Breast cancer information in Marathi.

स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) :

स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्‍या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्‍या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो.

बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. जेव्हा कळतं तेव्हा उशिर झालेला असतो. आज भारतीय स्त्रियांना होणा-या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि सुमारे 13 लाख स्त्रीया या स्तनांच्या कर्करोगाने पिडित आहेत. स्त्रियांना गर्भाशयाच्या अस्तराचा, बीजांडकोषाचा असे काही कर्करोग होतात परंतु या सर्वात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण खूप मोठे आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो. प्रारंभीक अवस्थेत याचे निदान झाल्यास अनेक कष्टदायक त्रासातून मुक्तता मिळते. यासाठी वयाच्या 30-40 वर्षानंतर स्तनांची नियमितरित्या वर्षातून किमान एकदा स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. याशिवाय स्वतःद्वारा स्तन परिक्षण करुन स्तनांच्या ठिकाणी गाठ किंवा असमान्य वृद्धी नसल्याची खात्री करुन घेण गरजेचे आहे. स्वतः तपासणी केल्यानंतर जर स्तनप्रदेशी असामान्य वृद्धी, गाठ स्पर्शास जाणवल्यास तात्काळ स्त्रीरोग तज्ञांशी संपर्क साधावा. जेणेकरुन स्तन कॅन्सरचे वेळीच निदान होईल आणि प्राथमिक अवस्थेतच कॅन्सरला थांबवता येईल.

ब्रेस्ट कॅन्सरचे तरूणींमध्ये वाढते प्रमाण..
पन्नाशीनंतर होणा-या या कर्करोगाचे प्रमाण आज 20 ते 35 वयोगटांतील तरुणींमध्ये प्रचंड वाढत असल्याचे आढळून आले आहे. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, आरोग्याकडे दुर्लक्ष आणि कामाचा अतिरिक्त ताण यांमुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक तरूण स्त्रीला हा धोका असतोच परंतु यापूर्वी म्हणजे गेल्या दशकात 50 व 55 पेक्षा अधिक वय असलेल्या प्रौढ महिलांमध्ये हा कर्करोग आढळायचा, ते वय आता 30 ते 35 इतकं खाली घसरलं आहे.

स्तन कॅन्सरची लक्षणे :

Breast cancer Signs & Symptoms in Marathi
स्तन कॅन्सरचा प्रारंभ दुग्ध ग्रंथीतुन निघणाऱ्‍या वाहिकांमधून होतो. सुरवातीला स्तनाच्या ठिकाणी एक पीडारहित गाठ, पिण्ड उत्पन्न होते.
• स्तनात पीडारहित गाठ, पिण्ड असणे.
• ‎अचानक स्तनाचा आकार वाढणे व स्तन घट्ट होणे, स्तन आकुंचन पावणे.
• ‎बोंडातून द्राव येणे, आत वळलेले बोंड. बोंड लाल होऊन वेदना होणे.
• ‎स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे स्तनाच्या कँसरमध्ये जाणवू शकतात.

प्रेग्नन्सी पुस्तक डाऊनलोड करा..
'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती दिली आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

धोका कुणाला..?

वयाच्या पंचवीशीनंतर प्रत्येक स्त्रीला याचा धोका असतो. महिलांचे वय वाढते तसा धोकाही वाढत असतो. विशेषतः ज्या स्त्रीया प्रसुतीनंतर आपल्या बाळास स्तनपान करीत नाहीत त्यांना स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे प्रसूतीनंतर स्त्रियांसाठी स्तनपान करणे अत्यंत गरजेचे असते.

स्तन कॅन्सरची कारणे :
स्तनाचा कर्करोग कशामुळे होतो..

Breast cancer Causes in Marathi
• स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास असतो. कुटुंबातील आई, बहिणीमध्ये जर स्तन कॅन्सर असल्यास अनुवंशिक कारणांद्वारे स्तन कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी कुटुंबातील व्यक्तींमध्ये जर स्तन कॅन्सरची लक्षणे जाणवल्यास खबरदारी म्हणून स्वतः देखिल स्तन परिक्षण करुन घेणे आवश्यक असते.
• ‎वयाच्या 12 व्या वर्षापुर्वीच मासिक पाळी सुरु झालेली असल्यास,
• ‎वयाच्या 55 व्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास,
• ‎निसंतती, वंधत्वाची समस्या असणे,
• ‎प्रथम अपत्य जर वयाच्या 30 वर्षानंतर झाल्यास,
• ‎कुटुंबनियोजन औषधांच्या अतिरेकामुळे,
• ‎आपल्या बाळास स्तनपान न करणाऱ्‍या महिला,
• ‎व्यसनाधिनतेमुळे जसे, तंबाखू, मद्यपान इ.
• ‎लठ्ठपणा असणाऱ्‍या महिला, अधिक चरबीयुक्त, स्नेहयुक्त आहाराचे सेवन करणाऱ्‍या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.
• ‎पुर्वी गर्भाशयाचा किंवा कोलोनचा कर्करोग झालेल्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याचा अधिक धोका असतो. गर्भाशयाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग यांचा जवळचा संबंध असतो.

