Dr. Satish Upalkar’s article about Gallstones ayurvedic treatment in Marathi.
पित्ताशय खडे आणि आयुर्वेद उपचार –
पित्ताशयात खडे होणे या त्रासाला आयुर्वेदात ‘पित्ताश्मरी’ असे म्हणतात. पित्त म्हणजे अंसुतीलित पित्तदोष तर अश्मरी म्हणजे खडे अर्थात पित्ताशयात खडे होणे. पित्ताशयातील खडे यावर आयुर्वेदात अनेक प्रभावी असे औषध उपचार उपलब्ध आहेत. पित्ताशय खडे यावरील आयुर्वेदिक उपचार यांची माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
आपल्या शरीरात उजव्या कुशीत यकृताच्या खाली
पित्ताशय असते. या पित्ताशयात पित्त साठवले जाते. या साठवलेल्या पित्ताचा उपयोग पचनक्रियेसाठी होत असतो. अशा या पित्ताशयात काहीवेळा पित्ताचे खडे धरत असतात. अनेकांना पित्ताशयात खडे होण्याचा त्रास असतो. त्यातही महिला आणि वयाच्या साठीनंतर या त्रासाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
पित्ताशयात खडे होण्याची कारणे –
पित्ताशयात असलेल्या पित्तामध्ये रासायनिक असंतुलन झाल्याने पित्ताचे खडे होत असतात. प्रामुख्याने त्या पित्तामध्ये कोलेस्टेरॉल, कॅल्शियम ग्लायकोकॉलेट किंवा बिलीरुबिनचे प्रमाण अधिक झाल्यास पित्ताचे खडे तयार होत असतात. त्यातही पित्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक वाढल्याने असे खडे धरत असतात.
हा त्रास कोणाला होऊ शकतो ..?
- लठ्ठपणा किंवा वजन जास्त असणाऱ्या व्यक्ती,
- तेलकट, चरबीयुक्त आहार वारंवार खाणारे लोक,
- आहारातील फायबर्सचे प्रमाण कमी असल्यास,
- कुटुंबात या त्रासाची आनुवंशिकता असल्यास,
- यकृताचा सिरॉसिस, डायबेटिस असे आजार असणारे रुग्ण,
- स्त्रिया,
- 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, यांमध्ये या पित्ताशयात खडे होण्याचे प्रमाण जास्त आहे.
पित्ताशयातील खडे व लक्षणे -:
- पित्ताशयाला सूज येणे
- पोटात, उजव्या कुशीत दुखणे,
- जेवणानंतर अधिक त्रास होणे,
- ताप येणे,
- मळमळ व उलट्या होणे,
- काविळ होणे,
- लघवीला गडद होणे,
- शौचाचा रंग पांढरट किंवा मातकट असणे,
- घाम येणे,
- पोट गच्च वाटणे व ढेकर येणे अशी लक्षणे या त्रासात जाणवू शकतात.
हे सुद्धा वाचा – करपट ढेकर येणे याची कारणे व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
पिताशयातील खड्यांचे निदान :
पिताशयात खडे असल्याचे निदान स्पष्ट होण्यासाठी अल्ट्रासाऊंड तपासणी, सीटी स्कॅन, एक्स-रे किंवा रेडिओनुक्लाइड स्कॅन करावे लागू शकते. तसेच पित्तनलिकेची स्थिती जाणून घेण्यासाठी एंडोस्कोपिक रेट्रोग्राइड कोलॅंगिओपँक्रिएटोग्राफी (ERCP) करावी लागू शकते. याशिवाय रक्ताची चाचणी करून रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण तपासले जाते. पित्ताशयात खडे आहेत की नाही हे पाहण्यासाठी अशा चाचण्या व तपासण्या कराव्या लागू शकतात.
पित्ताशयातील खडे आणि आयुर्वेदिक उपाय –
हळद –
हळद ही पित्ताचे शमन करते. हळदीमध्ये कोलेरेटिक आणि सूज कमी करणारे औषधी गुणधर्म असतात. पित्ताशयात खडे असल्यास रोज रात्री झोपताना कपभर कोमट दुधात हळद घालावी व ते दूध प्यावे. पित्ताशयातील खडे जाण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय काही दिवस करावा. यामुळे पित्ताचे खडे विरघळण्यासाठी मदत होते.
गोक्षुर –
गोक्षुर ही आयुर्वेदिक वनस्पती शरीरातील खड्यांवर खूप गुणकारी आहे. पित्ताशयातील खडे बारीक होण्यासाठी गोक्षुर चुर्ण किंवा गोक्षुरपासून बनवलेली आयुर्वेदिक औषधे या त्रासावर खूप प्रभावी आहेत. आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ती औषधे घेऊ शकता.
कोरपड –
कोरपडीत सुद्धा पित्त कमी करणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पित्ताशयात खडे झाल्यास कोरपडीच्या गरामध्ये मध मिसळून ते खावे. हा आयुर्वेदिक उपाय केल्यानेही पित्ताशयातील खडे विरघळण्यास मदत होते. याव्यतिरिक्त आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण कोरपडपासून बनवलेली औषधेही घेऊ शकता.
पित्ताशय खडे यावरील आयुर्वेदिक उपचार –
पित्ताशयात खडे होणे यावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर हे रुग्णाची प्रकृती व आजाराचे स्वरूप पाहून यावर योग्य ते उपचार ठरवतात. शंखवटी, सुतशेखर रस, प्रवाळपंचामृत, गोक्षुर चुर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, अविपत्तीकर चुर्ण अशी अनेक आयुर्वेदिक औषधे पित्ताशयातील खडे दूर करण्यासाठी गुणकारी आहेत. त्यामुळे जर आपणास असा त्रास असल्यास आपल्या जवळच्या आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचा या त्रासावर जरूर सल्ला घ्या. आयुर्वेदिक उपचारांनी पित्ताचे खडे कमी होण्यास निश्चितच मदत होईल.
हे सुद्धा वाचा – पित्ताशय खडे यावरील ऑपरेशन विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
पित्ताशयातील खडे आणि आयुर्वेदिक पथ्य अपथ्य –
पित्ताशयात खडे होण्याच्या त्रासावर योग्य पथ्य पाळणे खूप महत्वाचे आहे. हा त्रास असणाऱ्यांनी तेलकट पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, फास्टफुड खाणे टाळले पाहिजे. मांसाहारही कमी करावा. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे यांचा समावेश जेवणात भरपूर असावा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा – काविळ होण्याची कारणे व त्यावरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
4 SourcesInformation about Gallstones Ayurvedic treatment medicine in Marathi. Article written by Dr. Satish Upalkar.