Dr. Satish Upalkar article about Ear Discharge Treatment in Marathi.

कान वाहणे – Ear Discharge :

कानातून पू येणे किंवा कानातून पाणी येणे हा एक सामान्यपणे होणारा कानाचा आजार आहे. सामान्य आजार असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण वेळीच उपचार न झाल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. बहिरेपणा ही येऊ शकतो.

कानातून पाणी येण्याची कारणे :

 • प्रामुख्याने बॅक्टेरिया, वायरस आणि फंगल इन्फेक्शन होऊन कानातून पू येत असतो.
 • ‎सर्दी होणे, खोकला, टॉन्सिल्स, वाढलेले अॅडेनायड्स, अॅलर्जिक राइनाइटिस व सायनस यांमुळे नाक आणि घशातील बैक्टीरिया आणि वायरस हे कानात प्रवेश करून तेथे इन्फेक्शन निर्माण करतात त्यामुळे कान वाहतो.
 • ‎लहान मुलांत टॉन्सिल्स व अॅडिनॉइड्सच्या वारंवार होणाऱ्या इन्फेक्शनमुळे कान फुटण्याचे प्रमाण जास्त असते.
 • ‎कानाचा पडदा फाटणे हे याचे एक प्रमुख कारण असते. कानाच्या बाह्य भागात जखम होणे, कानात काडी, पेन्सिल इ. तत्सम वस्तू घालण्याच्या सवयीमुळे कानाच्या पडद्याला इजा होऊन कान वाहतो.
 • ‎वायू प्रदूषण, एलर्जी, धूम्रपान (Smoking) आदी कारणेही कान वाहण्यास सहाय्यक ठरतात.

कान वाहत असल्यास दुर्लक्ष करू नका..

कानातून पाणी, रक्तस्त्राव किंवा पू यासारखे स्त्राव येत असल्यास, कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीचं उपचार न केल्यास वाहते कान अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देते.

कान वाहणे याकडे दुर्लक्ष केल्यास ऐकू येण्यास बाधा निर्माण होते. उपचार न केल्यास कान बंद होतो, बहिरेपणा येतो.

कानाभोवतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू. मेंदूत हे कानातील इन्फेक्शन पसरल्यास मेंदूला सूज येणे, चक्कर येणे, मेंदूज्वर अशा गंभीर विकार उद्भवतात.
त्यामुळे कानातून काही स्त्राव येत असल्यास त्यावर लागलीच उपचार करणेच योग्य ठरते.

कान फुटणे किंवा कान वाहणे यावरील उपचार माहिती :

औषधाने कानातील संसर्ग नियंत्रणात आणता येतो.
जर औषधोपचाराने कान वाहणे थांबले नाही तर ऑपरेशन करावे लागते. पडद्याचे छिद्र दुरुस्त करण्यासाठी कानाच्या पडद्याचे प्रत्यारोपण (टिम्पॅनोप्लास्टी) केली जाते. या ऑपरेशनमध्ये कानामध्ये त्वचेचा कृत्रिम पडदा तयार करून बसविला जातो.

कान वाहणाऱ्या अवस्थेत काही वेळा मायरिंगोटॉमी केली जाते. यात पडद्यातून  द्रव बाहेर काढला जातो. तसेच व्हेंटिलेशन ट्यूब टाकण्यात येते.

महत्वाचा सल्ला :

 • सर्दी, खोकला होणे, टॉन्सिल्स, अॅडिनॉइड्सच्या तक्रारी टाळण्यासाठी थंडगार पदार्थ खाणे टाळा, थंडगार एसीत बसू नका.
 • ‎आंघोळ करताना पाणी कानात जाणार नाही याची काळजी घ्या. यासाठी छोट्याशा पॉलिथिन पिशवीने कान झाकावा.
 • ‎आंघोळीनंतर कान कोरड्या फडक्याने पुसा.
 • ‎कानात काडी, पेन्सिल यासारख्या वस्तू घालणे टाळा.
 • ‎वारंवार कान खाजवणे ही टाळा.
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात कोणतेही औषध घालू नका. विनाकारण घरगुती उपाय करीत बसू नये.
 • ‎कानातून पाणी, पू यासारखे स्त्राव येत असल्यास, कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)

हे सुद्धा वाचा..
कानाच्या विविध आजारांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.