डोळ्यातील तिरळेपणा कारणे, लक्षणे व तिरळेपणावर उपचार मराठी माहिती

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Squint or strabismus in Marathi, Crossed Eyes Causes and Surgery, Treatment in Marathi information.

डोळ्यातील तिरळेपणा –

तिरळेपणा हे प्रामुख्याने डोळ्यातील जन्मजात दोष असतो याशिवाय अपुरी दृष्टी किंवा डोळ्याच्या बाहेरील स्नायू (Muscles) मध्ये सैलपणा आल्यामुळे डोळ्यात तिरळेपणा होत असतो. तिरळेपणा ह्या डोळ्याच्या आजारास English मध्ये Strabismus, Squint किंवा Crossed Eyes असेही म्हणतात.

तिरळेपणा हा एका किंवा दोन्ही डोळ्यांतही असू शकतो. तिरळेपणात डोळ्यातील बुबुळं एका सरळ रेषेत नसतात. काहीवेळा डोळा नाकाच्या बाजूस वळलेला असतो या प्रकारास esotropia असे म्हणतात. तर डोळा कानाच्या बाजूस वळलेला असल्यास त्या प्रकारास exotropia असे म्हणतात.

तिरळेपणाची कारणे :

• आनुवंशिकता म्हणजे कुटुंबामध्ये आई-वडील यांना तिरळेपणा असल्यामुळे,
• ‎डोळ्यांमधील जन्मजात दोषामुळे,
• ‎डोळ्याच्या स्नायूंमधील कमजोरी असल्याने,
• ‎याशिवाय रेटिनाचे विविध आजार, चष्म्याचा मोठा नंबर असणे यांमुळेही तिरळेपणाची समस्या निर्माण होऊ शकते.

तिरळेपणावर उपचार :

लहान वयामध्येचं तिरळेपणावर योग्य उपचार केल्यास हा दोष सहज दूर होऊ शकतो. मात्र जसजसे वय वाढत जाते, तसतसे तिरळेपणावर उपचार करूनदेखील नजर सरळ करणे अवघड असते. तिरळेपणामुळे भविष्यात नजर कमी होत जाऊन आळशी डोळा (Amblyopia), वस्तू दोन-दोन दिसणे (डिप्लोपिया) ह्यासारख्या डोळ्यांच्या समस्याही होऊ शकतात. तसेच तिरळेपणाचा नकारात्मक परिणाम मुलांच्या मनावर होऊ शकतो. तसेच तिरळेपणामुळे संरक्षण किंवा पोलीस यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी मिळत नाहीत. यासाठी लहान वयातच यावर उपचार करणे गरजेचे असते.

तिरळेपणावर नेत्ररोगतज्ञ डॉक्टर योग्य नंबरचा चष्मा किंवा तिरळेपणावरील ऑपरेशन याद्वारे उपचार करतात. तिरळेपणा दृष्टिदोषामुळे आलेला असल्यास योग्य तो चष्म्याचा नंबर लावून तिरळेपणा कमी केला जातो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

तिरळेपणा ऑपरेशन –
तिरळेपणावरील ऑपरेशनमध्ये ज्या बाजूला डोळा जास्त ओढला गेलेला आहे, त्या बाजूचा स्नायू शिथिल केला जातो आणि त्याच डोळ्याचा पण विरुद्ध बाजूचा स्नायू आवळला जातो. शस्त्रक्रियेनंतरदेखील चष्मा दिला जातो व डोळ्यांचे व्यायाम सांगितले जातात.

डोळ्यांचा तिरळेपणा व्यायाम :

• व्यायाममध्ये पापण्यांची 20 वेळा उघडझाप करावी,
• मान व नजर समोर ठेऊन फक्त डोळे उजवीकडे-डावीकडे फिरवावे,
• मान व नजर समोर ठेऊन फक्त डोळे वर-खाली करावेत,
• दूरची वस्तू बघणे, जवळची वस्तू बघणे,
• एक डोळा बंद करून एका डोळ्याने पाहणे.
असे डोळ्यांचे विविध व्यायाम प्रत्येकी 5 ते 10 वेळा करावेत. यामुळे डोळ्यातील रक्तसंचारण व्यवस्थित होते, डोळ्याच्या स्नायूंचा व्यायाम होऊन तिरळेपणा सुधारण्यास, नजर चांगली होण्यास मदत होते.

Crossed Eyes (Strabismus) – Symptoms and Treatments in Marathi.