गर्भधारणेचा पहिला महिना – Pregnancy 1st Month :

प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यात गरोदर स्त्री आणि तिच्या पोटातील बाळामध्ये होणारे बदल यांची माहिती याठिकाणी दिली आहे. तसेच पहिल्या महिन्यात गरोदर स्त्रीने कोणती काळजी घ्यावी, पहिल्या महिन्यात गर्भवती महिलेचा आहार कसा असावा तसेच पहिल्या महिन्यात करावयाच्या तपासण्या यांची माहिती खाली दिली आहे.

गर्भधारणेचा 1ला महिना साधारण शेवटच्या मासिक पाळीनंतर तीन आठवडयांनी सुरू होतो. प्रेग्नन्सी ही एकूण चाळीस आठवड्यांची असते. त्यापैकी पहिल्या महिन्यात 1 ते 4 आठवड्यांचा समावेश असतो.

गरोदरपणातील पहिल्या महिन्यातील गर्भाची वाढ :

पहिल्या महिन्यात गर्भनिर्मिती व गर्भस्थापना होत असते. या महिन्यात गर्भधारणेनंतर फर्टिलाईज झालेली अंडी ही फेलोपियन ट्यूबपासून गर्भाशयात प्रवास करतात आणि गर्भाशयाच्या अस्तरात रोपण करतात. त्यानंतर ती अंडी पेशींच्या गुच्छात विभागतात आणि गर्भ (भ्रुण किंवा embryo) तयार होतो.

फलित अंडी विकसित होत असतात तेव्हा अम्नीओटिक सॅक तयार होते. याचवेळी प्लेसेंटा (नाळ) देखील विकसित होण्यास सुरवात होते. या काळात पोटातील बाळाच्या शरीरात रक्तपेशी तयार होऊन रक्तसंचरण सुरू होते. त्याद्वारे गर्भाचे पोषण होत असते. याकाळात गर्भाचे डोके तयार होण्यास सुरवात होईल. डोळ्याच्या जागी काळे टिपके दिसू लागतात. चौथ्या आठवड्याच्या शेवटी गर्भाच्या हृदयाचे एका मिनिटात 65 वेळा धडकणे सुरू होईल. या महिन्याच्या शेवटी पोटातील बाळ हे ¼ इंचाचे म्हणजे तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान आकाराचे असते. सुरवातीच्या दिवसात गर्भाचे अस्थिर स्वरूप असते. त्यामुळेच या काळात गर्भस्त्राव होऊ नये यासाठी पुरेशी काळजी व योग्य आहार घेणे आवश्यक असते

एक महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे :

 • मासिक पाळी न येणे,
 • आळस येणे व अंग जड वाटणे,
 • थकवा येणे,
 • वारंवार लघवीला होणे,
 • तोंडात सतत लाळ येणे,
 • मळमळ होणे,
 • अन्न खाण्याची इच्छा न होणे,
 • मूड बदलणे,
 • पोटफुगी, पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता),
 • गरोदरणाची पहिलीच वेळ असल्यास स्तनांचे Nipples काळपट होणे,
 • पायांवर अल्प प्रमाणात सूज येणे,
 • पायात पेटके येणे, कंबरदुखी
 • आंबट खाण्याची इच्छा असणे यासारखी लक्षणे स्त्रीमध्ये पहिल्या महिन्यात जाणवू शकतात. तसेच अनेक स्त्रियांमध्ये गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात काही लक्षणे जाणवतही नाहीत.

गरोदरपणातील पहिल्या महिन्यात असा असावा आहार :

गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यापासूनच ताजा व संतुलित आहार घेणे सुरू करावे. दिवसातून तीन ते चार वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा. एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. आहारात पोळी, भात, डाळी, भाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. गर्भारपणात शरीराला ताकद देणारे प्रोटिन्सयुक्त पदार्थही आहारात असणे आवश्यक असते. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुकामेवा, अंडी, मटण, मासे, चिकन यांचा समावेश करावा.

आहारात आयोडिनयुक्त मीठचं वापरावे. आयोडिनमुळे बाळाची वाढ सशक्त व निरोगी होते. मात्र मीठ अधिक प्रमाणात खाणे टाळावे. इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) होऊ नये म्हणून बाहेरील उघड्यावरील खाणे टाळावे. तिखट, खारट, मसालेदार व तेलकट पदार्थ टाळावेत. शिळे अन्न, अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.

प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यातील तपासण्या :

पहिला महिना संपताना, गरोदर असल्याच्या निश्चित निदानासाठी Urine Pregnancy Test किंवा BHCG ही रक्तातील तपासणी केली जाते. घरच्याघरी प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ते जाणून घ्या..

