Dr Satish Upalkar’s article about Hypothyroidism diet plan in Marathi.
हायपोथायरॉईडीझम – Hypothyroidism :
थायरॉईड ग्रंथीतून जेंव्हा पुरेशा प्रमाणात संप्रेरक तयार होत नाही तेंव्हा हायपोथायरॉईडीझम ही समस्या उद्भवते. हायपोथायरॉईडीझम असणाऱ्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा, हायपोथायरॉईडीझम मध्ये काय खावे व काय खाऊ नये याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.
हायपोथायरॉईडीझमची लक्षणे –
- वजन जास्त वाढणे,
- पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता),
- थंडी अधिक वाजणे,
- त्वचा कोरडी पडणे,
- केस कोरडे व पातळ होणे,
- मांसपेशी कमजोर होणे,
- अंग दुखणे,
- थकवा जाणवणे,
- सांध्यामध्ये वेदना होणे आणि सांधे जखडणे,
- हृदयाची स्पंदने मंद होणे,
- घाम कमी येणे,
- रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे,
- स्मरणशक्ती कमी होणे,
- नैराश्य जाणवणे (डिप्रेशन),
- स्त्रियांच्या मासिक पाळीत बदल होणे,
- वंध्यत्व समस्या होणे,
- आवाज बसणे,
अशी लक्षणे हायपोथायरॉईडीझममध्ये असतात.
हायपोथायरॉईडीझमचे निदान कसे केले जाते ..?
पेशंटमध्ये असणारी लक्षणे आणि तपासणी करून, डॉक्टर हायपोथायरॉईडीझमचे निदान करतील. निदान स्पष्ट करण्यासाठी काही रक्त चाचण्या करण्यास सांगतील. यासाठी TSH चाचणी आणि T4 थायरॉक्सिन चाचणी केली जाते. TSH पातळी वाढलेली असल्यास आणि T4 पातळी कमी असल्यास, हायपोथायरॉईडीझमचे निदान होते.
हायपोथायरॉईडीझम आणि उपचार –
हायपोथायरॉईडीझम मध्ये शरीरात स्वतःहून थायरॉईड हार्मोन्स तयार होत नसल्याने थायरॉईडची औषधे घ्यावी लागतात.या औषधांनी हायपोथायरॉईडीझमचा त्रास नियंत्रित ठेवला जातो.
हायपोथायरायडिझम आणि आहार पथ्य – Hypothyroidism diet in Marathi :
हायपोथायरॉईडीझमच्या रुग्णांनी फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटकांनी युक्त असा संतुलित आहार घ्यावा. हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांसाठी व्हिटॅमिन बी 12, आयोडीन, सेलेनियम, जस्त आणि प्रोबायोटिक्स हे अत्यंत महत्वाचे पोषकघटक असतात. दूध, अंडी, मांस, मासे आणि तीळ यांमध्ये व्हिटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात असते. याशिवाय दह्यामधील प्रोबायोटिक्स देखील उपयुक्त असते. हे सर्व पोषकघटक विचारात घेऊन हायपोथायरायडिझम रुग्णाचा आहार ठरवला जातो.
हायपोथायरायडिझम असल्यास काय खावे ..?
हायपोथायरायडिझमचा त्रास असणाऱ्यांनी आहारात हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, धान्ये, कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी यांचा समावेश केला पाहिजे.
हायपोथायरायडिझम मध्ये काय खाऊ नये ..?
हायपोथायरॉईडीझममुळे वजन वाढण्याची आणि रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. यासाठी चरबीयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ, साखरेचे गोड पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, फास्टफूड आणि जंकफूड असे पदार्थ हायपोथायरायडिझम रुग्णांनी खाऊ नयेत.
मुख्य म्हणजे ग्लूटेन असलेले पदार्थ खाणे टाळावेत. त्यामुळे हायपोथायरॉईडीझम असल्यास गहू आणि गव्हाचे पदार्थ खाऊ नयेत. तसेच कोबी, ब्रोकोली, पालक, स्ट्रॉबेरी, रताळी, सोयाबीन आणि शेंगदाणे यांसारखे पदार्थ देखील खाणे टाळले पाहिजे. कारण या पदार्थात थायरॉईडवर प्रतिकूल परिणाम करणारे गॉइट्रोजन हे घटक असते.
हे सुद्धा वाचा – हायपोथायरायडिझम वरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about Hypothyroidism diet chart in Marathi language. This Health Article is written by Dr Satish Upalkar.