गर्भावस्थेत आईच्या पोटातील बाळाची अशी होते वाढ..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गरोदरपणातील गर्भाची वाढ :

प्रेग्नन्सी कॅलेंडरच्या मदतीने आपल्या पोटातील बाळाची वाढ नऊ महिन्यांमध्ये कशी होत असते ते जाणून घेता येते. यासाठी गरोदरपणात 1 ते 9 महिन्यात गर्भाशयात गर्भाची वाढ कशी होते याची माहिती येथे दिली आहे

गर्भावस्थेचा पहिला महिना –
पहिल्या महिन्यात गर्भनिर्मिती व गर्भस्थापना होत असते. या महिन्यात गर्भधारणेनंतर फर्टिलाईज झालेली अंडी ही फेलोपियन ट्यूबपासून गर्भाशयात प्रवास करतात आणि गर्भाशयाच्या अस्तरात रोपण करतात.  त्यानंतर ती अंडी पेशींच्या गुच्छात विभागतात आणि गर्भ (भ्रुण किंवा embryo) तयार होतो.

फलित अंडी विकसित होत असतात तेव्हा अम्नीओटिक सॅक तयार होते. याचवेळी प्लेसेंटा (नाळ) देखील विकसित होण्यास सुरवात होते. या काळात पोटातील बाळाच्या शरीरात रक्तपेशी तयार होऊन रक्तसंचरण सुरू होते. त्याद्वारे गर्भाचे पोषण होत असते. याकाळात गर्भाचे डोके तयार होण्यास सुरवात होईल. डोळ्याच्या जागी काळे टिपके दिसू लागतात. चौथ्या आठवड्याच्या शेवटी गर्भाच्या हृदयाचे एका मिनिटात 65 वेळा धडकणे सुरू होईल. या महिन्याच्या शेवटी पोटातील बाळ हे ¼ इंचाचे म्हणजे तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान आकाराचे असते. सुरवातीच्या दिवसात गर्भाचे अस्थिर स्वरूप असते. त्यामुळेच या काळात गर्भस्त्राव होऊ नये यासाठी पुरेशी काळजी व योग्य आहार घेणे आवश्यक असते. गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

गर्भावस्थेचा दूसरा महीना –
दुसर्‍या महिन्यात पोटातील बाळाचा आकार 1 इंच इतका होतो आणि त्याचे वजन 14 ग्रॅम पर्यंत असू शकते. या महिन्यापर्यंत गर्भाचे हृदय कार्य करण्यास सुरवात करते आणि मेंदूचा देखील होतो. बाळाचे डोळे, नाक, ओठ, यकृत आणि कान तयार होऊ लागतात. गर्भाच्या पापण्या जवळजवळ बंद होतात आणि पुढील कित्येक महिन्यांपर्यंत उघडत नाहीत. 

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच या महिन्यात गर्भ हा गर्भाशयातील कोणत्या भागात रुजला आहे, ते सोनोग्राफीने समजू शकते. त्यानुसार, पुढे निर्माण होणाऱ्या नाळेची (प्लेसेंटाची) जागा कळू शकते. त्यानुसार गर्भिणीला विशिष्ट काय काळजी घ्यायची आहे ते सांगता येऊ शकते. गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

प्रेग्नन्सीचा तीसरा महिना –
तिसऱ्या महिन्यात पोटातील बाळाचे डोळे, कान, नाक, हात, पाय असे अंग-अवयव तयार होऊन त्यांची वाढ होऊ लागते. त्याच्या डोक्यावर केस येत असतात व संपूर्ण अंगावर लव येत असते. गर्भाशयातील गर्भजलात सुरक्षितपणे आपले बाळ तरंगत असते. गर्भजलामुळे त्याचे धक्क्यापासून संरक्षण होत असते. तिसऱ्या महिन्यात गर्भ हा अगदी तळ हातात मावेल एवढ्या लहान आकाराचा असतो. सोनोग्राफी केल्यास, एखाद्या छोट्या बाहुलीप्रमाणे बाळाचा आकार दिसतो.

