गर्भावस्थेचा आठवा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भधारणेचा आठवा महिना :

प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात आई आणि कुटुंबातील प्रत्येकजण बाळाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. याठिकाणी गर्भधारणेच्या आठव्या महिन्याबद्दल माहिती दिली आहे. आठवा महिना हा 31 व्या आठवड्यापासून ते 35 व्या आठवड्यापर्यंत असतो.

आठ महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे :

गरोदरपणी आठव्या महिन्यात गर्भवतीच्या पोटाचा आकार व वजन वाढलेले असते. क्वचितप्रसंगी सूज किंवा रक्तदाब वाढलेला असू शकतो. गर्भाचे वजन व आकार वाढल्यामुळे, त्याचा दाब आतड्यांवर व मूत्राशयावर पडतो. त्यामुळे मलावरोध, गॅसेस, वारंवार लघवीला होणे अशी लक्षणे निर्माण होतात. पोट, मांड्या, स्तन, नितंब याठिकाणी त्वचेवर ताण पडून स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात. जर गर्भिणी अधिक जाड असेल, तर हे स्ट्रेचमार्क्स जास्त प्रमाणात निर्माण होतात.

तसेच गर्भधारणेच्या सातव्या महिन्यात सुरू झालेल्या ब्रेक्सटन हिक्स वेदना आठव्या महिन्यातही जाणवू लागतात. स्तनांमधून पिवळसर स्त्राव (कोलोस्ट्रम) येऊ लागतो. काही स्त्रियांच्या त्वचेवर शिरा दिसतात, त्याला ‘व्हेरिकोज व्हेन’ म्हणतात. याशिवाय श्वास लागणे, पाठदुखी, अपचन, छातीत जळजळ होणे, मळमळणे, बद्धकोष्ठता, गॅसेस, मुळव्याध हे त्रास होऊ शकतात.

गरोदरपणातील आठव्या महिन्यात होणारी बाळाची वाढ आणि आकार :

गर्भधारणेच्या आठव्या महिन्यापर्यंत, पोटातील बाळ जवळजवळ पूर्ण विकसित झालेले असते. बाळाचा विकासही अधिक झालेला असतो. आठव्या महिन्यात बाळाचे वजन सुमारे 1 ते 1.25 किलो असू शकते आणि त्याची लांबी 14 इंच असू शकते. बाळ बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते. गर्भाची हालचाल या महिन्यात चांगल्यारीतीने जाणवायला लागते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळाचे डोळे आणि पापण्या पूर्णपणे तयार झालेल्या असतात. ते आपले डोळे उघडू आणि बंद करू शकते. बाळाची फुफ्फुसे अधिक विकसित झालेली असतात. या महिन्यापर्यंत बाळाच्या डोक्यावरचे केस आलेले असतात. बाळाच्या मेंदूचा विकास या महिन्यापासून वेगाने सुरू होतो. यावेळी न्यूरॉन्स वेगाने वाढतात. या महिन्यापासून प्रसवापर्यंत गर्भाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर हालचाली कमी जाणवल्या तर लगेच तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आठव्या महिन्यामध्ये गर्भाची सर्व प्रकारे वाढ झालेली असते. त्याचे सर्व अवयव, सर्व अंग अवयव तयार असते. शरीर संपूर्णपणे तयार असते. त्यामुळेच या महिन्यात काही कारणांमुळे प्रसूती झाली तरी बालक जगण्यास तयार असते. परंतु अशा बालकाची प्रतिकारक्षमता मात्र कमी असते. तसेच अशा अकाल प्रसव झालेल्या बालकांना Incubator मध्ये ठेवावे लागते.

गरोदरपणाचा आठवा महिना आणि आहार :

गरोदरपणाचा हा शेवटचा काळ खूपच नाजूक असतो, म्हणून गर्भवतीची विशेष काळजी यावेळी आवश्यक असते. यासाठी आठव्या महिन्यात गर्भवतींनी काय खावे आणि काय खाऊ नये, कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती खाली दिली आहे.

गरोदरपणाच्या आठव्या महिन्यातील आहार असा असावा –
आठव्या महिन्यात बाळाची वाढ वेगाने झालेली असते. अशावेळी प्रोटिन्स, लोह, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम अशी पोषकतत्वे असणारा आहाराची त्याला गरज असते. यासाठी आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, हंगामी फळे, संत्री, खजूर, धान्य, कडधान्ये, सुखामेवा, मांस, मासे, अंडी यांचा समावेश करावा.

एकाचवेळी भरपेट न जेवता, दिवसातून तीन ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा. यामुळे सहजरीत्या अन्नाचे पोषण होते व अपचन व गॅसेसचा त्रास होत नाही. या महिन्यातही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यासाठी आहारात फायबर्सयुक्त पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश असणे आवश्यक असते. तसेच दिवसभरात 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणीही वरचेवर थोडेथोडे पीत राहावे.

गर्भावस्थेतील आठव्या महिन्यात काय खाणे टाळावे..?
बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. तसेच वारंवार तेलकट, मसालेदार, खारट पदार्थ, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, गोड मिठाईचे पदार्थ खाणे टाळावे. रक्तदाब किंवा हातापायावर सूज असल्यास आहारातील खारट पदार्थ, पापड, लोणचे खाणे टाळावे. सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे, चहा कॉफी वारंवार पिऊ नयेत. तसेच व्यसनांपासून दूर राहावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

प्रेग्नन्सीचा आठवा महिना आणि व्यायाम :

गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात असा करावा व्यायाम.
गरोदरपणात व्यायाम करणे हे गर्भवती आणि बाळासाठी फायदेशीर असते. गरोदरपणात आठव्या महिन्यात आपण थोडे फिरण्याचा व्यायाम करू शकता. यासाठी घरात किंवा घराजवळ थोडे हळूहळू चालावे.

गर्भधारणेचा 8वा महिना आणि वैद्यकीय तपासण्या :

आठव्या महिन्यात गरोदर स्त्रीने ह्या तपासण्या करून घ्याव्यात.
अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीच्या मदतीने बाळाच्या विकासावर लक्ष ठेवले जाईल. यात, बाळाची वाढ, गर्भाशयात बाळाची स्थिती, अम्नीओटिक द्रवपदार्थाचे प्रमाण आणि प्लेसेंटाची स्थिती पाहिली जाते. बाळाचे वजन, हालचाल कमी असल्यास (USG) सोनोग्राफी व कलर डॉप्लर बघणे गरजेचे आहे. क्वचित प्रसंगी गर्भाची (NST – Non stress test) करावी लागते. त्यामुळे गर्भ प्रसवाआधी, सुस्थितीत आहे की नाही हे समजते.

प्रेग्नन्सीमध्ये आठव्या महिन्यात अशी घ्यावी काळजी :

• जड वस्तू उचलणे किंवा ढकलणे टाळावे,
• काष्टाची कामे करणे टाळावे,
• सुती व सैलसर कपडे वापरा,
• थकवा जाणवल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी,
• दुपारी अर्धा ते एक तास विश्रांती घ्यावी.
• डाव्या कुशीवर झोपावे,
• प्रवास टाळावा,
• मानसिक ताण आणि दगदग टाळा,
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका,
• डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
• या महिन्यामध्ये गर्भिणीला टीटॅनसचे दुसरे इंजेक्शन दिले जाते.
• डॉक्टरांनी दिलेली रक्तवाढीची व कॅल्शियमची पुरक औषधे घ्यावीत.
• गर्भाच्या हालचालींकडे नीट लक्ष ठेवावे.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.