गरोदरपणात पहिल्या महिन्यामध्ये अशी घ्यावी काळजी :

पहिल्या महिन्यात गर्भाचे स्वरूप हे सर्वात जास्त अस्थिर असल्याने, जास्त काळजी घ्यावी लागते.

 • ताजा व संतुलित आहार घ्यावा.
 • एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. दिवसातून तीन ते चार वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा.
 • इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) होऊ नये म्हणून बाहेरील उघड्यावरील खाणे टाळावे.
 • तिखट, मसालेदार व तेलकट पदार्थ टाळावेत.
 • जास्त थकवा आणणारी कामे करू नयेत.
 • जड वस्तू उचलू नयेत.
 • डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करावेत. सोपी योगासने व चालण्याचा व्यायाम करावा.
 • गर्भधारणा झाल्याचे निश्चित झाल्यास संबंध शकतो टाळावेत.
 • दूरचा प्रवास करू नये. विशेषतः दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे.
 • मानसिक ताण, दगदग करू नये.
 • सतत आनंदी व समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.
 • जागरण करणे टाळावे. झोपेच्या वेळा नियमित असाव्यात.
 • इन्फेक्शन होऊ नये यासाठी अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळावा.
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत.
 • डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.

पहिल्या महिन्यात जाणवणाऱ्या समस्या :

मॉर्निंग सिकनेस व त्यावर उपाय –
गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात सकाळच्या वेळेस मळमळ आणि उलट्या होण्याची समस्या होत असते. गरोदरपणात होणारी ही एक सामान्य समस्या असून याला ‘मॉर्निंग सिकनेस’ असेही म्हणतात. मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी करण्यासाठी, संतुलित आहार घेणे आवश्यक असते. अशावेळी जे पदार्थ त्रास न होता खाऊ शकता ते खावेत. तेलकट व मसालेदार पदार्थांपासून दूर रहावे.

तसेच अधिक वेळ उपाशी राहू नये. यासाठी दिवसातून वरचेवर थोडेथोडे जरूर खावे. तसेच शरीर हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे पाणीही प्यावे. सकाळी आपण जेव्हा झोपेतून उठता तेंव्हा रक्तातील साखरेची पातळी स्थिर होण्यास मदत करण्यासाठी अंथरुणावरुन खाली जाण्यापूर्वी काही साधे बिस्किटे किंवा टोस्ट खावीत. यामुळेही मळमळ व उलट्या कमी होण्यास मदत होईल. थोडेफार मळमळणे, कोरड्या उलट्या किंवा दिवसातून 2 ते 3 वेळा खाल्लेले अन्न उलटून पडणे हे होऊ शकते. मात्र यापेक्षा अधिक त्रास होत असेल किंवा उलटी सतत होत असेल, तर आपल्या डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

थकवा येणे –
प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाबही कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशयात वाढणाऱ्या छोट्याशा बाळाला वाढविण्यासाठी आईच्या शरीरातील बरीच ऊर्जा वापरली जाते. यांमुळे गरोदरपणी थकवा येत असतो. सुरवातीच्या दोन महिन्यात थकवा जास्त जाणवतो त्यामानाने तीसऱ्या महिन्यापर्यंत थकवा व अशक्तपणा कमी होत जातो.

थकवा जाणवत असल्यास अशावेळी योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. यासाठी दिवसा विश्रांती घेणेही उपयुक्त असते. शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळेही थकवा जाणवू शकतो. अशावेळी डॉक्टरांनी दिलेली लोह वाढीसाठीची औषधे नियमितपणे घेणे आवश्यक असते.

योनीतून ब्लीडींग किंवा रक्तस्राव होणे –
अनेक गरोदर स्त्रियांना पहिल्या तीन महिन्यात योनीतून रक्तस्त्राव होऊ शकतो. या रक्तस्त्रावाचे स्वरूप हे हलकेसे रक्ताचे डाग (स्पॉट) किंवा अधिक प्रमाणात गुठळ्याच्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. काहीवेळा गरोदरपणात योनीतून अधिक रक्तस्त्राव होणे हे धोकादायक लक्षणही ठरू शकते. ह्यामुळे गर्भपातही होऊ शकतो. अशावेळेस आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

योनीतून रक्तस्राव होत असल्यास गरोदर स्त्रीने विश्रांती घ्यावी, संबंध टाळावे, जड वस्तू उचलू नयेत इ. सूचनांचे पालन करावे. याशिवाय इतर कारणांनीही, या महिन्यात योनीतून रक्तस्त्राव होऊ शकतो. गरोदरपणी योनीतून रक्तस्राव होण्याची कारणे जाणून घ्या..

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यात घ्यायची काळजी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

In this article information about First month Pregnancy Symptoms, Diet plan & Care tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...