Cloves health benefits and side effects in Marathi.

लवंग खाण्याचे फायदे व तोटे article by Dr Satish Upalkar

लवंग – Cloves :

लवंग ह्या लवंगाच्या झाडाच्या फुलांच्या कळ्या असतात. सिझिझियम अरोमेटियम (Syzygium aromaticum) या नावाने लवंग वनस्पतीला ओळखले जाते. तसेच लवंग हा मसाल्यातील एक महत्वाचा असा घटक आहे. आपल्या जेवणाची रुची व सुगंध वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही लवंग फायदेशीर असते. कारण लवंगामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे अशी महत्वाची पोषकतत्त्वे असतात. विशेषतः यकृताच्या आरोग्यासाठी आणि डायबेटिसमध्ये रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात आणण्यासाठी लवंग हितकारी आहे. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी लवंग खाण्याचे फायदे व नुकसान याविषयी माहिती सांगितली आहे.

लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

लवंग खाण्यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते, ब्लड शुगर कमी होते, लवंगातील मँगॅनीजमुळे हाडे मजबूत होतात, यातील युजेनॉल अँटीऑक्सिडेंटमुळे विविध कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते, पोटातील अल्सर बरा होतो, भूक लागते, अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच उलटी होणे, पोटातील गॅस, तोंडातून दुर्गंधी येणे या समस्येवर लवंग खाणे फायदेशीर असते.

1) यकृताचे आरोग्य सुधारते –
लवंगात असणारे युजेनॉल कंपाऊंड हे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे यकृताचे कार्य सुधारते, लिव्हरमधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो त्यामुळे यकृताच्या विविध आजारांना दूर ठेवण्यास लवंग उपयुक्त असते. तसेच यकृत सिरोसिस पासूनही रक्षण होण्यास मदत होते.

2) मँगॅनीजचा उत्तम स्रोत –
मेंदूचे कार्य राखण्यासाठी आणि हाडे मजबूत होण्यासाठी मँगॅनीज ह्या खनिजाची आवश्यकता असते. लवंग मध्ये मँगॅनीजचे भरपूर प्रमाण असते.

3) उपयुक्त अँटीऑक्सिडेंट्स मिळतात –
लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. यामध्ये युजेनॉल (eugenol) ह्या अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त आढळते. या अँटिऑक्सिडंटमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपले रक्षण होते.

4) कर्करोगापासून संरक्षण होते –
अनेक संशोधनातून असे सिध्द झाले आहे की, लवंगातील अँटीऑक्सिडेंटमुळे कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते. लवंगातील कार्यकारी घटक म्हणजे ‘युजेनॉल’ हे सुध्दा अँटी-कॅन्सर गुणधर्माचे आहे. लवंगामुळे अन्ननलिकेचा कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोग यांपासून रक्षण होण्यास मदत होते.

5) अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात –
लवंगात असणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ई-कोलाईसारख्या अनेक बॅक्टेरिया नष्ट होतात. तसेच लवंगा ह्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करीत असल्याने लवंग खाण्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होऊन तोंडचे आरोग्य राखण्यास मदत होते.

6) रक्तातील साखर कमी करते –
संशोधनात असे दिसून आले आहे की लवंगामध्ये आढळणारी संयुगे ही रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. तसेच लवंगातील उपयुक्त घटकांमुळे इन्सुलिनची निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राखली जाते. अशाप्रकारे लवंग ही प्री-डायबेटिक रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. डायबेटिसविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

7) हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर –
लवंगात असणाऱ्या युजेनॉल घटकांमुळे हाडांची घनता वाढून हाडे मजबूत होतात. त्यामुळे लवंग खाण्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचा (ऑस्टिओपोरोसिसचा) धोका कमी होतो. याशिवाय लवंगामध्ये मॅंगनीज देखील भरपूर प्रमाणात असते. मॅंगनीज हे खनिज, हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी लवंग जास्त फायदेशीर ठरतात.

