लहान मुलाला भूक न लागणे :

आपली मुले पुरेसे जेवत नाहीत अशी अनेक पालकांची तक्रार असते. लहान मुले जेवत नसल्यास किंवा मुलाला भूक कमी लागत असल्यास, पालकांना मुलाच्या आरोग्याची चिंता वाटू लागते. मुलाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी वाढत्या वयामध्ये योग्य आहार घेणे आवश्यक असते. मात्र अनेक मुलांना पुरेशी भूक न लागण्याची तक्रार असते.

लहान मुलांमध्ये फास्टफूड, जंकफूड, अतिगोड खाणे किंवा कृमी यामुळे भूक न लागण्याच्या तक्रारी होत असतात. कारण फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स यासारख्या अयोग्य आहारामुळे पोट भरते त्यामुळे जेवण खाताना मात्र भूक लागत नाही. तसेच वरील पदार्थात फायबर्स आणि इतर पोषकतत्वे नसतात त्यामुळे नियमित पोट साफ न होण्याच्या तक्रारी निर्माण होतात. परिणामी पचनसंस्थेचे आरोग्य धोक्यात येऊन लहान मुलांची भूक कमी होत असते.

लहान मुलाची भूक कमी होण्याची कारणे :

मुलाची भूक कमी होण्यासाठी अनेक शारिरीक व मानसिक जबाबदार ठरू शकतात.
• विविध आजारांमुळे मुलाची भूक कमी होऊ शकते. जसे सर्दी, ताप, काविळ, पोटाचे आजार, उलटी, अपचन, बद्धकोष्ठता, अशा अनेक आजारांत भूक कमी होते.
• मुलाला कृमींचा त्रास असल्यास, पोटात जंत झाल्यास त्यामुळेही मुलाची भूक कमी होते.
• मानसिक कारणांमध्ये ताणतणाव, भीती, डिप्रेशन यांमुळे भूक कमी होत असते. अभ्यासाच्या ताणामुळे किंवा परीक्षेच्या तणावामुळे मुलाला भूक न लागण्याची समस्या होऊ शकते.
• न आवडणारे पदार्थ बळजबरीने खावे लागत असल्यानेही मुलाची भूक कमी होते.
• अपुरी झोप झाल्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. पुरेशी झोप न मिळाल्यास दिवसभर सुस्ती येते, चिडचिड वाढते आणि थकवा येतो परिणामी भूक न लागण्याची तक्रार सुरू होते. 
• अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, चॉकलेट, बिस्किटे, चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, चहा-कॉपी पिण्यामुळे पोट आधीच भरल्यामुळे जेवताना भूक लागत नाही.

लहान मुलांची भुक वाढवण्यासाठी हे करा उपाय :

मुलाला आवडीचे पदार्थ खाऊ घालावेत –
मुलाला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालावेत. रोजरोज एकसारखी भाजी खाऊन मुलांना कंटाळा येऊ शकतो. यासाठी वरचेवर नवीन पदार्थ मुलांना खाऊ घालावेत.

मुलांच्या बाहेरच्या खाण्यावर लक्ष ठेवावे –
अनेकदा लहान मुले ही दिवसभरात चॉकलेट, बिस्किटे, केक, स्नॅक्स, चिप्स, फरसाण वैगरे पदार्थ खात असतात. त्यामुळे अशा पदार्थांनी आधीच पोट भरल्यामुळे जेवताना भूक लागत नाही. अशावेळी ते जेवण खाण्यास कंटाळा करतात. त्यामुळे लहान मूल दिवसभरात काय खाते याकडेही लक्ष द्यावे. मुलाला जेवताना भूक लागत नसल्यास काही दिवस त्याला फास्टफूड, बिस्किटे, चॉकलेट, स्नॅक्स असे पदार्थ देणे टाळावे.

मुलाला बाहेर खेळण्यास पाठवावे –
मैदानी खेळ खेळण्यामुळे मुलाचा व्यायाम होतो व खाल्लेल्या आहाराचे योग्यप्रकारे पचन होण्यास मदत होते. त्यामुळे खेळून भागून आल्यावर मुलाला चांगलीच भूक लागते! त्यामुळे मुलाच्या व्यायामाकडे लक्ष द्यावे. सकाळी व संध्याकाळी त्याला फिरण्यास घेऊन जावे, मैदानी खेळ, दोरीउड्या, पळणे, सायकल चालवणे असे व्यायाम मुलाला करू द्यावेत.

लहान मुलांच्या भूक वाढीसाठी औषधे :

लहान मुलाची भूक वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने टॉनिक देता येईल. मुलाचे वय 6 वर्षापेक्षा जास्त असल्यास त्याला झंडू पंचारिष्ट हे आयुर्वेदिक औषधही भूक वाढवण्यासाठी देता येऊ शकते.

मुलाला भूक लागत नसल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?

बहुतेकवेळा लहान मुलांना भूक न लागणे हे फारसे चिंताजनक बाब नसते. मात्र मुलाची भूक कमी होण्याबरोबरच जर त्याचे वजनही कमी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत.

हे सुद्धा वाचा..
मुलाला कृमी व जंताचा त्रास असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोग्याचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटन क्लिक करा व आमचे YouTube चॅनल Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.