पित्त व डोकेदुखी –
अनेकांना पित्त आणि डोकेदुखी यांचा त्रास वारंवार होत असतो. सतत तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बाहेरचे पदार्थ खाणे, अधिक प्रमाणात चहा-कॉफी पिणे, अपुरी झोप, मानसिक ताण, वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर अशा अनेक कारणांनी पित्ताचा त्रास होऊ लागतो. अशा वाढलेल्या पित्तामुळे मग डोकेदुखी सुरू होते.
पित्तामुळे डोकेदुखी होण्याची कारणे –
- तिखट, तेलकट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्याची सवय, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे,
- वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे,
- उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याची सवय,
- तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारखी व्यसने करणे,
- मानसिक तणाव, राग यांमुळे,
- वरचेवर डोकेदुखीच्या किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या घेत राहिल्यामुळे [4],
- अपुरी झोप किंवा अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.
अशावेळी पित्त वाढते व त्यामुळे डोकेदुखी, ऍसिडिटी, छातीत जळजळ होणे, अल्सर यासारखे त्रास होऊ लागतात.
पित्तामुळे डोकेदुखी झाल्यास करायचे घरगुती उपाय –
- पित्तामुळे डोके दुखत असल्यास आल्याचा तुकडा घेऊन तो चांगला चावून खावा.
- वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्यानेही पित्त डोकेदुखी कमी होण्यासाठी मदत होते.
- पित्तामुळे डोकेदुखी झाल्यास काही वेळ झोप घ्यावी. यामुळेही आराम मिळून डोकेदुखी थांबते.
- पित्तामुळे डोकेदुखी झाल्यास पुरेसे पाणी प्यावे. शरीरात पाणी कमी झाल्यामुळेही अनेकदा डोकेदुखी होऊ शकते तसेच पाण्यामुळे पित्तही कमी होण्यास मदत होते.
- कपाळाला बर्फाचा शेक दिल्यामुळेही पित्तामुळे होणारी डोकेदुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते.
असे घरगुती उपाय पित्त व डोकेदुखी यावर उपयोगी ठरतात.
हे सुध्दा वाचा – अर्धे डोके दुखणे याची कारणे व उपचार जाणून घ्या.
वारंवार पित्त आणि डोकेदुखी होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा.
- वेळेवर जेवण घ्या. अधिक वेळ उपाशी राहू नका.
- दिवसभरात पुरेसे पाणी म्हणजे किमान 7 से 8 ग्लास पाणी प्यावे.
- दररोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातील ग्लासभर पाणी प्यावे.
- मसालेदार पदार्थ, तेलकट–तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
- चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
- स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
- जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
- नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
- मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
- तंबाखू, गुटखा, सिगरेट, बीडीचे व्यसन करणे टाळा.
- वारंवार डोकेदुखी होत असल्यास उठसुठ वेदनाशामक गोळ्या घेणे टाळा.
अशी काळजी घेतल्यास पित्ताचा त्रास आणि डोकेदुखी होणार नाही.
हे सुध्दा वाचा – अंगावर पित्त उठणे याची कारणे व उपचार जाणून घ्या.
Read Marathi language article about Pitta Headache causes and home remedies. Last Medically Reviewed on February 20, 2024 By Dr. Satish Upalkar.