गर्भधारणेचा सहावा महिना – Pregnancy 6th Month :

गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यांपर्यंत गर्भाची वाढ बरीचशी झालेली असते. सहाव्या महिन्यात बाळाची ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांचा विकास या महिन्यात होताना दिसतो. याठिकाणी गरोदरपणाच्या सहाव्या महिन्याबद्दल माहिती दिली आहे. प्रेग्नन्सीचा सहावा महिना हा 22 व्या आठवड्यापासून ते 26 व्या आठवड्यापर्यंत असतो.

सहा महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे :

गर्भधारणेच्या सहाव्या महिन्याच्या सुमारास गर्भवती स्त्रीच्या पाय व हातावर सूज येऊ शकते. याशिवाय अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेस, पाठदुखी हे त्रास होऊ शकतात.

पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषकघटकांची आवश्यकता असते त्यामुळे याकाळात नेहमीपेक्षा जास्त भूक लागू शकते. या महिन्यात आईला बाळाची movements स्पष्टपणे जाणवू लागते. तसेच या काळात ओटीपोटात वेदना (ब्रॅक्सटन हिक्स कॉन्ट्रॅक्शन) होऊ शकतात.

गरोदरपणातील सहाव्या महिन्यात होणारी बाळाची वाढ आणि आकार :

प्रेग्नन्सीच्या सहाव्या महिन्यात गर्भाच्या आकारात वाढ झालेली असते. सहाव्या महिन्याच्या शेवटी बाळाचे वजन सुमारे 900 ग्रॅम असू शकते आणि त्याची लांबी 12 इंच असू शकते. याकाळात बाळाचे डोके हे शरीराच्या इतर भागांपेक्षा मोठे असते. त्वचेखालील रक्तवाहिन्यांमुळे त्याची त्वचा गुलाबी होते. या महिन्याच्या अखेरीस बाळाची बोटं आणि नखे विकसित होतात.

गरोदरपणाचा सहावा महिना आणि आहार :

प्रेग्नन्सीच्या सहाव्या महिन्यात आपल्या पोटातील बाळ अधिक वेगाने विकसित होत असल्याने या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी सहाव्या महिन्यात गर्भवतींनी काय खावे आणि काय खाऊ नये, कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती खाली दिली आहे.

गरोदरपणात सहाव्या महिन्यातील आहार असा असावा –
सहाव्या महिन्यानंतर गर्भाची वाढ वेगाने होत असते. अशावेळी आईने प्रोटिन्स, लोह, कॅल्शिअम अशी पोषकतत्वे असणारा आहार घेणे आवश्यक असते. यासाठी गरोदर स्त्रीच्या आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, हंगामी फळे, संत्री, खजूर, द्राक्षे, धान्य, कडधान्ये, सुखामेवा, मांस, मासे, अंडी यांचा समावेश करावा.

एकाचवेळी भरपेट न जेवता, दिवसातून तीन ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा. यामुळे सहजरीत्या अन्नाचे पोषण होते व अपचन व गॅसेसचा त्रास होत नाही. या महिन्यातही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यासाठी आहारात फायबर्सयुक्त पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश असणे आवश्यक असते. तसेच दिवसभरात 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणीही वरचेवर थोडेथोडे पीत राहावे.

गर्भावस्थेतील सहाव्या महिन्यात काय खाणे टाळावे..?
बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. तसेच वारंवार तेलकट, मसालेदार, खारट पदार्थ, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, गोड मिठाईचे पदार्थ खाणे टाळावे. रक्तदाब किंवा हातापायावर सूज असल्यास आहारातील खारट पदार्थ, पापड, लोणचे खाणे टाळावे. सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे, चहा कॉफी वारंवार पिऊ नयेत. तसेच व्यसनांपासून दूर राहावे.

प्रेग्नन्सीचा सहावा महिना आणि व्यायाम :

गरोदरपणाच्या 6व्या महिन्यात असा करावा व्यायाम.
गरोदरपणात व्यायाम करणे हे गर्भवती आणि पोटातील बाळासाठी फायदेशीर असते. यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण कोणता व्यायाम करू शकता याविषयी माहिती जाणून घ्या व त्यानुसार व्यायाम सुरू करा.

गरोदरपणात सहाव्या महिन्यात आपण चालण्याचा व्यायाम करू शकता. चालणे हा एक सुरक्षित असा व्यायामप्रकार आहे. यासाठी आपण सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत 10 त 15 मिनिटे फिरण्यास जाऊ शकता. तज्ञांच्या सल्ल्याने दीर्घश्वसन व सोपी योगासने करू शकता.

गर्भधारणेचा सहावा महिना आणि वैद्यकीय तपासण्या :

सहाव्या महिन्यात गरोदर स्त्रीने ह्या तपासण्या करून घ्याव्यात.
गरोदरपणात वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक असते, जेणेकरून काही अडचण असल्यास त्यावर वेळेत उपचार केले जाऊ शकतात. तसेच तापसणीमुळे बाळाची योग्य वाढ होत आहे की नाही ते कळण्यास मदत होत असते. सहा महिने संपल्यावर दुसरे त्रैमासिक पूर्ण होत असते. अशावेळी दवाखान्यात खालील तपासण्या करून घेणे आवश्यक असते.

 • गर्भवतीचे वजन
 • ब्लडप्रेशर (रक्तदाब)
 • हिमोग्लोबिन तपासणी
 • ब्लडशुगर तपासणी
 • लघवीतील साखर आणि प्रथिने यांचे प्रमाण तपासण्यासाठी लघवीची चाचणी
 • अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी (गर्भाचा विकास पाहण्यासाठी)
  अशा विविध टेस्ट व तपासणी या महिन्यात करू शकतात.

हे सुद्धा वाचा – गरोदरपणात सातव्या महिन्यात घ्यावयाची काळजी याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रेग्नन्सीमध्ये सहाव्या महिन्यात अशी घ्यावी काळजी :

 • जड वस्तू उचलणे किंवा ढकलणे टाळावे,
 • जास्त काष्टाची कामे करणे टाळावे,
 • घरातील हलकी कामे करू शकता,
 • सुती व सैलसर कपडे वापरा,
 • थकवा जाणवल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी,
 • दुपारी अर्धा तास विश्रांती घ्यावी,
 • शक्यतो डाव्या कुशीवर झोप घ्या,
 • लांबचा प्रवास टाळावा,
 • मानसिक ताण आणि दगदग टाळा,
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका,
 • डॉक्टरांनी दिलेली लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या औषधे वेळेवर घ्यावीत.

हे सुध्दा वाचा – गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात घ्यायची काळजी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

In this article information about Sixth Month Pregnancy Symptoms, Diet plan & Care tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

Medically Reviewed By - Dr. Satish Upalkar
Dr. Satish Upalkar is a Healthcare counsultant. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra University of Health Science, Nashik and is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai.
Qualification: Bachelor of Ayurveda Medicine and Surgery (B.A.M.S.)
Medical Council Registration number: I-72800-A
Contact details -[email protected]
Follow - LinkedIn | Facebook | Twitter | YouTube