त्वचा कोरडी होणे – Dry Skin problem:

अनेकांची त्वचा ही तेलकट, सेन्सेटीव्ह असते त्याचप्रमाणे काहींची त्वचा ही कोरडीही असते. विशेषतः थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होण्याची समस्या अनेकांना होत असते. त्वचा अधिक कोरडी झाल्यास त्वचेला खाज येणे, जखमा होणे, त्वचेवर पुरळ उटणे यासारखे त्रासही होऊ शकतात. यासाठी येथे त्वचा कोरडी का पडत असते आणि कोरड्या त्वचेवरील उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे.

त्वचा कोरडी होण्याची कारणे :

• वातावरण बदलामुळे, हिवाळ्यात चेहरा आणि त्वचा कोरडी पडण्याची जास्त शक्यता असते,
• दररोज पुरेसे पाणी न पिण्यामुळे,
• जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीमुळे,
• केमिकल्स युक्त साबणाच्या वापरामुळे,
• तसेच सोरायसिस सारखे त्वचाविकार असल्यासही त्वचा कोरडी पडत असते.

कोरड्या त्वचेसाठी हे करा घरगुती उपाय :

कोरपडीचा गर (एलोवेरा जेल) –
कोरपडीचा गर रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेला व चेहऱ्याला लावा. या आयुर्वेदिक उपायाने आपली त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होईल. कोरपडीच्या गरात polysaccharide हे उपयुक्त घटक असून त्यामुळे त्वचेतील मॉइस्चर राखण्यास मदत होते. त्यामुळे अनेक क्रीममध्ये कोरपडीचा वापर केला जातो. कोरपडीचा ताजा गर उपलब्ध होत नसल्यास बाजारात मिळणाऱ्या एलोवेरा जेलचा वापर करू शकता.

खोबरेल तेल –
त्वचा कोरडी पडत असल्यास त्वचेला दिवासातून दोन वेळा म्हणजे सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेला व चेहऱ्यावर खोबरेल तेल लावावे. यामुळे तेलातील स्निग्ध गुणामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होऊन त्वचा मऊ, मुलायम आणि तजलेदार बनते.

जोजोबा ऑयल –
जोजोबा तेल केसांसाठी जसे उपयुक्त असते तसेच ते त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त असते. कोमट पाण्याने चेहरा ओला करावा व चेहऱ्याला अर्धा चमचा जोजोबा तेल थोडे थोडे लावावे. थोडया वेळाने सर्कुलर मोशनमध्ये चेहऱ्याला हलका मसाज करावा यामुळे चेहऱ्यातील त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल. आठवड्यातून एक वेळा अशाप्रकारे तेल मसाज करू शकता.

बदाम तेल –
रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला थोडेथोडे बदाम तेल लावावे व हलका मसाज करावा. यामुळे त्वचा मऊ, मुलायम बनते.

मध –
दोन चमचे मधामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून मिश्रण तयार करावे. हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावावा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून काढावा. मधातील पोषकतत्वांमुळे त्वचेतील आद्रता राखली जाते तर दालचिनीमुळे त्वचेतील बंद झालेली छिद्रे मोकळी होतात त्यामुळे कोरडी त्वचा पडण्याची समस्या दूर होते. आठवड्यातून एक वेळा हा फेसपॅक करू शकता.

बेसन –
दोन चमचे बेसन, अर्धा चमचा हळद, एक चमचा मध, एक चमचा साय यात थोडेथोडे गुलाबजल घालून मिश्रण तयार करावे. हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावावा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून काढावा. बेसनमुळे त्वचेतील धूळ, प्रदूषण, घाम दूर होतो तर मध व साय मुळे कोरडेपणा दूर होतो. आठवड्यातून एक वेळा हा फेसपॅक करू शकता.

त्वचा कोरडी पडू नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

• थंडीच्या दिवसात चेहरा आणि त्वचेवर मॉइस्चराइजर क्रीम किंवा तेल लावावे.
• रासायनिक साबणापेक्षा हार्बल साबनांचा वापर करावा.
• जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नये.
• आंघोळ केल्यानंतर चेहरा व त्वचा टॉवेलने जास्त रगडून पुसू नये.
• पोषकतत्त्वांनी युक्त म्हणजे व्हिटॅमिन, मिनरल्स आणि प्रोटीनयुक्त आहार घ्यावा.
• पुरेसे पाणी प्यावे. त्यामुळे त्वचेतील आद्रता टिकून राहते.
ही काळजी घेतल्यास त्वचा कोरडी पडण्याच्या त्रासापासून दूर राहता येईल.

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)