स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic Cancer) :
आपल्या शरीरातील स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातील पेशींमध्ये होणाऱ्या कॅन्सरला स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic Cancer) असे म्हणतात. बहुतेकवेळा स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान हे गंभीर स्थितीमध्ये कॅन्सर गेल्यावरच दिसून येते तसेच इतर कर्करोगांच्या मानाने हा कर्करोग लवकर पसरतो त्यामुळे स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे.
आपल्या शरीरात मध्यभागी जठर व लहान आतड्याच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. पचनक्रियेस आवश्यक असणारे अनेक महत्त्वाचे पाचक स्त्राव व इन्सुलिन यांची निर्मिती स्वादुपिंडातून होत असते. या ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या पाचक स्त्रावामुळे आहारातून घेतलेले कर्बोदके (carbohydrates), स्निग्ध पदार्थ (fats) आणि प्रथिने (protenis) यांचे पचन होण्यास मदत होते. तर इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. यामुळेच जर पुरेसा इन्सुलिन स्त्राव निर्माण होत नसल्यास मधुमेह (डायबेटिस) हा आजार होत असतो. अशाप्रकारे पचनसंस्थेच्या कार्यात स्वादुपिंडाची महत्वाची भूमिका असते.
स्वादुपिंड कर्करोग म्हणजे काय..?
स्वादुपिंडात होणारा कर्करोग म्हणजे ‘स्वादुपिंडाचा कर्करोग’. स्वादुपिंडाचे अनेक आजार असून यापैकी स्वादुपिंडाचा कॅन्सर हा सर्वात प्रमुख आजार आहे. वयाच्या 45 शी नंतर सर्वांनाच याचा धोका असून त्यातही साठ वर्षे व त्यापुढील वयाच्या व्यक्तीमध्ये याचे प्रमाण अधिक आहे तर स्त्रियांपेक्षा पुरुषांना हा कर्करोग जास्त प्रमाणात होतो. स्वादुपिंडाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो याविषयीची निश्चित अशी कारणे आजही अज्ञातचं आहेत. त्याची काही निमित्त कारणे पुढे दिलेली आहेत.
स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची कारणे (Pancreatic cancer causes) :
- प्रामुख्याने स्वादुपिंडाच्या पेशींमध्ये बदल होऊन नॉर्मल पेशींचा मृत्यू होऊन विकृत पेशींची वाढ होऊन स्वादुपिंडात कर्करोगाच्या गाठी निर्माण होतात.
- धूम्रपान, सिगारेटच्या व्यसनांमुळे स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
- दारूच्या व्यसनांमुळे स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
- काही आजारांमुळे जसे डायबेटीस असल्यास, क्रॉनिक स्वादुपिंडाला सूज असल्यास किंवा यकृताच्या विकारांमुळे स्वादुपिंडाचा कॅन्सर होऊ शकतो.
- लठ्ठपणामुळे,
- व्यायामाचा आभाव, बैठी जीवनशैली,
- अयोग्य आहारामुळे, जसे तेलकट, चरबीयुक्त फॅट वाढवणारे पदार्थ अधिक खाणे,
- आहारातील हिरव्या पालेभाज्या, फळे यांच्या कमतरतेमुळे,
- आहारातून फळे किंवा भाज्या यांमधून कीटकनाशके शरीरात जाणे,
- औद्योगिक क्षेत्रातील कामाच्या ठिकाणी केमिकलचा संबंध येणे,
- तसेच अनुवंशिकतेने कुटुंबामध्ये स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचा इतिहास असणे यासारख्या कारणांमुळे स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक वाढतो.
सुरवातीच्या अवस्थेत स्वादुपिंडाच्या कॅन्सरची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत. मात्र कॅन्सर जसजसा पुढील स्टेजमध्ये पोहचतो तेंव्हाच त्याची लक्षणे दिसू लागतात म्हणून स्वादुपिंडाच्या कॅन्सरला ‘सायलेंट किलर’ असेही ओळखले जाते. कोणत्याही कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेतच निदान व उपचार होणे गरजेचे असते.
स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे (Pancreatic cancer symptoms) :
स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये सुरवातीच्या अवस्थेत खालील लक्षणे जाणवू शकतात.