8) पोटातील अल्सरमध्ये उपयुक्त –
लवंगामध्ये आढळणाऱ्या संयुगांमुळे गॅस्ट्रिक श्लेष्माची (gastric mucus) निर्मिती होत असल्याने पोटातील अल्सर बरा होण्यास मदत होते. त्याचबरोबर अल्सर होण्यापासून दूर ठेवण्यास लवंग खाणे फायदेशीर असते. अल्सरविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

लवंगा खाण्याचे आयुर्वेदिक फायदे –

आयुर्वेदानेही लवंग मधील औषधी गुणधर्माविषयी भरपूर महत्व सांगितले आहे. लवंगमुळे कफ व पित्त दोष कमी होतात, रक्तविकार, श्वासरोग यामध्ये लवंग गुणकारी असते. यामुळे भूक लागून अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच उलटी होणे, पोटातील गॅस, मुख दुर्गंधी, उचकी या त्रासमध्ये लवंग उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.

लवंग आणि घरगुती उपाय –

  • लवंग खाण्यामुळे भूक वाढण्यास व घेतलेल्या आहाराचे योग्यप्रकारे पचन होण्यास मदत होते.
  • पाण्याबरोबर लवंग बारीक वाटून त्याचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी व मायग्रेनचा त्रास कमी होतो.
  • दात दुखत असल्यास लवंग तेलात कापसाचा बोळा भिजवून तो बोळा दुखणाऱ्या दात किंवा दाढेजवळ धरावा. यामुळे दातदुखी दूर होते.
  • तोंडातून दुर्गंधी येत असल्यास लवंग तोंडात ठेऊन चघळत राहावे.
  • सांधेदुखीमध्ये लवंग तेल हे दुखणाऱ्या सांध्यांवर लावावे.

एका दिवसात किती लवंग खाऊ शकतो..?

एका दिवसात प्रौढ व्यक्तीने फक्त 2 ते 3 लवंगा खाव्यात. यापेक्षा अधिक लवंगा खाणे टाळावे.

लवंगातील पोषकघटक – Cloves Nutritional contains :

एक चमचा किंवा 2.1 ग्रॅम लवंगमधून मिळणारी पोषकतत्वे.

  • मॅंगनीज = 1.263 mg
  • कॅलरीज = 6 kcal
  • प्रोटीन = 0.13 g
  • कार्बोहाइड्रेट = 138 g
  • फॅट = 0.27 g
  • फायबर = 0.7 g

लवंग खाण्याचेे तोटे व दुष्परिणाम – Side effects of Cloves in Marathi :

आहारातून लवंग खाणे, लवंग पावडर किंवा लवंग चावून खाणे हे शरीरासाठी फारसे नुकसानकारक नसते. तसेच लवंग वैगेरे घालून बनवलेला चहाही धोकादायक नसतो. लवंगा खाण्यामुळे काही विशेष असे दुष्परिणाम होत नाहीत. मात्र लवंग तेल पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे लवंग तेलाचा वापर हा बाह्य वापरासाठी म्हणजे त्वचेवर लावण्यासाठीचं होणे अपेक्षित आहे.

लवंग तेल त्वचेला लावल्यास काही विशेष दुष्परिणाम होत नाहीत. मात्र काहीजणांना यामुळे जळजळ किंवा एलर्जीक रिअक्शन होऊ शकते. त्याचप्रमाणे लवंग तेलाचा वापर तोंडाच्या आत म्हणजे दात, हिरड्या, गाल यांच्यावर केल्यास तेथे जळजळ वैगेरे त्रास होऊ शकतात. लवंगाचे तेल पिण्यामुळे यकृत निकामी झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे लवंग तेल हे पिण्यासाठी वापरू नये.

लवंगा कुणी खाऊ नये..?

जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर अशावेळी लवंग खाणे टाळले पाहिजे. कारण Warfarin, aspirin, clopidogrel, dipyridamole किंवा ticlopidine यासारखी औषधे घेत असल्यास लवंग खाण्यामुळे रक्त पातळ होऊन ब्लिडींग होण्याचा धोका वाढतो.

त्याचप्रमाणे मधुमेही रुग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लवंग खाऊ नये. कारण लवंग खाण्यामुळे रक्तातील साखर कमी होत असते. डायबेटिक रुग्णांमध्ये एकाएकी साखर कमी होऊन धोकादायक स्थिती उद्भवू शकते. यासाठी मधुमेही रुग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लवंग खाऊ नये.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..
जवस खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

3 Sources

In this article information about Cloves health benefits, Side effects and home remedies in Marathi. This Article is written by Dr. Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...