तिसरा महिना संपत असताना, नाळ (Placenta) पूर्णपणे तयार झालेली असते. या नाळेमार्फतच गर्भाचे संपूर्ण पोषण होत असते. त्यामुळे या नाळेतील रक्तपुरवठा योग्य रीतीने होत असणे गरजेचे असते. त्यासाठी गरोदर मातेचा आहार, विहार, औषधी योग्य असणे गरजेचे असते. गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

गर्भावस्थेचा चौथा महिना –
या महिन्यात गर्भाची त्वचा अद्यापही पातळ असते, परंतु हाडे ठोस आकार घेत असतात. तसेच या महिन्यात डोके, भुवया आणि पापण्यांचे केस येऊ लागतात. गर्भाचे कान वाढू लागतात. तसेच या काळात आपणास बाळाची थोडीफार हालचाल जाणवू शकते.

याकाळात गर्भाशयातल्या बाळाची लांबी सुमारे सहा इंच असते आणि त्याचा आकार मोठ्या संत्र्याच्या आकाराइतका असतो. तर बाळाचे वजन 113 ग्रॅम इतके असू शकते. या महिन्यात बाळाच्या विविध अवयवांची निर्मिती होत असते. अवयवांच्या निर्मितीमध्ये काही दोष आहेत का ते पाहण्यासाठी या महिन्याच्या शेवटी एकदा सोनोग्राफी केली जाते. गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यात काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

गर्भावस्थेचा पाचवा महिना –
प्रेग्नन्सीच्या पाचव्या महिन्यात गर्भाशयात बाळाची वाढ वेगाने होत असते. या महिन्याच्या अखेरीस, बाळ सुमारे साडे सहा इंचाचे होते तर त्याचे वजन 226 ग्रॅम इतके होते. पाचव्या महिन्यात बाळाच्या त्वचेवर रक्तवाहिन्या दिसू लागतात, बाळाची हाडे आणि स्नायूंचा पूर्ण विकास होतो, बाळाची जननांगे विकसित होतात, बाळाची किडनी कार्य करू लागते. या महिन्यात बाळ जांभई देऊ लागते. तुमचे बाळ आता हालचाल करू लागेल. ह्या महिन्यात आपणास गर्भाची हलचाल जाणवायला लागेल.

पाचव्या महिन्यानंतर गर्भाशयाचा आकार वाढल्याने त्याचा दाब मूत्राशय (bladder) वर येतो व त्यामुळे सारखे लघवीला जावे लागते. तसेचं शरीरातल्या हार्मोन्सच्या बदलामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो त्यामुळे कधीकधी शौचास कठीण होऊ शकते. गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

प्रेग्नन्सी सहावा महिना –
प्रेग्नन्सीच्या सहाव्या महिन्यात गर्भाच्या आकारात वाढ झालेली असते. सहाव्या महिन्याच्या शेवटी बाळाचे वजन सुमारे 900 ग्रॅम असू शकते आणि त्याची लांबी 12 इंच असू शकते. याकाळात बाळाचे डोके हे शरीराच्या इतर भागांपेक्षा मोठे असते. त्वचेखालील रक्तवाहिन्यांमुळे त्याची त्वचा गुलाबी होते. या महिन्याच्या अखेरीस बाळाची बोटं आणि नखे विकसित होतात. ह्या महिन्यात तुमचे बाळ अधिक कार्यक्षम असेल. बाळाच्या संवेदना आता अधिक तीव्र झाल्या असतील. प्रखर प्रकाश, मोठा आवाज ह्यांना बाळ प्रतिसाद देतांना आईला जाणवेल.

