रक्ताचा कर्करोग होण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Blood cancer information in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

रक्ताचा कर्करोग – Blood Cancer

रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया (Leukemia) असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो मात्र 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. ऍक्युट आणि क्रोनिक असे ब्लड कॅन्सरचे मुख्य दोन प्रकार आहेत. याशिवाय ल्यूकेमिया, लिंफोमा आणि मायलोमा असेही ब्लड कॅन्सरचे प्रकार (Blood cancer types) होतात.

ब्लड कॅन्सर असा होतो :
आपल्या रक्तातील पेशींची सतत झीज होत असते व त्या पेशी मृत होऊन त्याठिकाणी नवीन पेशी निर्माण होत असतात. आपल्या शरीरात हाडांच्या पोकळीतील ‘बोन मॅरो’मध्ये रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या रक्तातील पांढऱ्या पेशींची (WBC) निर्मिती होत असते. ब्लड कॅन्सरमध्ये हे ‘बोन मॅरो’ व्यवस्थित कार्य करीत नाही. त्यातून विकृत कॅन्सरजन्य पांढऱ्या पेशी निर्माण होत असतात. या विकृत झालेल्या पांढर्‍या पेशी मृत पावत नाही व त्या तशाच रक्तात साठत जातात. त्यामुळे ब्लड कॅन्सरमध्ये या विकृत पांढर्‍या पेशींची संख्या रक्तात वाढते. अशा प्रकारे रक्ताचा कर्करोग होत असतो.

ब्लड कॅन्सरची अशी असतात लक्षणे (Blood cancer Symptoms) :

रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे ही त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळी असू शकतात. ब्लड कॅन्सरची काही मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
• थंडी वाजून ताप येणे.
• ‎रात्रीचा घाम अधिक प्रमाणात येणे.
• ‎अशक्तपणा, अंगदुखी, सतत थकल्यासारखे, हात-पाय गळून गेल्यासारखे वाटते.
• ‎रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्याने वारंवार इन्फेक्शन होऊन आजारी पडणे.
• ‎भूक न लागणे, वजन कमी होणे.
• ‎लिम्फ नोडस्, यकृत किंवा प्लीहामध्ये सूज येणे.
• ‎शरीरावर लाल-लाल चकते उटणे.
• ‎नाकातून रक्तस्राव होणे यांसारखी लक्षणे रक्ताच्या कॅन्सरमध्ये दिसू शकतात.

ब्लड कॅन्सर होण्याची ही आहेत कारणे (Leukemia Causes) :

ब्लड कॅन्सर नेमका कशामुळे होतो याची निश्चित अशी कारणे सांगता येणार नाहीत मात्र खालील घटक हे ब्लड कँसर होण्यासाठी सहायक ठरू शकतात.
• जेनेटिक कारणांमुळे, शरीरातील जीन्स किंवा गुणसूत्रांमधील बदलांमुळे विकृत पेशी निर्माण होऊन ब्लड कॅन्सर होऊ शकतो.
• ‎अनुवंशिक कारणांमुळे, रक्ताचा कर्करोग जर कुटुंबातील आजोबा, वडील, आई, भाऊ, बहीण यांना झालेला असल्यास अनुवंशिकतेमुळेही ब्लड कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.
• ‎किरणोत्सर्गाशी संपर्क, रेडिएशन किंवा एक्सरे किरणांच्या दुष्प्रभावातूनही रक्ताचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.
• ‎रासायनिक द्रव्यांशी सततचा संपर्क, भेसळयुक्त अन्न, केमिकलयुक्त आहारातून, विषारी वायूच्या संपर्कामुळे.
• ‎धूम्रपान, तंबाखू, मद्यपान यांच्या व्यसनामुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

रक्ताच्या कर्करोगाचे निदान असे केले जाते :

पेशंटमध्ये असलेली लक्षणे, पेशंट हिस्ट्री, रुग्णाची शारीरिक तपासणी करून डॉक्टर यांच्या निदानास सुरवात करतील. शारीरिक तपासणी दरम्यान लिम्फ नोड्‌समध्ये सूज आढळल्यास व इतर लक्षणांवरून या रोगात रक्ताची तपासणी महत्त्वाची ठरते.

ब्लड कॅन्सरच्या निदानासाठी रक्त तपासणी करून हिमोग्लोबिन व प्लेटलेटचे प्रमाण, पांढऱ्या पेशींचे प्रमाण तपासले जाते. ब्लड कॅन्सरमध्ये हीमोग्लोबिन व प्लेटलेट प्रमाण कमी होते तर पांढऱ्या पेशींचे प्रमाण अधिक वाढलेले असते.

याशिवाय बोन मॅरोचेही तपासणी केली जाईल. तसेच एक्स-रे, सी.टी.स्कॅन व एमआरआय स्कॅन यासारख्या टेस्टसुद्धा रक्ताच्या कर्करोगात केल्या जातात.

रक्ताच्या कॅन्सरवरील उपचार (Blood cancer Treatment) :

ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यानंतर कॅन्सरची स्टेज (Cancer stages) आणि रुग्णाची शारीरिक स्थिती विचारात घेऊन उपचार केले जातात. किमोथेरपी, रेडिएशन थेरेपी, स्टेम सेल ट्रान्सप्लांट यासारखे उपचार ब्लड कॅन्सरमध्ये केले जातात.

किमोथेरपी (Chemotherapy) – यामध्ये कँसरच्या पेशींना नष्ट करण्यासाठी गोळ्यांच्या स्वरूपात किंवा इंजेक्शनमधून विशिष्ट औषधे दिली जातात. ब्लड कॅन्सरच्या प्रकारानुसार एकचं औषध किंवा दोन-तीन औषधे एकत्र करुन दिली जातील.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

रेडिएशन थेरेपी (radiation therapy ) – यामध्ये X-RAY किंवा त्यापेक्षा जास्त प्रखर ऊर्जा किरणे वापरून ब्लड कैंसरच्या पेशी नष्ट केल्या जातात.

स्टेम सेल प्रत्यारोपण (Haematopoietic stem cell transplantation) – यामध्ये आधी कीमोथेरेपी किंवा रेडिएशन देऊन शरीरातील विकृत बोन मॅरोला नष्ट करतात त्यामुळे ब्लड कैंसरच्याही पेशी नष्ट होतात. त्यानंतर आपल्या शरीरातील स्वस्थ स्टेम सेल किंवा दुसऱ्याच्या शरीरातील (डोनर) स्टेम सेल आपल्या शरीरात ट्रान्सप्लांट केले जाते.

खालील कॅन्सरचीही माहिती जाणून घ्या..
तोंडाचा कर्करोग
पोटाचा कँसर
लिव्हर – यकृताचा कर्करोग
स्तनाचा कर्करोग