लिंग ताठ न होणे किंवा नपुसंकता :
धावपळीचे जीवन, मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार, फास्टफूडचा अतिरेक, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांनी इतर आजारांप्रमाणेच लैंगिक समस्यामध्येही मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यापैकीच एक गंभीर समस्या म्हणजे नपुसंकता होय.
नपुसंकता म्हणजे काय..?
नपुसंकता म्हणजे सेक्सच्यावेळी शिस्नामध्ये ताठरता येत नाही. याला लिंग ताठ न होणे किंवा लिंग ताठरता कमी होणे असेही म्हणतात. लिंग ताठ न होण्याचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. या समस्येमुळे सेक्स दरम्यान लैंगिक समाधान न मिळाल्याने दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.
नपुंसकतेची समस्या कोणत्याही व्यक्तीच्या वैवाहिक आनंदाला नष्ट करून टाकते. नपुंसकता या लैंगिक समस्येला वैद्यकीय भाषेत Erectile Dysfunction (ED) किंवा impotence ह्या नावाने ओळखले जाते. नपुंसकत्व ही समस्या शारीरिक तसेच अनेकवेळा मानसिकचं असू शकते. लिंग ताठ कसे करावे असा अनेकांचा प्रश्न असतो.
लिंग ताठ न होण्याची कारणे :
सामान्यपणे सेक्सच्यावेळी लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे आपला मेंदू रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येत असते. त्यामुळे लिंग ताठ न होणे याची कारणे ही शरीर आणि मन अशी दोन्ही प्रकारची असू शकतात. शारीरिक कारणांमध्ये,
- जन्मजात लैंगिक अवयवात दोष असणे,
- जननेंद्रिय संबधी विकार,
- हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे,
- तसेच विशिष्ठ रोगांच्या दुष्परिणामामुळेही ही समस्या होऊ शकते उदाहरणार्थ मधुमेह (डायबेटीस), गालफुगी आजार (Mumps), इन्फेक्शन, ऍनिमिया, लठ्ठपणा, नाडीसंबंधी आजार, हृद्यरोग, उच्च रक्तदाब, स्क्लेरोसिस, कुपोषण, गनोरिया, ल्युकीमिया या रोगांच्या दुष्परिणामातून नपुसंकता उत्पन्न होऊ शकते.
- कंपवात (पार्किन्सन्स डिसीज), मल्टीपल स्क्लेरोसिस आजार,
- झोपेच्या तक्रारी,
- अत्यधिक दारूचे व्यसन, धुम्रपान – सिगारेटचे व्यसन, ड्रग्स व अमली पदार्थांच्या दिर्घकालीन व्यसनामुळे,
- प्रकृतीनुसार वयामध्ये वाढ झाल्याने, म्हातारपणामुळे शरीर क्षीण झाल्याने,
- तसेच मानसिक तनाव, डिप्रेशन, उच्च रक्तदाब यासारख्या रोगांवर घेतलेल्या औषधांच्या अतिवापर करणे अशा कारणांमुळे लिंग ताठ न होण्याची समस्या होऊ शकते.
लिंग ताठरता कमी होणे व मानसिक कारणे :
लिंग ताठरता कमी होणे याचे प्रमुख कारण हे मनाशीच संलग्न असते. जसे सेक्स संबंधी भीती, चिंता, तणाव, नैराश्य, लज्जा किंवा एकमेकांविषयी आकर्षण नसणे यासारख्या अनेक मानसिक कारणांमुळेही ही समस्या प्रामुख्याने होत असते. अनेकदा स्वतःमध्ये लैंगिक कमतरता आहे, मी माझ्या जोडीदाराला अपेक्षित लैंगिक सुख देऊ शकत नाही असे समजुन निराशेने अनेकजण ग्रासतात आणि आपण सेक्स करण्यास असमर्थ आहोत अशी स्वतःच धारणा करुन घेतात व या समस्येस बळी पडतात.
एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, जगातील जेवढे पुरुष स्वतःला नपुसंक समजतात त्यापैकी 95% पुरुष हे वास्तवतः नपुसंक नसतातच. त्यांच्या मनामध्येच न्युनगंडतेची भावना निर्माण झालेली असते आणि उरलेल्या 5% पुरुषांमध्ये प्रजनन अवयवांमध्ये दोष असल्याने त्यामध्येच खऱ्याअर्थाने नपुसंकता आढळते.
