घशाला सूज आल्यास हे करा घरगुती उपाय – Pharyngitis treatment in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

घसा सुजणे – Pharyngitis :

घशात इन्फेक्शन झाल्याने, सर्दी खोकल्यामुळे तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घशाला सूज येत असते. घशाला सूज आल्यास त्याठिकाणी वेदनाही होत असतात. विशेषतः अन्न गिळताना जास्त त्रास होऊ लागतो. थंडी आणि पावसाळ्यात घसा सुजण्याचे प्रमाण अधिक असते.

घशाला सूज येण्याची कारणे :

अनेक कारणांमुळे घशाला सूज येऊ शकते. प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे आणि घशात इन्फेक्शन झाल्याने हा त्रास होत असतो.
• सर्दी, खोकला झाल्यामुळे,
टॉन्सिल्सला सूज आल्यामुळे,
• स्वरयंत्राला सूज (Laryngitis) आल्यामुळे,
• गालफुगी, गोवर, चिकनपॉक्स, डांग्या खोकला यासारख्या आजारामुळे,
• एलर्जीमुळे,
• तसेच घशातील कँसर किंवा घशात जखम झाल्यानेही घशाला सूज येऊ शकते.

घशाला सूज आल्यास हे करा घरगुती उपाय :

मीठाच्या पाण्याच्या गुळण्या –
घशामध्ये सूज असल्यास कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील सूज कमी होते तर कोमट पाण्याने कफ निघण्यास मदत होते. तसेच या कोमट पाण्यात अर्धा चमचा हळदसुद्धा घातल्यास व गुळण्या केल्यास हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयुक्त ठरतो.

आले व मध –
आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घशातील सूज कमी होण्यास मदत होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

लवंग आणि मध –
काही लवंगा मधात टाकून थोड्या वेळाने त्या लवंगा आणि मध यांचे चाटण करावे. यामुळेही घशातील सूज व वेदना कमी होण्यास मदत होते व घशाला आराम मिळतो. 

लिंबू आणि मध –
ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा अर्धा चमचा रस व एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील सूज कमी होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

गरम दूध प्यावे –
घशात सूज आल्यास हळद घालून ग्लासभर गरम दूध प्यावे. यामुळे घशातील सूज कमी होऊन घशाला आराम मिळेतो.

घसा सुजणे यावरील उपचार :

घशाला सूज येणे हे प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होत असते. यासाठी त्यावर आपले डॉक्टर योग्य ती अँटी-बायोटिक्स व वेदनाशामक औषधे देतील. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होऊन सूज कमी होते.

घसा बसल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.