- भूक न लागणे,
- वजन कमी होणे,
- पोटाच्या मधल्या व आजूबाजूला वरच्या भागात दुखते, तेव्हा पाठही दुखते.
- कावीळ होणे, डोळे व त्वचा पिवळी होणे,
- डिप्रेशन नैराश्य जाणवणे अशी काही लक्षणे सुरवातीला असू शकतात.
डॉक्टरांकडे कधी जावे..?
वेळीच कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचे निदान झाल्यास योग्य उपचारांनी कॅन्सरवर मात करता येणे शक्य असते. त्यामुळेचं प्रत्येकाने आजकाल आपल्या आरोग्याच्यादृष्टीने सजग राहणे गरजेचे बनले आहे. भूक मंदावणे, वजन कमी होणे, पोटात दुखणे आणि कावीळ अशी लक्षणे असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासावर निदान व उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे.
स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान (Pancreatic cancer diagnosis) –
भूक मंदावणे, वजन कमी होणे, पोटात दुखणे आणि कावीळ अशी लक्षणे असल्यास स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या निदानासाठी आपले डॉक्टर खालील तपासण्या करण्यास सांगू शकतात,
CT स्कॅन किंवा MRI स्कॅन तपासणी –
सीटी स्कॅन आणि एमआरआय याद्वारे स्वादुपिंडात गाठी आहेत का ते तपासले जाते तसेच कॅन्सर असल्यास तो किती पसरला आहे हेही कळण्यास यांमुळे मदत होते.
एण्डोस्कोपी तपासणी –
यामध्ये एक कॅमेरा जोडलेली पातळ रबरी नळी तोंडाद्वारे पोटात घालून स्वादुपिंड भागातील स्थिती पाहिली जाते. त्याठिकाणी गाठ असल्यास बायोप्सी निदान करण्यासाठी छोटासा तुकडा काढून ती गाठ कॅन्सरची आहे की नाही ते तपासले जाते.
याशिवाय अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी तपासणी आणि CA19-9, बिलीरुबिन यासारख्या रक्तांच्या काही तपासण्याही स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या निदान करण्यासाठी कराव्या लागू शकतात.
स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे वर्गीकरण (Pancreatic cancer stages) –
स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान झाल्यास त्याचे पुढील चार स्टेजमध्ये वर्गीकरण केले जाते.
Stage 1 – यात कॅन्सरच्या गाठी फक्त स्वादुपिंडातच असतात.
Stage 2 – यात कॅन्सर हा स्वादुपिंड आणि त्याच्या जवळच्या जठर (पोटाची पिशवी), पित्तनलिका, आतडे या भागातही पसरलेला असतो.
Stage 3 – यात कॅन्सर हा स्वादुपिंड, त्याच्या जवळच्या अवयवांत आणि महत्वाच्या रक्तवाहिन्यांतही पसरलेला असतो.
Stage 4 – यात कॅन्सर हा स्वादुपिंड, त्याच्या जवळच्या अवयवांत आणि रक्तातून यकृत (Liver) यासारख्या महत्वाच्या अवयवातही पसरतो.
स्वादुपिंड कर्करोग आणि उपचार (Pancreatic cancer treatment)
स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील उपचार हे कॅन्सरच्या स्टेजवर अवलंबून असतात. कॅन्सरच्या पेशी नष्ट करणे व कॅन्सरचा प्रसार थांबवणे हे दोन मुख्य उद्देश उपचारात असतात. उपचार करताना रुग्णाचे वजन कमी होत जाणे, अशक्तपणा, आतडे अडकणे, पोटदुखी, मधुमेह किंवा यकृत निकामी होणे यासारख्या अनेक Complications यामुळेही या कॅन्सरच्या उपचारामध्ये अडथळा येऊ शकतो. स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील उपचारात ऑपरेशन (सर्जरी), रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी यांचा अंतर्भाव होतो.
ऑपरेशन (Surgery) –
सर्जरी ही स्वादुपिंडाच्या कॅन्सरवरील प्रमुख चिकित्सा आहे. कॅन्सरच्या गाठी स्वादुपिंडात असल्यास म्हणजे कर्करोग कमी प्रमाणात असणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या स्टेजमध्ये सर्जरीचा पर्याय निवडला जातो. यात स्वादुपिंडाच्या हेड आणि नेक भागात कॅन्सरच्या गाठी असल्यास स्वादुपिंडाचा कर्करोगग्रस्त भाग आणि त्याबरोबरच लहान याआतड्यांचा पहिला भाग व पित्तनलिकाही सर्जरीद्वारे काढावी लागते या ऑपरेशनला व्हिपल्स ऑपरेशन्स (Whipples Operations) या नावाने ओळखले जाते.