ह्या दरम्यान स्त्रीरोग तज्ञ तुम्हाला सोनोग्राफी, रक्ततपासणी करायला सांगतील व टी.टी. चे इंजेक्शन देतील. तुमची कॅलशियम व लोहाची गरज वाढल्याने त्याच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देण्यात येईल. सहाव्या महिन्यानंतर तुमचे दुसरे सत्र संपेल. पुढे येणारे तीसरे व अंतिम सत्र अधिक आनंददायी व स्पुर्तीदायक असेल. बाळाची आता तुम्ही आतुरतेने वाट पहायला लागाल. गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यात काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

गर्भावस्थेचा सातवा महीना –
सातव्या महिन्यात गर्भाच्या आकारात वाढ व विकास अधिक झालेला असतो. सातव्या महिन्याच्या शेवटी बाळाचे वजन सुमारे 1 किलो असू शकते आणि त्याची लांबी 14 इंच असू शकते. बाळ बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते, तसेच ते आपले डोळे उघडू आणि बंद करू शकते. गर्भाची हालचाल या महिन्यात आईला चांगल्यारीतीने जाणवायला लागते.

सातव्या महिन्यामध्ये गर्भाची सर्व प्रकारे वाढ झालेली असते. त्याचे सर्व अंग अवयव तयार झालेले असतात. शरीर संपूर्णपणे तयार असते. त्यामुळेच या महिन्यात प्रसूती झाली तरी बालक जगण्यास तयार असते. परंतु अशा बालकाची प्रतिकारक्षमता मात्र कमी असते. तसेच अशा अकाल प्रसव झालेल्या बालकांना Incubator मध्ये ठेवावे लागते. गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

गर्भावस्थेचा आठवा महीना –
गर्भधारणेच्या आठव्या महिन्यापर्यंत, पोटातील बाळ जवळजवळ पूर्ण विकसित झालेले असते. बाळाचा विकासही अधिक झालेला असतो. आठव्या महिन्यात बाळाचे वजन सुमारे 1 ते 1.25 किलो असू शकते आणि त्याची लांबी 14 इंच असू शकते. बाळ बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते. गर्भाची हालचाल या महिन्यात चांगल्यारीतीने जाणवायला लागते.

बाळाचे डोळे आणि पापण्या पूर्णपणे तयार झालेल्या असतात. ते आपले डोळे उघडू आणि बंद करू शकते. बाळाची फुफ्फुसे अधिक विकसित झालेली असतात. या महिन्यापर्यंत बाळाच्या डोक्यावरचे केस आलेले असतात. बाळाच्या मेंदूचा विकास या महिन्यापासून वेगाने सुरू होतो. यावेळी न्यूरॉन्स वेगाने वाढतात. या महिन्यापासून प्रसवापर्यंत गर्भाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर हालचाली कमी जाणवल्या तर लगेच तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आठव्या महिन्यामध्ये गर्भाची सर्व प्रकारे वाढ झालेली असते. त्याचे सर्व अवयव, सर्व अंग अवयव तयार असते. शरीर संपूर्णपणे तयार असते. त्यामुळेच या महिन्यात काही कारणांमुळे प्रसूती झाली तरी बालक जगण्यास तयार असते. परंतु अशा बालकाची प्रतिकारक्षमता मात्र कमी असते. तसेच अशा अकाल प्रसव झालेल्या बालकांना Incubator मध्ये ठेवावे लागते. गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यात काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

गर्भावस्थेचा नववा महीना (शेवटचा महिना) –
आपले बाळ कधीही ह्या नव्या दुनियेमध्ये प्रवेश करू शकते. ही वेळ आनंदाची तसेचं विशेष काळजीची ही आहे. गर्भधारणेच्या नवव्या महिन्यात पोटातील बाळ पूर्ण विकसित झालेले असते. नवव्या महिन्याच्या शेवटी बाळाचे वजन सुमारे 2.5 किलो असू शकते आणि त्याची लांबी 19 इंच असू शकते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

या महिन्यात गर्भाच्या सभोवतालचे पाणी (गर्भजल) थोडे कमी होते. गर्भाचे डोके खालच्या बाजूला होते व हळूहळू स्त्रीच्या pelvic भागात सरकत असते. जस-जशी प्रसूती जवळ येते तशी बाळाची हालचाल मंदावते. बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्याजोगी जागा नसते. पण हालचाल खूपच कमी झाल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा. गर्भावस्थेच्या नवव्या महिन्यात काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

हे सुद्धा वाचा..
योग्यरीत्या गर्भाची वाढ होण्यासाठी कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या..

Stages Of Pregnancy & Fetal Growth Development in Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.