास करताना केस बांधून ठेवावेत.
• तीन महिन्यातून एकदा केसांना ट्रिम करावे. त्यामुळे फाटे फुटलेल्या केसांपासून सुटका होऊन केस चांगले वाढण्यास मदत होते. 
• केस वाळविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नये.
• याशिवाय केसांच्या विविध स्टाईलसाठी हॉट आयरन, ब्लो ड्रायर किंवा केसांना कुरळे करणारे मशीन वारंवार वापरू नका. कारण यामुळे केस अधिक खराब होत असतात.

पांढरे केस काळे करण्यासाठीचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.