रेडिएशन थेरपी (Radiation Therapy) –
स्वादुपिंडाचा कॅन्सर इतर ठिकाणी पसरलेला असल्यास रेडिएशन थेरपीचा पर्याय निवडला जातो. यामध्ये कॅन्सरच्या पेशी रेडिएशन मुळे नष्ट केल्या जातात.
किमोथेरपी (Chemotherapy) –
काहीवेळा आपले डॉक्टर सर्जरी, रेडिएशन यासारख्या उपचाराबरोबरच किमोथेरपीचा एकत्रित वापरतात. किमो औषधांमुळे कॅन्सरग्रस्त पेशी नष्ट केल्या जातात तसेच त्यांची वाढही रोखली जाते.
सुरवातीच्या अवस्थेत स्वादुपिंडाच्या कॅन्सरची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत. कारण स्वादुपिंड कर्करोगाच्या पोटात दुखणे, कावीळ, वजन कमी होणे यासारख्या सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्षचं होण्याची शक्यता अधिक असते यामुळे या कॅन्सरचे निदान होईपर्यंत तो गंभीर अवस्थेत पसरलेला असतो. मात्र कोणत्याही कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेतच निदान व उपचार होणे गरजेचे असते. गंभीर अवस्थेतील स्वादुपिंडाचा कॅन्सर हा उपचाराच्यादृष्टीने खूपच असाध्य असतो त्यामुळेचं स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक आहे.
स्वादुपिंडाचा कॅन्सर होऊ नये म्हणून घ्यायची काळजी –
- धूम्रपान, सिगारेट यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे,
- मद्यपान, दारूचे व्यसन करणे टाळावे,
- नियमित व्यायाम करावा, दररोज किमान 30 मिनिटे तरी व्यायामासाठी द्यावीत.
- वजन आटोक्यात राहील याकडे लक्ष द्यावे. वजन कमी करण्यासाठीचे उपाय जाणून घ्या..
- मधुमेह असल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे, योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी याद्वारे मधुमेह नियंत्रित ठेवावा.
- चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ भरपूर प्रमाणात खाणे टाळावे.
- आहारात विविध भाज्या, फळे यांचा समावेश अधिक असावा.
- बाजारातून आणलेली फळे, भाज्या स्वच्छ धुवुनच खावीत कारण यावर भरपूर कीटकनाशके फवारलेली असतात.
- फ्लॉवर, कोबी ह्या भाज्या खाणे टाळावे कारण यावर फवारणी केलेली कीटकनाशके भरपूर प्रमाणात असतात.
- सेंद्रिय शेतीतून पिकवलेला शेतीमाल खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे.
- कुटुंबामध्ये कोणाला स्वादुपिंडाचा कर्करोग झालेला असल्यास विशेष दक्षता बाळगून नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
- पोटात दुखणे किंवा कावीळ अशी लक्षणे असल्यास आपल्या डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासावर निदान व उपचार करून घ्यावे.
- उठसूट गोळ्या खाणे किंवा स्वतःच्या मर्जीने मेडिकल स्टोअर्समधून औषधे आणून परस्पर उपचार करणे टाळावे.
- कावीळ झाल्यास घरगुती उपचार करीत न बसता, आपल्या डॉक्टरांकडून कावीळीचे निदान व उपचार करून घ्यावेत. कावीळविषयी माहिती जाणून घ्या..
हे सुद्धा वाचा..
- स्वादुपिंडाला सूज येण्याची कारणे व उपचार
- मधुमेह (डायबेटीस) आणि उपचार माहिती
- लिव्हर कॅन्सरची कारणे, लक्षणे आणि उपचार
- ब्लड कॅन्सरची कारणे, लक्षणे आणि उपचार
Read Marathi language article about Pancreatic cancer causes, symptoms, diagnosis, treatments and prevention. Last Medically Reviewed on February 20, 2024 By Dr. Satish Upalkar.