घशात दुखणे – Sore throat :
वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे सूज येऊन घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी-खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे व घसा दुखणे ही लक्षणेही असतात.
घसा दुखणे याची कारणे –
अनेक कारणांमुळे घशात वेदना होऊ शकतात. त्यातही प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे आणि घशात इन्फेक्शन झाल्याने घसा दुखू लागतो.
- सर्दी, खोकला झाल्यामुळे घशात दुखते.
- टॉन्सिल्सला सूज आल्याने घसा दुखतो.
- स्वरयंत्राला सूज (Laryngitis) आल्यामुळे घसा दुखतो.
- गालफुगी आजारात घसा दुखू लागतो.
- ॲलर्जी, वायुप्रदूषण, सिगारेटच्या स्मोकिंगमुळे घशात दुखते.
- तसेच घशातील कँसर किंवा घशात जखम झाल्यानेही घशात दुखते.
घसा दुखणे यावरील घरगुती उपाय –
घसा दुखू लागल्यास मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे घशातील सूज कमी होऊन घसा दुखणे थांबते. त्याचप्रमाणे आल्याचा तुकडा खाणे, मध खाणे, हळद घातलेले गरम दूध पिणे हे घरगुती उपाय घसा दुखणे यावर उपयोगी पडतात.
1) मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
घसा दुखू लागल्यास कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील सूज व वेदना कमी होतात. तसेच कोमट पाण्याने कफ निघण्यास मदत होते. या कोमट पाण्यात अर्धा चमचा हळदसुद्धा घातल्यास व गुळण्या केल्यास हा आयुर्वेदिक उपाय घसा दुखणे यावर खूप उपयुक्त ठरतो.
2) आल्याचा तुकडा मधाबरोबर खावा.
घसा दुखू लागल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घशात दुखणे कमी होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
3) मधाबरोबर लवंगा खाव्यात.
काही लवंगा मधात टाकून थोड्या वेळाने त्या लवंगा आणि मध यांचे चाटण करावे. यामुळेही घशात दुखणे कमी होण्यास मदत होते व घशाला आराम मिळतो.
4) लिंबाचा रस मधाबरोबर खावा.
ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा अर्धा चमचा रस व एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदना दूर होतात.
5) हळद घातलेले गरम दूध प्यावे.
घशात सूज आल्याने घसा दुखू लागल्यास हळद घालून ग्लासभर गरम दूध प्यावे. यामुळे घशातील सूज व वेदना कमी होऊन घशाला आराम मिळेतो.
घसा दुखू लागल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
घसा दुखणे हा त्रास प्रामुख्याने सर्दी, खोकला यासारख्या इन्फेक्शनमुळे होत असतो. त्यावर घरगुती उपाय उपयोगी पडतात. मात्र घरगुती उपाय करुनही आठवडाभर घसा दुखणे कमी न झाल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
याशिवाय घसा दुखणे याबरोबरच खालील लक्षणे दिसून येत असल्यास जास्त खबरदारी घेणे गरजेचे असते. यामध्ये,
- अन्न गिळताना त्रास होणे,
- श्वास घेण्यास त्रास होणे,
- तोंड उघडण्यास त्रास होणे,
- थुंकी व कफातून रक्त येणे
असे त्रास जाणवल्यास डॉक्टरांकडे जाऊन होणाऱ्या त्रासाचे निदान व योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे.
हे सुध्दा वाचा – घसा खवखवणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Sore throat Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.