फणस – Jackfruit :
फणस खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षारघटक व अँटीऑक्सिडंट्स असतात. फणसाचे गरे चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायी सुध्दा असतात.
फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, मांसपेशी व हाडे मजबूत होतात. अल्सरचा त्रास फणस खाल्याने कमी होतो. डायबेटिस रुग्ण देखील फणस खाऊ शकतात.
फणस खाण्याचे आरोग्यदायी 9 फायदे :
1) फणासातून महत्वाची अँटीऑक्सिडंट्स मिळतात ..
फणसात Carotenoids, Flavanones अशी महत्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 डायबेटीस आणि डोळ्यांच्या मोतीबिंदूसारख्या समस्या होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
2) फणसात फायबरचे मुबलक प्रमाण असते..
फणसामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने ज्यांना कॉन्स्टिपॅशनचा किंवा पोट साफ न होण्याचा त्रास आहे त्यांनी फणसाची भाजी किंवा फणसाचे गरे आवर्जून खावेत.
3) फणस खाणे अल्सरमध्ये उपयुक्त असते ..
अल्सरचा त्रास असलेल्या रुग्णांनी फणस जरूर खावा. यात असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे जठरातील अल्सरच्या जखमा भरून येण्यास मदत होते.
4) फणस डायबेटीसमध्येही फायदेशीर असतो ..
फणस गोड असूनही इतर फळांच्या तुलनेत फणसाचे पचन हळूहळू होत असते. त्यामुळे इतर फळांच्या तुलनेत फणस खाल्याने एकाएकी ब्लडशुगर वाढत नाही. म्हणूनच फणसाचा glycemic index (GI) हा अतिशय कमी असल्याने फणस हा डायबेटीसमध्ये फायदेशीर असतो. याशिवाय यात असणाऱ्या फायबर्समुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते.
5) फणस खाल्याने रक्तदाब आटोक्यात राहतो ..
ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी फणस खाणे उपयुक्त आहे. कारण फणसात असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. तसेच
6) फणस हा हृदयासाठी उपयुक्त आहे ..
फणसातील फायबर्स, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्समुळे
रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो.
7) फणसामुळे हिमोग्लोबिन वाढते ..
हिमोग्लोबिन कमी असलेल्यानी फणस जरूर खावा. कारण फणसात लोहाचे भरपूर प्रमाण असते. यामुळे ऍनिमिया, अशक्तपणा व थकवा दूर होण्यास मदत होते.
8) फणस हाडांसाठी उपयुक्त आहे ..
फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते. त्यामुळे फणस खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते.
9) फणस मसल्ससाठी फायदेशीर असतो ..
फणसात प्रोटीन्ससुद्धा भरपूर असते. त्यामुळे शारीरिक दुर्बलता कमी होऊन मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.
फणसात असणारे पोषकघटक –
फणसामध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B6 व व्हिटॅमिन-C भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन-बी6 मेंदूच्या आरोग्यासाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक पेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय फणसात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलिक ऍसिड, थायमिन, niacin यासारखी अनेक महत्वाची पोषकद्रव्ये असतात.
गरोदरपणात फणस खावे का?
फणसात व्हिटॅमिन्स, खनिजतत्वे व अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात. तरीही प्रेग्नन्सीमध्ये थोड्या प्रमाणातचं फणस खावा. गर्भावस्थेत अधिक प्रमाणात फणस खाल्यास पोट बिघडू शकते. प्रेग्नन्सीमध्ये कोणता आहार घ्यावा ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
फणस खाण्यमुळे होणारे तोटे –
फणस खाणे हे फारसे काही आरोग्यासाठी नुकसानकारक नसते. काहीजणांना फणस खाण्यामुळे ऍलर्जीची समस्या होऊ शकते. याशिवाय फणस अधिक खाण्यामुळे काहीजणांचे अपचन होऊन पोट बिघडू शकते. त्यामुळे जुलाब व पोटफुगी होणे अशा समस्या होऊ शकतात. फणस खाण्यामुळे पोट फुगल्यास लिंबूपाणी प्यावे. असे काही नुकसान फणस खाण्यामुळे होऊ शकतात.
फणस खाल्यावर काय खाऊ नये ..?
फणस अधिक खाण्यामुळे अपचन होऊ शकते. त्यामुळे फणस हा जेवणानंतर खाणे टाळावे. तसेच कधीही फणस खाऊन नागवेलीचे पान म्हणजेच विड्याचे पान खाऊ नये. कारण फणसाचे गरे खाल्यावर विड्याचे पान खाल्यास पोटफुगीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय फणस हा खीर व दुधाबरोबर कधीही खाऊ नये.
Read Marathi language article about Jackfruit Health benefits and Side effects. Last Medically Reviewed on March 3, 2024 By Dr. Satish Upalkar.