डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे व त्यावरील उपाय – Reason of Eye dark circle in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे :

डोळ्याखाली काळे वर्तुळे येण्याची समस्या बऱ्याच स्त्रीया आणि पुरुषांना असते. डोळ्याखाली आलेल्या काळ्या वर्तुळांचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होत असतो. डोळ्याभोवती काळे वर्तुळं असल्यास आपण जास्तचं वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. यासाठी येथे डोळ्याखाली काळी वर्तुळे का व कशामुळे येतात, त्याची कारणे व त्यावरील उपाय दिले आहेत.

डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे :

डोळ्याखाली गडद काळी वर्तुळे होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात.
• शारीरिक थकवा, अशक्तपणा,
• आजारपणामुळे,
• जास्त काळ झोपणे किंवा अपुरी झोप घेण्यामुळे,
• मानसिक ताणतणाव,
• हार्मोनल बदलांमुळे,
• चहा, कॉफी यांच्या अधिक सेवनाने,
• उन्हात अधिक वेळ फिरणे,
• वाढते वय,
• आनुवंशिकता अशा कारणांमुळे प्रामुख्याने डोळ्याखाली काळी वर्तुळं येत असतात.

याशिवाय मोबाईल, संगणक, टिव्ही यांच्या अतिवापरामुळे आपल्या डोळ्यांवर अधिक प्रमाणात ताण येत असतो. या ताणामुळे डोळ्याभोवतीच्या रक्तवाहिन्या मोठ्या होऊन आपल्या डोळ्याभोवतालची त्वचा काळी होऊ शकते.

डोळ्याखालील काळी वर्तुळे असे करा कमी :

पुरेसे पाणी प्यावे –
डिहायड्रेशन झाल्यामुळेही डोळ्याभोवती काळे वर्तुळं होत असतात. यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. साधारण दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे यामुळे काळ्या वर्तुळांचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.

बटाट्याचा रस –
बटाटा बारीक किसून त्याचा रस काढून तो काळ्या वर्तुळाभोवती लावावा. याशिवाय बटाटाच्या चकत्या डोळ्यांवर 10 मिनिटे ठेव्याव्यात. त्यानंतर चेहरा गार पाण्याने धुवावा. हा उपाय नियमित काही दिवस केल्यास डोळ्याखालचे काळी वर्तुळे कमी होतील.

लिंबाचा रस व बटाटा –
लिंबाच्या काही थेंबांमध्ये बटाट्याचा रस मिसळावा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लावल्यास काळी वर्तुळे लवकर दूर होण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

लिंबाचा रस आणि टोमॅटो –
लिंबू आणि टोमॅटोचा रस एकत्र करावा आणि या मिश्रणानं डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळावर मसाज करावा. वीस मिनिटानंतर चेहरा गार पाण्याने धुवावा. हा उपाय नियमित काही दिवस केल्यास डोळ्याखाली असणारे काळे वर्तुळं कमी होतील.

कोल्ड टी-बॅग –
वापरलेली टी-बॅग किंवा चहाचा चोथा कापडात गुंडाळून ते फ्रीजमध्ये ठेवावे. थोड्या वेळाने, ती थंड टी-बॅग डोळ्यावर 10 मिनिटे ठेवावी. असे दररोज केल्यास काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होईल.

डोळ्याखाली काळे वर्तुळं होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

• काळी वर्तुळे होऊ नये यासाठी पुरेशी झोप घ्यावी,
• पुरेसे पाणी प्या,
• चहा, कॉफी वारंवार पिणे टाळावे,
• मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांचा मर्यादित वापर करा,
• उन्हात फिरताना गॉगल किंवा छत्रीचा वापर करावा. अशी काळजी घेतल्यास डोळ्याखाली काळी वर्तुळे होण्याची समस्या निश्चितच कमी होईल.