स्तनाचा कर्करोग निदान व लॅब टेस्ट :

Breast Cancer Diagnosis test in Marathi
मैमोग्राफी टेस्ट (Mammography) –
स्तन कॅन्सरचे निदान करण्यासाठी मैमोग्राफीद्वारे स्क्रीनिंग परिक्षण केले जाते. क्ष-किरण परिक्षणासारखेच मैमोग्राफीचे चाचणी असून 30 मिनिटामध्ये टेस्ट पूर्ण होते. तसेच चाचणीवेळी कोणताही त्रास होत नाही. या चाचणीतून उपस्थित गाठ ही कॅन्सरची आहे की नाही याचे निदान होण्यास मदत होते.

वेळोवेळी स्तनांमध्ये गाठ नसल्याची खात्री करुन घेणे गरजेचे असते. यासाठी वयाच्या 35शी नंतर दरवर्षी नियमित मैमोग्राफी चाचणी करुन घ्यावी. याद्वारे स्तन कॅन्सरचे निदान होण्यास मदत होते. स्तनांचा कर्करोग हा असा आजार आहे की, ज्याचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते. 35 वर्षांवरील स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी करणं आवश्यक आहे. मात्र अनेकजणी पुरेशा माहिती अभावी ही चाचणी करणे टाळतात. तर कधीकधी Biopsy जीवउतीपरिक्षा सुद्धा केली जाते.

ब्रेस्ट सेल्फ एक्झाम –
स्वतःद्वारा स्तन परिक्षण करुन स्तनांच्या ठिकाणी गाठ किंवा असमान्य वृद्धी नसल्याची खात्री करुन घेणे गरजेचे आहे. तुम्ही स्वतःच्या स्तनांना स्पर्श करून गाठी किंवा अनियमित बदलांबद्दल माहिती करून घेऊ शकता. याकरिता विविध स्थितींमध्ये झोपून, उभे राहून आरशात हे बदल तुम्ही पाहू शकता. ब्रेस्ट सेल्फ एक्झामसंबंधी मार्गदर्शनासाठी आपल्या स्त्रीरोग तज्ञांशी संपर्क साधावा.
महिन्यातून एकदा स्तनांची स्वतः तपासणी करावी. आपल्याला स्तनाचा कर्करोग आहे असा संशय असल्यास, स्तनप्रदेशी असामान्य वृद्धी, गाठ स्पर्शास जाणवल्यास, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तो बरा करता येतो परंतु निदान आणि उपचार लांबल्यास मृत्यु येऊ शकतो.

स्तनाचा कर्करोग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल..

Breast Cancer Prevention in Marathi.
• वयाच्या 35 शी नंतर वर्षातून एकदा मेमोग्राफी टेस्ट करणे.
• ‎महिन्यातून एकदा स्तनांची स्वतः तपासणी करणे. ब्रेस्ट सेल्फ एक्झामचा अवलंब करावा. स्वतः स्तन परिक्षण करुन स्तनांच्या ठिकाणी गाठ आहे का पहावी.
• ‎स्त्रीरोग तज्ञांकडून वयाच्या 30शी नंतर नियमित वार्षिक तपासणी करुन घ्यावी. तर 30 वर्षाच्या आतिल स्त्रियांनी किमान दोन वर्षाआड तज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी.
• ‎कुटुंबातील आई, बहिणीमध्ये जर स्तन कॅन्सरची लक्षणे उद्भवल्यास स्वतःसुद्धा स्तन कॅन्सरचे निदान करुन घ्यावे.
• ‎अधिक चरबीयुक्त, स्नेहयुक्त आहार सेवन करणे टाळावे. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा आहारात अधिक समावेश करावा.
• ‎नियमित व्यायाम, योगासने करावीत.
• ‎मानसिक ताण-तनावापासून मुक्त रहावे.
प्रत्येक महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय तपासणीची माहिती जाणून घ्या..

स्तन कॅन्सर उपचार :

Breast Cancer Treatments in Marathi.
स्तन कॅन्सरवरील उपचार हे कॅन्सरच्या अवस्थेवर, कर्करोग किती पसरला आहे यावर अवलंबून आहेत.
स्तन कॅन्सरवर खालील उपचारांद्वारे मात केली जाते,
– किमोथिअरेपी,
– Mastectomy सर्जरी,
– किरणोत्सार (Radiation therapy) यासारख्या उपायांचा चिकित्सेमध्ये अवलंब केला जातो.

स्तनाच्या कर्करोगाचा उपचार करताना स्तनातील गाठ आणि त्याभोवतीची उती किरणोत्सार (Radiation) किंवा त्याविना काढतात तसेच काही वेळेस संपूर्ण स्तन काढून टाकला जातो.

स्त्रियांना होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कँसरची (Cervical cancer) ची मराठीत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

Breast cancer causes, symptoms, test, treatments in Marathi.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)