घशात दुखत असल्यास हे करा घरगुती उपाय – Sore throat treatment in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

घशात दुखणे – Sore throat :

वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घसा सुजून घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी-खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे व घसादुखी ही लक्षणेही असतात. घसा दुखत असल्यास कोणते उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे.

घसादुखी होण्याची कारणे :

अनेक कारणांमुळे घशात वेदना होऊ शकतात. त्यातही प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे आणि घशात इन्फेक्शन झाल्याने घसादुखी होत असते.
• सर्दी, खोकला झाल्यामुळे घसादुखी होऊ शकते.
टॉन्सिल्सला सूज आल्याने,
• स्वरयंत्राला सूज (Laryngitis) आल्यामुळे,
गालफुगी आजारामुळे,
• एलर्जीमुळे,
• वायुप्रदूषण, सिगारेटच्या स्मोकिंगमुळे,
• तसेच घशातील कँसर किंवा घशात जखम झाल्यानेही घशात दुखते.

घसा दुखीवर हे करा घरगुती उपाय :

मीठाच्या पाण्याच्या गुळण्या –
घशामध्ये दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील सूज व वेदना कमी होतात. तसेच कोमट पाण्याने कफ निघण्यास मदत होते. या कोमट पाण्यात अर्धा चमचा हळदसुद्धा घातल्यास व गुळण्या केल्यास हा आयुर्वेदिक उपाय घसादुखीवर खूप उपयुक्त ठरतो.

आले व मध –
घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घशात दुखणे कमी होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

लवंग आणि मध –
काही लवंगा मधात टाकून थोड्या वेळाने त्या लवंगा आणि मध यांचे चाटण करावे. यामुळेही घशात दुखणे कमी होण्यास मदत होते व घशाला आराम मिळतो. 

लिंबू आणि मध –
ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा अर्धा चमचा रस व एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदना दूर होतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

गरम दूध प्यावे –
घशात सूज आल्यास घसा दुखत असल्यास हळद घालून ग्लासभर गरम दूध प्यावे. यामुळे घशातील सूज व वेदना कमी होऊन घशाला आराम मिळेतो.

घसादुखी असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?

घसादुखी ही प्रामुख्याने सर्दी, खोकला यासारख्या इन्फेक्शनमुळे होत असते. त्यावर घरगुती उपाय करून घसादुखी दूर होण्यास मदत होते. मात्र घरगुती उपाय करुनही आठवडाभर घसादुखी कमी न झाल्यास आपल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.

याशिवाय घसादुखी बरोबरच खालील लक्षणे दिसून येत असल्यास जास्त खबरदारी घेणे गरजेचे असते. यामध्ये,
• घसादुखी बरोबर अन्न गिळताना त्रास होत आल्यास,
• श्वास घेण्यास त्रास होत असल्यास,
• तोंड उघडण्यास त्रास होत असल्यास,
• थुंकी व कफातून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन होणाऱ्या त्रासाचे निदान व योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे.