नाकाचे हाड वाढणे म्हणजे काय ..?
नाकाच्या आत असणाऱ्या टर्बिनेटमुळे नाकातून जाणारी हवा ही उबदार आणि ओलसर होते. जर हे नाकातील टर्बिनेट्स मोठे झाले तर ते नाकात जाणारी हवा रोखू शकतात. या समस्येला वैद्यकीय भाषेत टर्बिनेट हायपरट्रॉफी (Turbinate Hypertrophy) असे म्हणतात. तर बोलीभाषेत याला “नाकाचे हाड वाढणे” असे म्हणतात. या समस्येमुळे श्वासोच्छवासाची समस्या होऊ शकते, तसेच इन्फेक्शन आणि नाकातून रक्त येणे अशा समस्याही यामुळे होऊ शकतात.
नाकाचे हाड वाढणे याची लक्षणे –
नाकाचे हाड वाढल्याने नाकातून श्वास घेताना त्रास होऊ लागतो. तसेच यात खालील लक्षणे सुध्दा दिसून येतात.
- श्वास घेण्यास त्रास होणे,
- झोपेत घोरणे,
- झोपेत नाकातून श्वास न घेता तोंडाने श्वास घेणे,
- झोपेत तोंड उघडे ठेऊन श्वास घेत असल्याने तोंड कोरडे पडणे किंवा सकाळी घसा दुखू लागणे,
- वास ओळखण्याची क्षमता कमी होणे,
- कपाळावर दाब जाणवणे,
- चेहऱ्यावर सौम्य वेदना होणे,
- नाक वाहणे,
- नाक गच्च होणे,
यासारखी लक्षणे नाकाचे हाड वाढल्यास जाणवू शकतात.
नाकातील हाड वाढणे याची कारणे –
नाकाचे हाड वाढण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- सायनसचा त्रास असणे,
- जन्मजात समस्या,
- ऍलर्जीक राहिनाइटिस (allergic rhinitis),
- सर्दी, पडसे आणि खोकला,
- ऍलर्जी,
- हार्मोन्समधील असंतुलन,
- गर्भधारणा,
- वाढते वय,
अशा अनेक कारणांमुळे नाकाच्या ठिकाणी असणाऱ्या टर्बिनेटमध्ये दाब व सूज निर्माण होत असतो. त्यामुळे त्यांचा आकार वाढून नाकाचे हाड वाढण्याची समस्या निर्माण होते.
नाकाचे हाड वाढले याचे निदान कसे करतात ..?
नाकाच्या हाडाची तपासणी ENT स्पेशालिस्ट डॉक्टर करतात. यावेळी ते उपकरणाने नाकाच्या आत हाडांची वाढ तपासतील. तसेच काहीवेळा सीटी स्कॅन सारख्या इमेजिंग तपासण्या देखील कराव्या लागतात. या तपासण्यामुळे तुमची लक्षणे ही नाकातील वाढलेल्या हाडाची आहेत की नाकातील वाकड्या पडद्याची आहेत, याचे स्पष्ट निदान होते. त्यानुसार यावर उपचार ठरवले जातात.
नाकातील हाड वाढले असल्यास घ्यायची काळजी –
- अशा त्रासात ऍलर्जी निर्माण करणाऱ्या वस्तूंपासून दूर राहणे गरजेचे असते.
- ऍलर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टी म्हणजे धूळ, कचरा, पाळीव प्राण्यांचे केस, पाळीव प्राण्यांच्या केसातील कोंडा, परागकण इत्यादी गोष्टींपासून दूर राहा.
- घरातील हवा साफ होण्यासाठी Air filter चा वापर करू शकता.
- कोमट पाणी प्यावे.
- सिगारेट स्मोकिंगपासून दूर राहा.
नाकाचे हाड वाढणे यावर घरगुती उपाय –
- झोपताना नाकात देशी गाईच्या तुपाचे दोन थेंब टाका.
- रूमालावर निलगिरी तेल टाकून त्याचा वास हुंगावा.
- पाण्यात एक चमचा व्हिनेगर घालून ते मिश्रण गरम करून त्याची वाफ घ्यावी. हा घरगुती उपाय काही दिवस केल्यास नाकातील हाड वाढणे ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
- कांद्याच्या रसाचे एक किंवा दोन थेंब नाकात काही दिवस टाकल्याने नाकातील हाडाची वाढ कमी होते.
