मेथीची भाजी – Fenugreek leaves :
आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे खूप महत्त्व आहे म्हणूनच डॉक्टर आपणास हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात पण आपण जेंव्हा मेथीची भाजी बघतो तेंव्हा मात्र अनेकजण नाके मुरडतात. मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. मेथीच्या भाजीत असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यांना प्रतिबंध होण्यास मदत होतो.
मेथीच्या भाजीतील पोषकघटक :
शंभर ग्रॅम मेथीच्या भाजीत 4 ग्रॅम प्रथिने, 6 ग्रॅम कर्बोदके, 1ग्रॅम स्निग्ध पदार्थ, 0% कोलेस्टेरॉल, 1 ग्रॅम फायबर्स, 395 mg कॅल्शियम आणि 2 mg लोह हे पोषकघटक असतात आणि मेथीमध्ये व्हिटॅमिन-C आणि व्हिटॅमिन-A ही दोन्ही जीवनसत्त्वे मुबलक असतात.
मेथीच्या भाजीची इतर नावे :
शास्त्रीय नाव – Trigonella foenum-graecum
इंग्लिश नाव – Fenugreek Vegetable
हिंदी नाव – मेथी
मेथीच्या भाजीचे आरोग्यासाठी खूप फायदे असतात. मेथी भाजी खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, वाईट कोलेस्टेरॉल कमी होते व चांगले कोलेस्टेरॉल वाढते. त्यामुळे हार्ट अटॅक, पक्षाघात व हाय बीपी अशा आजारांचा धोका कमी होतो. मेथी भाजी वजन आटोक्यात ठेवते, रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. यातील फायबर्समुळे पोट साफ होते. मेथीची भाजी हिमोग्लोबिन वाढवते. तसेच बाळंतिणींना दूध येण्यासाठीही मेथीची भाजी फायदेशीर असते.
मेथीची भाजी खाण्याचे फायदे :
1) मेथीची भाजी हृदयाच्या आरोग्यासाठी हितकारी असते ..
मेथीची भाजी रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते व चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. यामुळे धमनीकाठिण्यता (Atherosclerosis), हार्ट अटॅक, पक्षाघात, हाय ब्लड प्रेशर या विकारांचा धोका कमी होतो. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मेथीची भाजी फायदेशीर ठरते. यासाठी ज्यांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे त्यांनी मेथीची भाजी जरूर खावी. वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याबरोबरच, ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये ठेवत असल्याने मेथीची भाजी ही हृदयाच्या आरोग्यासाठी हितकारी असते.
2) मेथीची भाजी मधुमेहाला दूर ठेवते ..
अयोग्य आहार, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे टाईप 2 प्रकारचा मधुमेह होण्याचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. त्यादृष्टीने मेथीची भाजी यावर खूप फायदेशीर ठरते. कारण मेथीच्या भाजीत असणाऱ्या फायबर्समुळे ब्लड शुगर कमी होते. मेथीची भाजी खाल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे टाईप 2 प्रकारच्या डायबेटीस पासून दूर राहता येते.मधुमेहाविषयी अधिक माहिती जाणून घ्या..
3) मेथीची भाजी वजन आटोक्यात ठेवते ..
लठ्ठपणामुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, हाय ब्लड प्रेशर, डायबेटिस अशा गंभीर आजारांचा धोका वाढतो. मेथीच्या भाजीत कॅलरीज कमी असतात तसेच यात असणाऱ्या फायबर्समुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
4) मेथी भाजी पचनक्रियेसाठी उपयुक्त असते ..
मेथीमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्याने पोट नियमित साफ होण्यास मदत होते. तसेच मेथीच्या भाजीच्या सेवनाने भूक व पचनक्रिया सुधारते. पोट साफ न होण्याची कारणे व उपाय वाचा..
5) मेथीची भाजी कॅन्सरपासून रक्षण करते ..
मेथीच्या भाजीत असणाऱ्या उपयुक्त अँन्टिऑक्सिडंटमुळे स्तनांचा कर्करोग आणि आतड्यांचा कर्करोगापासून रक्षण होण्यास मदत होते.
6) मेथीची भाजी मासिक पाळीच्या तक्रारी दूर करते ..
अनियमित मासिक पाळी असणे किंवा मासिक पाळीत वेदना होणे अशा तक्रारी होत असल्यास आहारात मेथीच्या भाजीचा समावेश करावा.
7) मेथीची भाजी बाळंतिणींसाठी उपयुक्त असते ..
मेथीची भाजी खाण्यामुळे बाळंतिणींना दूध जास्त येण्यास मदत होते. आईचे दूध वाढण्यासाठी मेथीची भाजी उपयुक्त असते तसेच यामुळे बाळंतिणींत लोह व कॅल्शियमसुध्दा वाढते. त्यामुळे बाळंतिणींच्या आहारात मेथीच्या भाजीचा जरूर समावेश करावा. बाळंतिणींची काळजी कशी घ्यावी याची माहिती वाचा..
मेथीची भाजी खाण्याचे तोटे –
मेथीची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र काहीजणांना मेथीची भाजी खाण्यामुळे एलर्जीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः IBS ची समस्या असणाऱ्यांनी मेथीची भाजी अधिक प्रमाणात खाल्यास पोटात वेदना होणे, अतिसार ह्यासारख्या समस्या होऊ शकतात. कारण यात फायबर्सचे प्रमाण अधिक असते.
गरोदर स्त्रियांनी अधिक प्रमाणात मेथी भाजी खाल्यास अकाली प्रसूती होण्याचा किंवा गर्भस्त्राव होण्याची धोका वाढत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे गरोदरपणात मेथी भाजी खाणे टाळावे किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तसेच मेथी भाजी अधिक प्रमाणात खाण्यामुळे ब्लड शुगर एकाएकी कमी होऊ शकते. लो ब्लड शुगरमुळेही डायबेटिस रुग्णात अनेक गुंतागुंती होतात. त्यामुळे डायबेटिस रुग्णानी मेथीची भाजी खाणे टाळावे किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हे सुद्धा वाचा..
चाकवत भाजी खाण्याचे फायदे जाणून घ्या.
Read Marathi language article about Health Benefits and Side effects of Methi bhaji (Fenugreek vegetables). Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.