चष्म्याचा नंबर जाण्यासाठी उपाय आणि डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

How to remove eye glasses permanently tips in Marathi, chasma number kami karnyache upay in Marathi, chasma janyache upay.

नजर कमी होणे व चष्मा लागणे :

स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा अतिवापर, टीव्ही अधिक काळ पाहत राहणे, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, तणाव यांमुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत असते. त्यामुळेच अनेकांना नजर कमी होऊन चष्मा लागत असतो. यासाठी चष्मा घालवण्यासाठी, चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त माहिती व घरगुती आयुर्वेदिक उपाय खाली दिले आहे. त्यामुळे चष्मा कायमचा जाण्यासाठी मदत होईल.

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय :

डोळे स्वच्छ करावेत..
हवेतील कचरा, धूळ, प्रदूषण डोळ्यात जात असतो. यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपले डोळे धुवावेत.

योग्य आहार घ्यावा..
पोषकतत्व आणि व्हिटॅमिन्स युक्त आहार घ्यावा. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखतात. तसेच गाजर, आवळा, द्राक्षे, बीट, संत्री, टोमॅटो यांचाही समावेश असावा. यामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी असणारे मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन A आणि C असते. पुरेसे पाणीही प्यावे. साधारण 8 ते 10 ग्लास पाणी दररोज प्यावे.

डोळ्यांवर ताण येऊ देऊ नका..
सतत स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरल्याने, अधिककाळ टीव्ही बघत राहिल्याने डोळ्यांची उघडझाप कमी होते त्यामुळे डोळे कोरडे होऊन डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते व नजर कमी होते. यासाठी वरील गॅजेट्सचा वापर मर्यादित करावा. थोड्या-थोडया वेळाने डोळ्यांना विश्रांती द्यावी. डोळे मिटून हाताचे तळवे डोळ्यांवर एक मिनिट ठेवावेत. त्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांचे व्यायाम करावेत..
दिवसातून दोन वेळा डोळ्यांचे व्यायाम करावेत. यामध्ये पापण्यांची उघडझाप करणे, मान व नजर समोर ठेऊन फक्त डोळे उजवीकडे-डावीकडे फिरवणे, डोळे वर-खाली करणे, दूरची वस्तू बघणे, जवळची वस्तू बघणे असे डोळ्यांचे विविध व्यायाम प्रत्येकी 5 ते 10 वेळा करावेत. यामुळे डोळ्यातील रक्तसंचारण व्यवस्थित होते, डोळ्याच्या स्नायूंचा व्यायाम होऊन दृष्टी सुधारण्यास खूप चांगली मदत होते.

दुरवरील अक्षरे वाचावीत..
अक्षर लिहिलेले चार्ट 20 फुटावर ठेवून ते वाचण्याचा प्रयत्न करावा. यामुळेही नजर तेज होण्यास मदत होते.

पुरेशी झोप घ्यावी..
झोप पूर्ण न झाल्याने डोळ्यांवर ताण येत असतो. यासाठी रात्री जागरण करणे टाळावे, सात ते आठ तास झोप घ्यावी.

डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी उपाय :

खाली चष्म्याचा नंबर जाण्यासाठी घरगुती उपाय दिले आहेत यामुळे डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी मदत होईल.

अक्रोड तेलाने मालिश करावे –
डोळ्यांच्या आसपास अक्रोड तेलाने किंवा एरंडेल तेलाने हलकी मालिश करावी. यांमुळेही नजर तेज होऊन चष्मा दूर होण्यास मदत होते.

गुलाबजल –
गुलाबजलाने डोळे धुतल्याने किंवा एक थेंब गुलाबजल डोळ्यात घतल्यानेही डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

बदाम –
रोज रात्री 4 बदाम पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी ते बदाम सोलून खावेत. यामुळेही दृष्टी सुधारते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी –
रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे. दररोज सकाळी उपाशीपोटी ग्लासभर ते पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

जिरे व खडीसाखर –
जिरे आणि खडीसाखर समान प्रमाणात घेऊन बारीक वाटावीत. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्यावे. यामुळे नजर चांगली होण्यास मदत होते.

खोबरेल तेल –
रात्री झोपण्यापूर्वी तळपायाला थोडे खोबरेल तेल किंवा तिळ तेल लावून कांस्याच्या वाटीने मालिश करावी. यामुळेही झोप व्यवस्थित लागते आणि डोळ्यांची दृष्टीही सुधारते.

Home remedy to remove eye glasses tips in Marathi.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.