- भस्त्रिका प्राणायाम व अनुलोम विलोम नियमित केल्याने नाकाच्या हाडाची वाढ कमी होऊ शकते.
नाकाचे हाड वाढणे यावर आयुर्वेदिक उपचार –
नाकातील हाड वाढणे या आजाराचे आयुर्वेदात ‘नासाप्रतीनाह’ या नावाने वर्णन केले आहे. आयुर्वेदात नाकाचे हाड वाढणे यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. विशेषतः क्षारकर्म ही आयुर्वेदातील विशेष उपचारपद्धती नाकाचे हाड वाढणे यावर जास्त उपयोगी ठरत असल्याचे दिसून आले आहे. तसेच अणुतेल नस्य या आयुर्वेदिक औषधाचे दोन थेंब रोज रात्री नाकात टाकणेही उपयुक्त असते. याशिवाय आयुर्वेद तज्ञ डॉक्टर हे उपचारादरम्यान सीतोफलादी चूर्ण, तालिसादी चूर्ण ही कोमट पाण्यातून घ्यावी लागणारी औषधी चूर्णे देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर नाकातील हाड वाढणे ही समस्या असेल तर जवळच्या आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
नाकाचे हाड वाढणे यावरील उपचार –
नाकाची सूज कमी करण्यासाठी तसेच नाक मोकळे होण्यासाठी डॉक्टर काही औषधे देऊ शकतात.
तसेच वातावरण बदलामुळे होणारी ऍलर्जी कमी करण्यासाठी cetirizine, loratadine अशी औषधे ते देतील.
नाक मोकळे होण्यासाठीच्या औषधांचा परिणाम हा ब्लड प्रेशरवर होण्याची शक्यता असते. यासाठी नाक मोकळे होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही decongestants गोळ्या औषधे घेऊ नका.
शस्त्रक्रिया (Turbinate Hypertrophy Surgery) –
औषध उपचार उपयोगी पडत नसल्यास, नाकातील वाढलेल्या टर्बिनेटचा आकार कमी करण्यासाठी ENT डॉक्टर शस्त्रक्रिया करू शकतात. यासाठी पुढील तीन शस्त्रक्रिया केल्या जातात.
1) सबम्यूकोसल डायथर्मी (Submucosal diathermy) – या शस्त्रक्रियेमध्ये, टर्बिनेटच्या आत असलेल्या उतीना डायथर्मी needle वापरून उष्णतेने संकुचित करतात.
2) Inferior turbinate bone resection – या शस्त्रक्रियेमध्ये, खालच्या टर्बिनेटमधील हाडांचा एक भाग काढून टाकला जातो ज्यामुळे पुरेशी हवा नाकात जाऊ शकते.
3) Partial inferior turbinectomy – यामध्ये खालच्या टर्बिनेटमधील मऊ उती काढल्या जातात.
नाकात हाड वाढल्याने रुग्णाला काय त्रास होत आहे त्या लक्षणांचे स्वरूप तपासून त्यानुसार योग्य ती सर्जरीची पद्धत डॉक्टर निवडू शकतात. प्रत्येकाच्या नाकात साधारण तीन ते चार टर्बिनेट असतात. नाकाचे हाड वाढण्याची समस्या दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करून नाकातील सर्वच्या सर्व टर्बिनेट काढून टाकणेही योग्य नसते. नाकातील सर्व टर्बिनेट काढून टाकल्यास नाक कोरडे पडणे, नाक गच्च होणे अशा तक्रारी होऊ लागतात.
नाकातील हाड वाढण्यामुळे होणारे परिणाम –
नाकातून श्वास घेण्यास त्रास होणे, झोपेच्या तक्रारी सुरू होणे, वारंवार सायनसचा त्रास होऊ लागणे यासारखे त्रास नाकाचे हाड वाढण्यामुळे होऊ शकतात.
हे सुध्दा वाचा – नाकात मास वाढणे याची कारणे व उपचार जाणून घ्या.
Read Marathi language article about Turbinate Hypertrophy Causes, Symptoms, Home remedies and Treatments. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar..