Dr Satish Upalkar’s article about Eardrum Rupture causes, symptoms & treatment in Marathi.
कानाचा पडदा फाटणे – Eardrum Rupture :
अनेक कारणांनी आपल्या कानाचे पडदे फाटत असतात. कानाचा पडदा फाटला असल्यास ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होऊ शकतो. प्रामुख्याने कानातील इन्फेक्शनमुळे कानाचा पडदा फाटतो. येथे कानाचा पडदा फाटणे याची कारणे व त्यावरील उपचार आणि घरगुती उपाय याची माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
कानाचा पडदा कसा असतो त्याविषयी माहिती :
कानाच्या पडद्याला eardrum किंवा tympanic membrane असे म्हणतात. कानाचा पातळ पडदा हा मध्यकर्ण आणि बाह्यकर्ण यांच्यामध्ये असतो. जेंव्हा एखादा आवाज होतो तेंव्हा पहिल्यांदा त्या आवाजाचे कंपन (vibration) हे ह्या पडद्यावर होतात. त्यानंतर आपणास सुस्पष्ट आवाज ऐकू येतो. मात्र कानाचा पडदा फाटला असल्यास तेंव्हा आवाजाचे असे कंपन होत नाहीत त्यामुळे याचा परिणाम आपल्या ऐकण्याच्या शक्तीवर होऊ लागतो.
कानाचा पडदा फाटण्याची कारणे – Causes of eardrum rupture in Marathi :
कानात इन्फेक्शन झाल्यामुळे प्रामुख्याने कानाचा पडदा फाटण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय,
- कानातील दाबामध्ये अचानक बदल झाल्यानेही कानाचे पडदे फाटू शकतो. याला बरोट्रॉमा असे म्हणतात. स्कूबा डायव्हिंग, विमानातील प्रवास यामुळे कानातील दाबामध्ये अचानक बदल होऊ शकतो.
- कानाला दुखापत किंवा मार लागल्यानेही कानाचा पडदा फाटू शकतो.
- कानात टोकदार वस्तू घालण्यामुळेही कानाच्या पडद्याला दुखापत होऊन कानाचा पडदा फाटू शकतो.
कानाचे पडदे फाटल्याची लक्षणे – Symptoms of eardrum rupture in Marathi :
कानामध्ये वेदना होऊ लागणे हे कानाचा पडदा फाटल्याचे मुख्य लक्षण असते. याशिवाय कानातून पाण्यासारखा स्त्राव येणे, पू किंवा रक्त येणे ही लक्षणे सुध्दा यामध्ये दिसू शकतात. याशिवाय कानात घंटा वाजल्यासारखे वेगवेगळे आवाज येणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे असे त्रास ह्यामध्ये जाणवू शकतात.
कानाचा पडदा फाटल्याचे निदान – Diagnosing eardrum ruptures :
ENT स्पेशालिस्ट डॉक्टर हे otoscope द्वारे कानाची तपासणी करून कानाचा पडदा फाटला आहे की नाही याचे निदान करतात. याशिवाय ते ऐकण्याची क्षमता ऑडिओलॉजी परीक्षेद्वारे करतील. तसेच काहीवेळा tympanometry द्वारे कानातील दाबाची तपासणीही ते करू शकतात.
कानाचा पडदा फाटणे यावरील उपचार – Treatment for eardrum rupture in Marathi :
कानात वेदना होत असल्यास त्यासाठी आपले डॉक्टर वेदनाशामक गोळ्या औषधे देतील. याशिवाय कानात इन्फेक्शन झालेले असल्यास त्यासाठी अँटीबायोटिक औषधे, इअर ड्रॉप्स देतील. यामुळे कानातील जिवाणूंचे इन्फेक्शन रोखले जाते. कानाचा फाटलेला पडदा हा काही आठवड्यांत उपचारांशिवाय स्वतःच बरा होत असतो. तसेच काहीवेळा फाटलेला पडदा जर आपोआप ठीक होत नसल्यास त्यासाठी सर्जरीसारखे उपचार करावे लागू शकतात.
