सायनसचा त्रास होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Sinusitis in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

सायनस इन्फेक्शन – Sinusitis :

आपल्या चेहऱ्याच्या मागे कवटीची हाडे असतात. या कवटीच्या हाडांमध्ये कपाळ, नाक आणि गालाच्या ठिकाणी काही पोकळ भाग असतात, त्या पोकळ भागांना सायनसेस असे म्हणतात.

या सायनसेसमध्ये पातळ आणि वाहणारा द्रवपदार्थ तयार होत असतो. त्याला श्लेष्मा (म्युकस) असे म्हणतात. काही कारणांमुळे सायनसमध्ये हा द्रवपदार्थ जास्त झाल्यास तो नाकावाटे बाहेर येऊ लागतो.

मात्र काहीवेळा सायनस भागात जास्त प्रमाणात म्यूकस जमा होतो तेंव्हा तो नाकावाटे जास्त प्रमाणात वाहून न गेल्यास सायनसमधेच साठून राहतो. त्यामुळे साठून राहिलेल्या या म्यूकसमध्ये वायरस, फंगस किंवा बक्टेरियाचे इन्फेक्शन होऊन सायनसला सूज येते त्या स्थितीला सायनुसायटिस असे म्हणतात.

जगभरात सुमारे 15 ते 20% लोक हे सायनसच्या दुखण्याने किंवा सायनुसायटिसमुळे त्रस्त आहेत. ही समस्या तरुणांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. आजकाल एसी आणि थंड पाण्याच्या अतिवापरामुळे सायनसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींची संख्या वेगाने वाढत आहे.

सायनुसायटिस होण्याची कारणे – Sinusitis causes :

सायनस भागात जास्त प्रमाणात म्यूकस जमा होतो तेंव्हा तो नाकावाटे जास्त प्रमाणात वाहून न गेल्यास सायनसमधेच साठून राहतो. त्यामुळे साठून राहिलेल्या या म्यूकसमध्ये वायरस, फंगस किंवा बक्टेरियाचे संक्रमण (इन्फेक्शन) होऊन सायनसला सूज येते.

याशिवाय थंड हवामान, थंडगार पाणी पिण्याची सवय, एसी आणि फॅनचा अतिवापर करणे, नाकातील हाड वाढणे, नाकाचे हाड वाकडे होणे, ऍलर्जी, वायू प्रदूषण आणि धूम्रपान ही कारणेही सायनसचा त्रास निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.

सायनस डोकेदुखीचे प्रकार – Sinusitis types :

सायनुसायटिस चार मुख्य प्रकार आहेत.
(1) तीव्र सायनुसायटिस (Acute Sinusitis) –
यामध्ये व्हायरल इन्फेक्शन होऊन सर्दी सुरू होते. या प्रकारात लक्षणे अचानक सुरू होऊन 2 ते 4 आठवडे सायनसचा त्रास होत असतो.

(2) मध्यम तीव्र सायनुसायटिस (Subacute Sinusitis) –
या प्रकारात सायनसची सूज, वेदना होणे व सर्दीचा त्रास हा 4 ते 12 आठवडे पर्यंत असतो. प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे ह्या प्रकारचा त्रास होत असतो.

(3) जीर्ण सायनुसायटिस (Chronic Sinusitis) –
या प्रकारात सायनसची लक्षणे ही 3 महिन्यापेक्षा जास्त काळ आसतात. प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे ह्या प्रकारचा त्रास होत असतो. या प्रकारात नाकातून घट्ट पिवळसर शेंबूड येतो तसेच यामुळे नाक चोंदते व डोके जड वाटते ही लक्षणे असतात.

(4) वारंवार होणारी सायनुसायटिस (Recurrent Sinusitis) –
या प्रकारात रुग्णास वर्षभरात वारंवार सायनसायटिसची समस्या निर्माण होत असते. रुग्णांना वरचेवर सर्दी होत असते तसेच झालेली सर्दीही खूप दिवस टिकते, लवकर जात नाही.

सायनसची लक्षणे – Sinusitis symptoms :

• सायनसच्या ठिकाणी वेदना होतात.
• ‎नाकाच्या भोवती डोळ्यांच्यावर आणि जबड्याच्या हाडांमध्ये तीव्र वेदना होतात.
• ‎सकाळी वेदना जास्त जाणवतात.
• ‎डोके दुखणे. डोके हलविल्यास वेदना वाढतात.
• ‎पुढच्या बाजूस किंवा खाली वाकल्यावर डोके आणि गाल दुखणे.
• ‎नाक चोंदणे, ताप येणे, चेहरा सुजणे ही लक्षणे यात दिसून येतात.

