कोलेस्टेरॉल –
कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा एक पदार्थ असतो. कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL) आणि वाईट (LDL) असे दोन प्रकार असतात. वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे हे आरोग्यासाठी धोकादायक असते. कारण रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्याने रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह अवरोधित होऊ लागतो. ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यास हार्ट अटॅक येतो. तर मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यास ज्यामुळे पक्षाघाताचा झटक (ब्रेन स्ट्रोक) येऊ शकतो.
कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणे –
कोलेस्टेरॉल वाढले आहे का, हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासणे आवश्यक असते. याशिवाय छातीत दुखणे, दम लागणे, पाय दुखणे, पाय थंड पडणे यासारखी लक्षणे सुध्दा कोलेस्टेरॉल वाढल्यावर जाणवू शकतात. अशावेळी छातीत दुखणे यासारख्या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते. तसेच थोडे चालल्यावर धाप लागत असल्यास तेही कोलेस्टेरॉल वाढल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे छातीत दुखणे, धाप लागणे, पाय दुखणे किंवा पाय थंड पडणे असे त्रास होत असल्यास ब्लड टेस्ट करून रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासले पाहिजे.
कोलेस्टेरॉलचे योग्य प्रमाण –
HDL हे चांगले कोलेस्टेरॉल 60 mg/dL पेक्षा अधिक आणि LDL हे वाईट कोलेस्टेरॉल 100 mg/dL पेक्षा कमी असले पाहिजे.
कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे –
- लठ्ठपणामुळे कोलेस्टेरॉल अधिक वाढते.
- बैठे काम किंवा व्यायाम न करण्यामुळे कोलेस्टेरॉल अधिक वाढते.
- चरबीयुक्त पदार्थ, मैद्याचे बेकरी प्रोडक्ट, साखरेचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड असे निकृष्ट पदार्थ वारंवार खाणामुळे कोलेस्ट्रॉल अधिक वाढते.
- तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशा व्यसनांमुळे कोलेस्टेरॉल अधिक वाढते.
- डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर किंवा हायपोथारॉईडचा त्रास असल्यास त्यामुळेही कोलेस्टेरॉल अधिक वाढते.
- आनुवंशिकतेमुळेही कोलेस्ट्रॉल जास्त वाढू शकते.
- मानसिक ताण यामुळेही कोलेस्टेरॉल अधिक वाढते.
जर तुम्ही लठ्ठ असाल किंवा तुम्हाला सिगारेट सारखी व्यसाने असल्यास किंवा तुम्हाला मधुमेह, बीपी यासारखे त्रास असल्यास तुम्ही नियमितपणे डॉक्टरांकडे जाऊन कोलेस्टेरॉल, ECG, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर अशा तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल टेस्ट विषयी अधिक माहिती जाणून घ्या..
कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी घ्यायची काळजी –
- वजन आटोक्यात ठेवावे.
- नियमित अर्धा तास तरी व्यायाम करावा. चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे, पायऱ्या चढणे, दोरी उड्या, मैदानी खेळ, योगासने असे व्यायाम प्रकार करावेत.
- मानसिक ताण तणावापासून दूर राहावे.
- चरबीयुक्त पदार्थ, मैद्याचे बेकरी प्रोडक्ट, साखरेचे पदार्थ, फास्टफूड,. जंकफूड असे निकृष्ट पदार्थ खाणे टाळावे.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, सुकामेवा यांचा अधिक समावेश करावा.
- तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
- डायबेटिस किंवा हाय ब्लड प्रेशर चा त्रास असल्यास ब्लड शुगर व ब्लड प्रेशर नियंत्रित राहील याची काळजी घ्यावी.
हे सुध्दा वाचा – कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीचे उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about High Cholesterol Symptoms and Causes. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.