लिंग ताठ राहण्यासाठी उपचार (Erectile dysfunction treatment) :
नपुसंकतावरील उपचार हे त्याच्या मूळ कारणावर अवलंबून असतात. या समस्येवर सेक्सॉलॉजिस्ट हे तज्ञ डॉक्टर उपचार देतात. उपचारामध्ये डॉक्टर पेशंट बरोबर चर्चा करून योग्य सल्ला व मार्गदर्शन करतील. पेशंटमधील तणाव, भीती व शंका दूर करण्यावर त्यांचा भर असेल. याशिवाय काहीवेळा काही औषधेही देतील. टेस्टोस्टेरॉनची लेव्हल कमी असल्यास टेस्टोस्टेरॉन थेरपी दिली जाते. तसेच ते काही व्यायाम प्रकारही सांगतील.
लिंग ताठ होण्यासाठी उपाय :
लिंगात ताठरता नसणे यावर उपाय म्हणून विशिष्ट अशी Vacuum pumps साधने उपलब्ध आहेत. याच्या वापराने लिंगाजवळील रक्तप्रवाह वाढून लिंगात ताठरता येण्यास मदत होते. याशिवाय मसाज देखील उपयुक्त ठरतो. बोटांचा वापर करून ज्याप्रमाणे गाई-म्हशीचे दूध काढतात त्याप्रमाणे आपल्या बोटांनी लिंगाला मसाज करत ते बाहेर ओढत मसाज करावा. यामुळे त्याठिकाणी रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन लिंगाचे स्नायूही मजबूत होण्यास मदत होते. लिंग ताठ होण्यासाठी हा उपाय उपयोगी पडतो.
लिंग ताठ करण्यासाठी व्यायाम :
किगल व्यायाम प्रकारसुद्धा लिंग ताठ करण्यासाठी उपयोगी पडतो. लघवी करताना याची प्रॅक्टिस करावी. यासाठी लघवी करताना मध्येच लघवी रोखून धरावी. त्यानंतर हळूहळू थोडी लघवी सोडून पुन्हा रोखून धरावी. असे दोन ते तीन वेळा करावे. यामुळे लिंगाजवळील मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय एरोबिक व्यायाम व योगासुद्धा यावर उपयुक्त असतो.
नपुसंकता समस्या दूर करण्यासाठी उपाय :
योग्य पोषक आहार, व्यायाम, मानसिक तानावापसून दूर रहाणे आणि जीवनशैलीत सुधार केल्यास या समस्येपासून दूर राहता येईल.
- सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा.
- दोन्ही जोडीदारांनी एकमेकांवर दोषारोप न करता एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी जोडीदाराचं सहकार्य, एकमेकांशी संवाद करणे गरजेचे आहे.
- नपूसंकता ही सुद्धा इतर आजारांप्रमाणे एक समस्या आहे. आपण जसे ताप, खोकला झाल्यावर डॉक्टरांकडे जातो तसेच या समस्येसाठीही न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगावी.
- सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला, औषध उपचार यांचा खूप चांगला उपयोग या समस्येत होतो.
- मानसिक ताण तणाव, कामाचा ताण, नैराश्य दूर करण्यासाठी प्राणायाम, योगा, ध्यानधारणा करावी.
- दररोज आठ तासांची झोप घ्यावी. पुरेशी झोप ना मिळल्यास शरीरात थकवा जाणवतो आणि काम करण्यात आळस येतो. झोप व्यवस्थित न झाल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलनही बिघडते.
- नियमित व्यायाम करावा. यामुळे एकूणच शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते, यामुळे लिंगापर्यंत रक्ताचा पुरवठा योग्यरीतीने होतो. व्यायामामुळे वजनही आटोक्यात राहते.
- योग्य पोषक आहार सुरू करावा, आहारात मोड आलेली कडधान्ये, प्रोटिन्सयुक्त आहार, दूध, तंतुमय पदार्थ, सुकामेवा, लसूण, मांस, मासे, अंडी यांचा समावेश असावा.
- तेलकट पदार्थ, साखरेचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, चरबीयुक्त पदार्थ, कॉफी, चहा, फास्टफूड यापासून दूर राहावे.
- व्यसनामुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि यामुळे लिंगापर्यंत रक्ताचा पाहिजे तेवढा पुरवठा होत नाही त्यामुळे दारूचे व्यसन, सिगारेट स्मोकिंग, गुटखा, अमली पदार्थ यापासून दूर राहावे.
वरील उपयांचे अवलंब केल्यास आपण लैंगिक समस्येपासून दूर राहू शकाल.
हे सुद्धा वाचा – पुरुष वंध्यत्वाची कारणे व उपचार जाणून घ्या.
Read Marathi language article about Erectile Dysfunction Causes, Symptoms & Treatments. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 10, 2024.