स्वादुपिंड – Pancreas :
स्वादुपिंड हा पचनसंस्थेचा एक महत्वाचा अवयव आहे. या अवयवाला English मध्ये Pancreasअसे म्हणतात. स्वादुपिंड डाव्या बाजूला, पोटाच्या मागे आणि लहान आतड्याजवळ आढळते. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इंसुलिन तयार करते.
स्वादुपिंड हा पोटाजवळ असणारा एक अवयव आहे. स्वादुपिंडातून इन्सुलिन आणि इतर महत्त्वाचे एन्झाईम्स आणि हार्मोन्सची निर्मिती होत असते. त्यामुळे स्वादुपिंड अवयवाला ग्रंथी (glands) ही मानले जाते. या अवयवाला आयुर्वेदात अग्न्याशय या नावाने संबोधलेले आहे.
स्वादुपिंडातून येणारे पाचक रस आणि एन्झाईम्स हे लहान आतड्यात पाठवले जातात. लहान आतड्यात ते एन्झाईम्स आणि पाचक रस पोहचून, तेथील अन्नाचे पचन करण्यास मदत होते.
याशिवाय स्वादुपिंड हे इन्सुलिनची देखील निर्मिती करते. त्या इन्सुलिन स्त्रवामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. इन्सुलिन नियंत्रणातील समस्यांमुळे मधुमेह समस्या होत असते. डायबेटिस हा आजार स्वादुपिंडाशी संबधित असतो.
स्वादुपिंड कार्य (Functions of Pancreas) –
स्वादुपिंडाची दोन मुख्य कार्ये आहेत. एक म्हणजे, अन्नाच्या पचनासाठी पाचक रस आणि एन्झाईम्सची निर्मिती करणे हे असते. तर दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे, रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी इन्सुलिनची निर्मिती करणे हे असते.
अन्नातील प्रोटीन्सचे पाचन करण्यासाठी ट्रिप्सिन आणि किमोट्रिप्सिन एंजाइम ची निर्मिती स्वादुपिंडातून होते. अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे पाचन करण्यासाठी अमायलेस एंझाइमची निर्मिती स्वादुपिंडातून होते. अन्नातील फॅटी ऍसिडस्, फॅट्स आणि कोलेस्टेरॉल यांचे पाचन करण्यासाठी लिपेस एन्झाइमचे उत्पादन स्वादुपिंडात होते.
रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा स्वादुपिंडाच्या बीटा पेशी ह्या इन्सुलिन सोडतात. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. अशाप्रकारे स्वादुपिंडाचे महत्वाचे कार्य असते.
स्वादुपिंडाचे विकार –
स्वादुपिंड अवयवाच्या समस्या जेंव्हा होतात तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. जेव्हा स्वादुपिंड मधून पाचक एंजाइम योग्यरीत्या तयार होत नाहीत तेंव्हा अन्नाचे पाचन व्यवस्थित होत नाही. अशावेळी जुलाब, अतिसार अशा समस्या होऊ लागतात.
तसेच स्वादुपिंडाद्वारे जेंव्हा अत्यंत कमी प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होत असल्यास रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे डायबेटिसची समस्या निर्माण होते.
स्वादुपिंड संबधित विकार प्रमुख आजार पुढीलप्रमाणे आहेत.
1) स्वादुपिंडाला सूज येणे –
स्वादुपिंडाच्या नलिकेत अडकलेले लहान पित्त खड्यामुळे तसेच इन्फेक्शन आणि अल्कोहोलचे अतिसेवन अशा कारणांनी स्वादुपिंडाला सूज येते. यामुळे पोटात दुखणे, ताप येणे, मळमळ व उलट्या होणे अशी लक्षणे जाणवतात. यावर वेळीच उपचारांची आवश्यकता असते. कारण यामुळे स्वादुपिंड अवयवाचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढे डायबेटिस सारखे विकार होतात. स्वादुपिंडाला सूज येणे याची कारणे लक्षणे आणि उपचार याची माहिती जाणून घ्या.
2) स्वादुपिंड कॅन्सर –
धूम्रपान, मद्यपान अशा अनेक कारणांनी स्वादुपिंडाचा कर्करोग होऊ शकतो. यामध्ये कावीळ होणे, पोटात वेदना होणे, भूक न लागणे, मळमळ आणि उलट्या होणे,
वजन कमी होणे आणि अशक्तपणा, तेलकट शौचास होणे इ.लक्षणे स्वादुपिंड कॅन्सरमध्ये जाणवू शकतात. स्वादुपिंड कॅन्सर ही जीवघेणी स्थिती असून याचे निदान लवकरात लवकर होऊन वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक आहे. उपचारात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन यांचा समावेश असतो. स्वादुपिंड कॅन्सरची कारणे, लक्षणे आणि उपचार याची माहिती जाणून घ्या.
3) मधुमेह –
टाईप 1 डायबेटिस मध्ये रोगप्रतिकारक शक्तीमधील विकृतीमुळे स्वादुपिंडातील बीटा पेशी नष्ट झाल्याने इन्सुलिनचे उत्पादन थांबते. त्यामुळे टाईप 1 प्रकारचा डायबेटिस होतो. तर टाईप 2 डायबेटिस मध्ये शरीरातील पेशी ह्या योग्यरीत्या ग्लुकोजचे पाचन करीत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढते व त्यामुळे टाईप 2 प्रकारचा डायबेटिस होतो. डायबेटिसची कारणे, लक्षणे आणि उपचार याची माहिती जाणून घ्या.
स्वादुपिंडातील समस्या आणि निदान –
स्वादुपिंडातील समस्या असल्यास त्यावेळी टोमोग्राफी स्कॅन, MRI स्कॅन, अल्ट्रासाऊंड तपासणी, स्वादुपिंड बायोप्सी अशा तपासण्या केल्या जातात. तसेच Amylase आणि Lipase या एन्झाइमचे प्रमाण तपासण्यासाठी ब्लड टेस्ट केली जाते.
स्वादुपिंड निरोगी राहण्यासाठी उपाय –
- सिगारेट, तंबाखू, दारू अशा व्यसनांपासून दूर राहा.
- नियमित व्यायाम करावा, दररोज किमान 30 मिनिटे तरी व्यायामासाठी द्यावीत.
- वजन आटोक्यात राहील याकडे लक्ष द्यावे. वजन कमी करण्यासाठीचे उपाय जाणून घ्या..
- मधुमेह असल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे, योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी याद्वारे मधुमेह नियंत्रित ठेवावा.
- चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
- आहारात विविध भाज्या, फळे यांचा समावेश अधिक असावा.
- शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
- पोटात दुखणे, उलट्या, मळमळ, कावीळ होणे अशी लक्षणे असल्यास आपल्या डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासावर निदान व उपचार करून घ्यावे.
- उठसूट डोकेदुखी, अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या खाणे टाळा.
Read Marathi language article about pancreas meaning, structure & functions. Last Medically Reviewed on February 21, 2024 By Dr. Satish Upalkar.