तेलकट चेहरा होणे – Oily face :

चेहऱ्यावर तेल जमा होण्याची अनेकांना समस्या असते. यांमुळे चेहरा तेलकट, चिपचिपा बनतो आणि चेहऱ्यावर पिंपल्सही अधिक येत असतात. विशेषतः उन्हाळ्यात हा त्रास अधिक प्रमाणात होतो. चेहरा तेलकट झाल्याने त्याठिकाणी हवेतील धूळ व प्रदूषण चिकटते यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य धोक्यात येते यासाठी याठिकाणी चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्याचे उपाय खाली दिले आहेत.

तेलकट चेहऱ्यावर हे करा घरगुती उपाय :

गुलाबजल –
कापसाचा गोळा गुलाबजलमध्ये भिजवून तो गोळा आपल्या चेहऱ्यावर सकाळी व रात्री असे दोन वेळा फिरवावा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा, धूळ, प्रदूषण निघून जाईल आणि चेहऱ्याचे सौंदर्यही उजळेल.

मुलतानी माती –
तेलकट होणाऱ्या चेहऱ्यासाठी मुलतानी माती उपयुक्त असते. दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा दही आणि 2 ते 3 थेंब लिंबूरस या सर्वांचे एकजीव मिश्रण करावे. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा व त्यानंतर वरील लेप चेहऱ्यावर लावावा. 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा व चेहऱ्यावर एक चांगली माश्चराइज़र क्रीम लावावी. आठवड्यातून 3 वेळा हा फेसपॅक आपण चेहऱ्यावर लावावा.

मसूर डाळ –
अर्धा कप मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी. सकाळी ती भिजलेली मसूर डाळ चांगली वाटून घ्यावी. यामध्ये थोडेसे दूध मिसळून पेस्ट तयार करावी. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. आठवड्यातून एक वेळा हा फेसपॅक आपण चेहऱ्यावर लावू शकता तसेच या फेसपॅकमुळे आपण चेहऱ्याचे स्क्रबिंग ही करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते.

बेसन –
चार चमचे बेसन, दोन चमचे मध आणि दोन चमचे हळद यामध्ये गुलाबजल मिसळावे. ह्या मिश्रणाचा लेप चेहऱ्यावर लावून 15 मिनिटाने स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. हा फेसपॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर जरूर लावा. यामुळे आपला चेहरा सुंदर व तजलेदार बनेल. उन्हाळ्यात चेहरा तेलकट होण्याची ज्यांना समस्या आहे त्यांच्यासाठी हा फेसपॅक खूप उपयोगी आहे.

कडुनिंब –
कडुनिंबाची 10 पाने घेऊन ती थोडेथोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावी त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद घालावी व मिश्रण एकजीव करावे. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.

मध –
मध हे अँटी-सेप्टीक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणांचे असल्यामुळे तेलकट चेहऱ्यासाठी उपाय म्हणून उपयुक्त ठरते. यासाठी मध चेहऱ्यास लावून थोड्या वेळाने चेहरा धुवून काढावा.

कोरपडीचा गर –
चेहरा तेलकट होत असल्यास आठवड्यातून एकदा कोरफडीचा गर लावावा आणि 15 मिनीटांनी पाण्याने धुऊन टाकावा. तेलकट चेहऱ्यावर कोरफडीचा गर खूपच उपयोगी ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील धुळ आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.

लिंबू –
लिंबूमध्ये व्हिटॅमिन-C मुबलक असते त्यामुळे चेहऱ्यावरील रोमच्छिद्र साफ करण्यास व त्यांचे अंकुचन करण्यास लिंबू उपयोगी ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. यासाठी अर्धा लिंबू घेऊन त्याने चेहऱ्यावर चोळावे आणि 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

चेहरा तेलकट होऊ नये यासाठी ही काळजी घ्या..

उन्हाळ्यात घाम भरपूर येत असतो त्यामुळे बाहेरील धुळ, प्रदूषण चेहऱ्यावर बसत असते. तसेच घामामुळे चेहऱ्यावर तेल जमा होते. यासाठी दिवसातून किमान दोनवेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा तसेच चेहऱ्यावर आलेला घाम ओल्या कापडाने पुसून घ्यावा. चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करू शकता.

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)