सायनुसायटिसचे निदान असे केले जाते :

लक्षणे, पेशंट हिस्ट्री यावरून डॉक्टर सायनुसायटिसचे निदान करतील. तसेच काहीवेळा निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी ते काही तपासण्या करायला सांगू शकतात. सायनुसायटिसचे निदान करण्यासाठी MRI किंवा CT स्कॅन तपासणी केली जाते.

सायनुसायटिसवरील उपचार – Sinusitis treatments :

सायनसमध्ये नेमके कशामुळे इन्फेक्शन झाले आहे ते पाहून त्यावर उपचार केले जातात. बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झालेले असल्यास अँटीबायोटिक्स औषधे दिली जातात. ऍलर्जीमुळे सायनसचा त्रास होत असल्यास एलर्जीसाठी काही औषधे दिली जातील.

तसेच सायनसच्या ठिकाणी वेदना होत असल्यास किंवा त्यामुळे डोके दुखत असल्यास वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळ्या औषधे दिली जातात. याशिवाय घट्ट सर्दीमुळे नाक चोंदत असल्यास नाक मोकळे करण्यासाठी ड्रॉप्स किंवा स्प्रे दिले जातील.

सायनसवर हे करा घरगुती उपाय – Sinusitis home remedies :

लसूण –
लसूण हे उष्ण गुणांचे असून यात अँटी-बॅक्टेरियल तत्व असतात. त्यामुळे लसूनच्या दोन ते तीन पाकळ्या चावून खाल्याने सायनसचा त्रास कमी होण्यास मदत होते. याशिवाय आहारातही लसूनचा वापर करू शकता.

सुंठ आणि वेखंडचा लेप –
पाव चमचा सुंठ व अर्धा चमचा वेखंड यांची पाण्यात भिजवून पेस्ट तयार करावी. ह्याचा लेप कपाळ, नाक ह्यावर करावा. यामुळेही सायनस डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

काळे जिरे –
काळे जिरे थोडे बारीक करून एका पातळ फडक्यात बांधून त्याचा वास घेत राहावे. सायनसमुळे होणाऱ्या वेदना थांबण्यास यामुळे मदत होते.

कांदा आणि लसूण –
कांदा आणि लसूण पाकळ्या बारीक करून पाण्यात घालून उकळावे. गरम पाणी एका भांड्यात किंवा ग्लासात घेऊन त्याची वाफ घेत राहावी. यामुळे सायनसचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

कांद्याचा रस –
कांदा थोडा गरम करून त्याचे चमचाभर रस काढून घ्यावा. सायनसमुळे डोकेदुखी होत असल्यास नाकपुड्यामध्ये कांदा रसाचे दोन दोन थेंब टाकावेत.

पुदिना –
गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेण्यामुळेही सायनसचा त्रास दूर होण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

ऑलिव्ह ऑइल –
ऑलिव्ह तेल नाकाभोवती लावून थोडा मसाज करावा. यामुळे सायनसचा त्रास, वेदना कमी होण्यास मदत होते.

सायनसचा त्रास होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी – Sinus solution :

सायनसचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे, कोणता आहार घ्यावा, सायनस डोकेदुखीचा त्रास असल्यास काय खावे, काय खाऊ नये याची माहिती खाली दिली आहे.
• सायनसचा त्रास असल्यास थंड पाणी पिणे टाळा, थंडगार पदार्थ खाऊ नका.
• ‎एसी आणि फॅनचा अतिवापर टाळा.
• ‎सर्दी, खोकला होऊ देऊ नका.
• ‎सर्दी, खोकला यासारख्या समस्या झाल्यास त्यावर तात्काळ उपचार करून घ्या. सर्दी-खोकला अंगावर काढू नका.
• ‎धूळ-धूर, ऍलर्जी तसेच हवेचे प्रदूषण टाळा.
• ‎पाण्यात पोहणे टाळा.
• ‎धुम्रपान-सिगारेट आणि मद्यपान यासारखी व्यसने करणे सोडा.
• ‎दिवसातून भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
• ‎रात्री झोपताना गरम पाणी प्या.
• ‎सायनसवर होमिओपॅथी आणि आयुर्वेदामध्ये परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा –
सर्दीमुळे नाक चोंदल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या..