आळशी डोळा व त्यावरील उपचार (Lazy eye in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Lazy eye in Marathi, Amblyopia in Marathi, lazy eye treatment in Marathi information.

आळशी डोळा म्हणजे काय..?

आपण म्हणाल की, डोळा कधी आळशी असतो का? पण डोळ्यांचा असा एक आजार आहे की ज्याला आळशी डोळा (Amblyopia किंवा lazy eye) असे म्हटले जाते. दृष्टी अस्पष्ट होणारा हा डोळ्यांचा विकार प्रामुख्याने सहा वर्षांच्या आतील मुलांमध्ये आढळतो. लक्षणांमध्ये मुलास एका डोळ्याने अस्पष्ट दिसू लागते. अशी लक्षणे दिसून आल्यास त्याचे लवकर निदान आणि उपचार होणे गरजेचे असते.

या आजारावर वेळीच उपचार केल्यास मुलाची दृष्टी सुधारता येऊ शकते. मात्र जर उपचार करण्यास उशीर झाल्यास अस्पष्ट दिसणारा डोळा पाहण्याचे काम योग्यरीत्या न करीत असल्याने आळशी बनतो त्यामुळे मुलास जन्मभर त्या डोळ्याने अस्पष्ट, अंधुक दिसू लागते. लहानपणीच योग्य नंबराचा चष्मा लावल्यास हा त्रास टळू शकतो. मात्र अनेकदा एका डोळ्याने चांगले दिसत असल्यामुळे दुसऱ्या डोळ्याने कमी दिसते, हे लक्षातच येत नाही. यासाठी एकेक डोळा बंद करून पाहिल्यावरच ते लक्षात येते.

आळशी डोळा होण्याची कारणे :

डोळ्यांतील जन्मजात विकृतीमुळे, डोळ्याची दृष्टी पूर्णतः विकसित न झाल्यामुळे तसेच तिरळेपणामुळेही ही समस्या निर्माण होते.

दोन डोळ्यांच्या नंबरमध्ये फरक असल्यास म्हणजे नजर कमी-जास्त असल्यास आपला मेंदू काय करतो की, ज्या डोळ्याचा नंबर कमी आहे त्याचं डोळ्याकडून काम करून घेतो आणि जास्त नंबरचा दुसरा डोळा काम न केल्यामुळे ‘आळशी‘ होतो..!

आळशी डोळा उपचार :

आळशी डोळ्याला काम करायला भाग पाडणे हा उपचाराचा मुख्य उद्देश असतो. आळशी डोळा (ऑम्ब्लेओपिया) याचे लहानवयातच लवकर निदान लवकर आणि योग्य उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा करता येतो. उपचारमध्ये चष्म्याचा योग्य नंबर दिला जातो व डोळ्यांचे व्यायामही सांगितले जातात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

आळशी डोळ्याने काम करावे यासाठी चांगला डोळा रोज काही वेळ पॅच ठेऊन बंद करावा. यामुळे चांगला डोळा बंदच केल्यामुळे आळशी डोळ्याला काम करणे भाग पडते. त्यामुळे त्याचा आळशीपणा कमी होऊन पाहण्याचे काम करण्याची त्या डोळ्यालाही सवय लागते.

सर्वसामान्यपणे वयाच्या 8 वर्षे वयापर्यंत या व्यायामाद्वारे आळशी डोळा कार्यरत करण्याचा प्रयत्न केला जातो. साधारणपणे मुलाचे वय जितके आहे तितके तास चांगला डोळा झाकून आळशी डोळ्याला व्यायाम दिला जातो. या प्रक्रियेमध्ये डोळ्यांपासून दृष्टीनाडीमार्फत दृष्टी केंद्रापर्यंत संवेदना पाठविण्याजोगी नवीन प्रणाली (Optictract) निर्माण करण्याचे कार्य चालू होऊन आळशी डोळ्याच्या दृष्टीची क्षमता वाढविता येते.

Lazy eye (amblyopia) – Symptoms, causes, and treatment in Marathi.