झोपेच्या तक्रारी –
अनेकजण आजकाल झोपेच्या तक्रारीमुळे त्रस्त आहेत. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होते, आळस येतो, सुस्ती येते आणि कामात लक्ष लागत नाही. तसेच झोपेच्या तक्रारीचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत असतो.
रोज किती तास झोप झाली पाहिजे?
अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. शरीर लवकर थकते. याचा परिणाम तब्येतीवर होत असतो. यासाठी दररोज पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. मोठ्यांना सात ते आठ तासांची दररोज झोप गरजेची असते. तर मुलांना 8-10 तास आणि लहान बालकांना 14 तासांपर्यंत झोपेची आवश्यकता असते.
चांगली झोप येण्यासाठी हे करावे उपाय –
1) झोप लागण्यासाठी नियमित व्यायाम करा.
पुरेसा व्यायाम आणि शारीरिक हालचालींमुळे शरीर रात्री थकते त्यामुळे लगेच व चांगली झोप लागते. त्यामुळे रात्री चांगली झोप येण्यासाठी नियमित व्यायाम करावा.
2) रात्री झोप येण्यासाठी दिवसा झोपणे टाळावे.
दिवसा झोप घेतल्याने रात्री जागरण होत असते. यासाठी रात्री चांगली झोप येण्यासाठी दिवसा झोपणे टाळले पाहिजे.
3) चांगली झोप लागण्यासाठी दररोज वेळेवर झोपावे.
रोजची झोपण्याची वेळ निश्चित करावी. रोज रात्री ठराविक वेळी झोपण्याची आणि ठराविक वेळेला उठण्याची सवय लावावी. यामुळे झोप पूर्ण होते व झोपेच्या तक्रारी दूर होतात.
4) बेडरूममध्ये झोपेचे वांतावरण असावे.
चांगली झोप येण्यासाठी बेडरूम शांत असावी तसेच आरामदायक बेड व कव्हर्स असाव्यात. यामुळे आराम वाटून लगेच झोप लागण्यासाठी मदत होते.
5) गॅझेट्सचा मर्यादित वापर करा.
स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टीव्ही अशा उपकरणांचा गरजेपुरता वापर करणे आवश्यक आहे. कारण अशा उपकरणाच्या स्क्रीनमधून येणाऱ्या प्रकाशाचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होत असतो. त्यामुळे झोपेच्या तक्रारी सुरू होतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टीव्ही अशा उपकरणांचा वापर करू नका.
6) झोपण्यापूर्वी चहा, कॉफी पिणे टाळा.
झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफीसारखे उत्तेजक पेये पिऊ नका. कारण अशा पेयांमुळे झोप पळून जाते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चहा कॉफी पिणे टाळले पाहिजे.
7) रात्री हलका आहार घ्यावा.
रात्री पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळावेत. कारण यामुळे पचनक्रियेवर ताण पडत असतो. तसेच गॅसेस वैगेरे समस्या होऊन झोपल्यावर अस्वस्थ वाटू लागते. यासाठी रात्री हलका आहार घ्यावा. तसेच झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवण घ्यावे. जेवल्यानंतर लगेच झोपू नये.
8) कसलाही मानसिक ताण घेऊ नका.
ताणतणाव, चिंता, अतिविचार यांमुळे झोप उडते. त्यामुळे चांगली झोप लागण्यासाठी असा कोणताही मानसिक ताण घेऊ नका. यासाठी झोपण्यापूर्वी आवडते पुस्तक वाचणे, दीर्घ श्वास घेणे आणि ध्यान करणे हे उपायही उपयुक्त आहेत.
छान झोप येण्यासाठी 4 घरगुती उपाय –
- झोपण्याच्या आधी अर्धा तास पायाच्या तळव्यांना खोबरेल तेल लावून मालीश करावी. हा घरगुती उपाय झोप येण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
- झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी ग्लासभर दुधात एक चमचा मध घालून प्यावे. या घरगुती उपायामुळेही रात्री चांगली झोप लागण्यासाठी मदत होते.
- झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील ताण कमी होऊन चांगली झोप येण्यास मदत होते.
- झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावून हलकी मालीश केल्यास चांगली झोप लागण्यास मदत होते.
हे सुध्दा वाचा – पोट साफ होण्यासाठी उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about tips for Good Sleep. Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.