गर्भावस्थेचा पाचवा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भधारणेचा पाचवा महिना :

गर्भावस्थेचा काळ जसजसा वाढत जातो तसतसे शरीरात बरेच बदल होतात. गर्भाशयात बाळाची वाढ होत असल्याने गर्भवतीचे पोट वाढू लागते, तसेच काही शारीरिक त्रासही होत असतात. याठिकाणी गरोदरपणाच्या पाचव्या महिन्याबद्दल माहिती दिली आहे. पाचवा महिना हा 18 व्या आठवड्यापासून ते 21 व्या आठवड्यापर्यंत असतो.

पाच महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे :

गर्भाशयातील बाळाची वाढ झाल्याने गर्भिणीच्या पोटाचा आकार वाढलेला असतो. बाळाची हालचाल आईला जाणवू लागते. या महिन्यात गर्भवती महिलेला पूर्वीपेक्षा जास्त भूक लागेल. याशिवाय थकवा जाणवणे, पाठदुखी, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, गॅसेसच्या तक्रारी, हिरड्यातून रक्त येणे, पाय दुखणे, योनीतून अधिक स्त्राव जाणे, लघवीला वारंवार होणे असे काही त्रास या महिन्यात जाणवू शकतात.

गरोदरपणातील पाचव्या महिन्यात होणारी बाळाची वाढ आणि आकार :

प्रेग्नन्सीच्या पाचव्या महिन्यात गर्भाशयात बाळाची वाढ वेगाने होत असते. या महिन्याच्या अखेरीस, बाळ सुमारे साडे सहा इंचाचे होते तर त्याचे वजन 226 ग्रॅम इतके होते.
पाचव्या महिन्यात बाळाच्या त्वचेवर रक्तवाहिन्या दिसू लागतात, बाळाची हाडे आणि स्नायूंचा पूर्ण विकास होतो, बाळाची जननांगे विकसित होतात, बाळाची किडनी कार्य करू लागते. या महिन्यात बाळ जांभई देऊ लागते.

गरोदरपणाचा पाचवा महिना आणि आहार :

प्रेग्नन्सीच्या पाचव्या महिन्यात आपल्या पोटातील बाळ अधिक वेगाने विकसित होत असल्याने या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी पाचव्या महिन्यात गर्भवतींनी काय खावे आणि काय खाऊ नये, कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती खाली दिली आहे.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यातील आहार असा असावा.
पाचव्या महिन्यानंतर पोटातील बाळाची वाढ वेगाने होत असते. अशावेळी गरोदर स्त्रीने योग्य पोषकतत्वे असणारा आहार घेणे आवश्यक असते. यासाठी आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, हंगामी फळे, धान्य, कडधान्ये, सुखामेवा, मांस, मासे, अंडी यांचा समावेश करावा.

एकाचवेळी भरपेट न जेवता, दिवसातून तीन ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा. यामुळे सहजरीत्या अन्नाचे पोषण होते व अपचन व गॅसेसचा त्रास होत नाही. या महिन्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यासाठी आहारात फायबर्सयुक्त पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश असणे आवश्यक असते. तसेच दिवसभरात 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणीही वरचेवर थोडेथोडे पीत राहावे.

गर्भावस्थेतील पाचव्या महिन्यात काय खाणे टाळावे..?
बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. तसेच वारंवार तेलकट, मसालेदार, खारट पदार्थ, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, गोड मिठाईचे पदार्थ खाणे टाळावे. रक्तदाब किंवा हातापायावर सूज असल्यास आहारातील खारट पदार्थ, पापड, लोणचे खाणे टाळावे. सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे, चहा कॉफी वारंवार पिऊ नयेत. तसेच व्यसनांपासून दूर राहावे.

प्रेग्नन्सीचा पाचवा महिना आणि व्यायाम :

गरोदरपणाच्या 5व्या महिन्यात असा करावा व्यायाम.
गर्भारपणात व्यायाम करणे हे गर्भवती आणि बाळासाठी फायदेशीर असते. यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण कोणता व्यायाम करू शकता याविषयी माहिती जाणून घ्या. व त्यानुसार व्यायाम सुरू करा.

गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात आपण चालण्याचा व्यायाम करू शकता. चालणे हा एक सुरक्षित असा व्यायामप्रकार आहे. यासाठी आपण सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत 10 त 15 मिनिटे फिरण्यास जाऊ शकता. तज्ञांच्या सल्ल्याने दीर्घश्वसन व सोपी योगासने करू शकता.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

गर्भधारणेचा पाचवा महिना आणि वैद्यकीय तपासण्या :

पाचव्या महिन्यात गरोदर स्त्रीने ह्या तपासण्या करून घ्याव्यात.
गरोदरपणात वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक असते, जेणेकरून काही अडचण असल्यास त्यावर वेळेत उपचार केले जाऊ शकतात. तसेच तापसणीमुळे बाळाची योग्य वाढ होत आहे की नाही ते कळण्यास मदत होत असते. पाचव्या महिन्यात प्रामुख्याने खालील तपासण्या केल्या जातात.
• गर्भवतीचे वजन
• ब्लडप्रेशर (रक्तदाब)
• हिमोग्लोबिन तपासणी
• ब्लडशुगर तपासणी
• लघवीतील साखर आणि प्रथिने यांचे प्रमाण तपासण्यासाठी लघवीची चाचणी
• अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी
• एम्नियोसेंटेसिस टेस्ट
अशा विविध टेस्ट व तपासणी या महिन्यात करू शकतात.

अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी –
पाचव्या महिन्यात एकदा अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करावी लागते. यामध्ये गर्भाच्या अवयवांची तपासणी केली जाते. तसेच प्लेसेंटाची स्थिती तपासली जाते. कारण गर्भ पूर्णतः तयार असल्याने हृदय, किडनी, मेंदू इ. महत्त्वाच्या अवयवातील अगदी बारीक व्यंग देखील या महिन्यात सोनोग्राफीत दिसून येतात. म्हणून ही सोनोग्राफी केली जाते. ही सोनोग्राफी 20 आठवड्याच्या आत केली जाते. गर्भाच्या जीवास धोकादायक असे काही व्यंग असल्यास कायद्यानुसार 24 आठवड्यांच्या आत गर्भपात करता येतो, अन्यथा नाही.

प्रेग्नन्सीमध्ये पाचव्या महिन्यात अशी घ्यावी काळजी :

• जड वस्तू उचलणे किंवा ढकलणे टाळावे,
• जास्त काष्टाची कामे करणे टाळावे,
• घरातील हलकी कामे करू शकता,
• सुती व सैलसर कपडे वापरा,
• थकवा जाणवल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी,
• दुपारी अर्धा तास विश्रांती घ्यावी,
• शक्यतो डाव्या कुशीवर झोप घ्या,
• लांबचा प्रवास टाळावा,
• मानसिक ताण आणि दगदग टाळा,
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका,
• टी.टी.चे पाहिले इंजेक्शन पाचव्या महिन्यात घेऊ शकता,
• डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.