पॅचिंग (Patching) –
कानाचा फाटलेला पडदा आपोआप बरा होत नसल्यास त्यासाठी पॅचिंग पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये ENT स्पेशालिस्ट डॉक्टर हे कानाच्या फाटलेल्या पडद्याच्या ठिकाणी मेडिकेटेड पेपर पॅच लावतात. यामुळे कानाचा फाटलेला पडदा या पॅचसह जुळून व्यवस्थित होतो.
सर्जरी (Tympanoplasty Surgery) –
कानाचा फाटलेला पडदा आपोआप बरा होत नसल्यास त्यासाठी काहीवेळा सर्जरी करून पडदा दुरुस्त केला जातो. या सर्जरीला टायमॅनोप्लास्टी (tympanoplasty) असे म्हणतात. यामध्ये ENT स्पेशालिस्ट डॉक्टर हे कानाच्या फाटलेल्या पडद्याच्या ठिकाणी रुग्णाच्या इतर भागातील टिश्यू (tissue) घेऊन तो टिश्यू फाटलेल्या पडद्याच्या ठिकाणी रोपण करतात. यामुळे काही दिवसांनी या टिश्यूजची फाटलेल्या पडद्याच्या ठिकाणी वाढ होऊन कानाचा पडदा व्यवस्थित होतो. सर्जरी झाल्यानंतर कानाचा पडदा बरा होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.
कानाचा पडदा फाटणे यावरील उपाय –
फाटलेला कानाचा पडदा हा आपोआप काही दिवसात ठीक होत असतो. यासाठी विशेष असे उपाय करावे लागत नाहीत. कानात इन्फेक्शन झालेले असल्यास ते पसरू नये यासाठी डॉक्टरांकडून अँटीबायोटिक औषधे, इअर ड्रॉप्स घेणे गरजेचे असते. कानाचा पडदा फाटला असल्यास घरगुती उपाय म्हणून कानाच्या ठिकाणी थंड किंवा गरम शेक घेण्याची सूचना आपले डॉक्टर यावेळी करू शकतात.
कानाचा पडदा फाटला असल्यास घ्यायची काळजी :
कानात इन्फेक्शन झाल्यामुळे कानाचा पडदा फाटला असल्यास कानातील इन्फेक्शन पसरून धोके वाढू शकतात. अगदी मेंदूत इन्फेक्शन पसरू शकते. यासाठी याचे डॉक्टरांकडून निदान व अँटीबायोटिक औषधे, इअर ड्रॉप्स हे उपचार घेणे गरजेचे असते. अशावेळी दुर्लक्ष करून उपचार न केल्यास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. तसेच मेंदूमध्ये पू किंवा पाणी जमा होऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो़. यासाठी खालील काळजी घेणे आवश्यक असते.
- कानातून स्त्राव येत असल्यास, खाज येत असल्यास तसेच कानात वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मर्जीने कोणताही इअर ड्रॉप्स किंवा घरगुती औषध कानात घालू नका.
- कानात बोट किंवा टोकदार वस्तू घालून कान खाजवणे किंवा कानातील मळ काढणे टाळा. कारण यामुळे कानात जखम होऊन इन्फेक्शन होत असते.
- कानाचे पडदे फाटले असल्यास आंघोळीच्या वेळी कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.
- जोपर्यंत कानाचा पडदा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत पोहणे टाळा.
- तुम्हाला सर्दी किंवा सायनसचा त्रास होत असेल तर त्यावेळी विमान प्रवास टाळा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा ..
- कान दुखणे यावरील उपचार
- कानात खाज येणे यावर उपाय
- कानातील मळ काढण्याचे उपाय
- कानातून पाणी येणे यावरील उपाय
Information about Eardrum Rupture causes, home remedy, treatment & prevention in Marathi. Article written by Dr Satish Upalkar.
4 Sources