गर्भावस्था आणि वजन :

प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयात बाळाची वाढ होत असते. त्यामुळे गरोदर स्त्रीचे वजन गर्भावस्थेत स्वाभाविकपणे वाढत असते. गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात गर्भवतीचे वजन योग्यप्रकारे वाढणे अपेक्षित असते. कारण प्रेग्नंट स्त्रीचे वजन अधिक प्रमाणात वाढणे किंवा वजन कमी होणे हे काळजीचे कारण ठरत असते. यासाठी येथे गरोदरपणात गर्भवती महिलेचे वजन व गर्भातील बाळाचे किती असावे याविषयी माहिती दिली आहे.

गरोदरपणात वजन कुठे वाढते..?

प्रेग्नन्सीत वाढलेले वजन हे अनेक गोष्टींमध्ये विभागलेले असते. जसे गर्भाशयातील बाळ, प्लेसेंटा, बाळाभोवतीचे पाणी, शरीरात साठलेले पाणी, रक्त, शरीरातील चरबी, स्तनांमधील वाढ अशाप्रकारे गरोदरपणात वजन वाढत असते.

प्रेग्नन्सीमध्ये नऊ महिन्यांत साधारण किती वजन वाढले पाहिजे..?

प्रत्येक गरोदर मातेच्या मनात हा प्रश्न येत असतो. साधारणपणे पहिल्या तीन महिन्यांत वजन वाढणे हे अपेक्षित नसते; परंतु शक्यतो वजन कमी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे राहिलेल्या सहा महिन्यांत साधारणपणे दहा ते बारा किलो वजन वाढले पाहिजे.

ज्या स्त्रिया अगदी साधारण प्रकृतीच्या असतात, त्यांच्यात बारा किलो वाढ अपेक्षित असते; पण ज्या स्त्रिया अगदी बारीक किंवा ‘अंडर वेट’ असतात, त्यांच्यामध्ये 13 ते 15 किलो वजन वाढले पाहिजे. ज्या स्त्रिया प्रेग्नन्सीपूर्वी जाड असतात, त्यांच्यात गरोदरपणामध्ये वजन दहा किलोपर्यंत वाढणे अपेक्षित असते.

• साधारण प्रकृतीच्या स्त्रिया – 10 ते 12 किलो
• कमी वजन असणाऱ्या स्त्रिया – 13 ते15 किलो
• जाड असणाऱ्या स्त्रिया – 10 किलो

गरोदरपणात गर्भवतीचे वजन किती असावे..?

गर्भावस्थेत हळूहळू वजन वाढायला लागते. गर्भधारणेदरम्यान योग्य वजन असणे फार महत्वाचे आहे. कारण या अवस्थेत स्त्रीचे आरोग्य आणि पोटातील बाळाचे आरोग्य यावर अवलंबून असते. यासाठी गरोदरपणात प्रत्येक तापसणीच्या वेळी वजन किती वाढले आहे ते पाहिले जाते.

गरोदरपणात आपले वजन किती असावे हे गरोदर होण्यापूर्वी आपल्या असलेल्या बॉडी मास इंडेक्सनुसार (BMI) ठरवता येईल. गर्भधारणेपूर्वी स्त्रीचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) पुढीलप्रमाणे असल्यास गरोदरपणी किती वजन असावे ते ठरवता येते.

गर्भधारणेपूर्वी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 18.5 पेक्षा कमी असल्यास अशा स्त्रिया कमी वजनाच्या मानल्या जातात. त्यांचे वजन गरोदरपणी 13-18 किलोनी वाढणे आवश्यक असते. (जुळी बाळे असल्यास 22-27 किलो वजन वाढणे आवश्यक असते.)

गर्भधारणेपूर्वी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 18.5 ते 24.9 दरम्यान असल्यास अशा स्त्रिया सामान्य वजनाच्या मानल्या जातात. त्यांचे वजन गरोदरपणी 11-16 किलोनी वाढणे आवश्यक असते. (जुळी बाळे असल्यास 16-24 किलो वजन वाढणे आवश्यक असते.)

गर्भधारणेपूर्वी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 ते 29.9 दरम्यान असल्यास अशा स्त्रिया जास्त वजनाच्या मानल्या जातात. त्यांचे वजन गरोदरपणी 7-11 किलोनी वाढणे आवश्यक असते. (जुळी बाळे असल्यास 14-22 किलो वजन वाढणे आवश्यक असते.)

तर 30 किंवा अधिक बीएमआय असल्यास अशा स्त्रिया लठ्ठ मानल्या जातात. त्यांचे वजन गरोदरपणी 5-9 किलोनी वाढणे आवश्यक असते. (जुळी बाळे असल्यास 11-18 किलो वजन वाढणे आवश्यक असते.)

गर्भावस्थेत स्त्रीचे अधिक वजन वाढण्याची समस्या :

गरोदरपणात खूप वजन वाढणे, हे चांगले लक्षण नसते. कारण अशा स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेह, ब्लडप्रेशर वाढणे यांसारखे त्रास होऊ शकतात. तसेच सिझेरियन डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते.

ज्यांच्यामध्ये असे अचानक वजन वाढते, त्यांनी आपल्या आहारावर लक्ष देणे खूप गरजेचे असते. विशेषतः योग्य आहार घेणे आवश्यक असते. अशावेळी त्यांनी तेलकट व तुपकट पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, साखरेचे पदार्थ, मिठाई, केक, चॉकलेट खाणे टाळले पाहिजेत.

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, डाळी, धान्ये, दूध व दुधाचे पदार्थ, सुकामेवा, मांस, मासे, अंडी अशा पौष्टिक आहाराचा समावेश आहारात असावा. या पदार्थात फायबर्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, खनिजे यांचे मुबलक प्रमाण असते. यामुळे बाळाचे पोषण होते, आईचे आरोग्य चांगले राहते, मांसयुक्त हेल्दी वजन वाढते व अतिरिक्त चरबीयुक्त वजन वाढत नाही.

एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. दिवसभरात थोडाथोडा आहार घ्यावा. यामुळे घेतलेल्या आहाराचे योग्यप्रकारे पचन होते. याशिवाय दिवसभरात वरचेवर थोडेथोडे पाणी पीत राहावे. दिवसभरात साधारण 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाण्याशिवाय शहाळ्याचे पाणी आपण पिऊ शकता. मात्र सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.

मात्र वजन वाढते म्हणून गरोदरपणात उपवासी राहणे, भूक लागूनही खाणे टाळणे असले प्रकार करू नयेत. आपण घेतलेल्या आहारावरच बाळाचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे उपवासी राहू नये. तसेच वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम गरोदरपणात करू नये. डॉक्टरांनी सांगितलेला हलका व्यायाम करावा. 15 ते 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करू शकता. अशाप्रकारे आपण अनावश्यक वाढणारे वजन आटोक्यात ठेऊ शकता.

गर्भावस्थेत स्त्रीचे वजन कमी असण्याची समस्या :

काही महिलांमध्ये गर्भधारणेच्या आधी वजन कमी असते ज्यामुळे त्यांचे वजन गर्भधारणेदरम्यान देखील योग्यप्रकारे वाढत नाहीत. अशावेळी त्यांना वजन वाढवण्याचा सल्ला दिला जातो. जर त्यांचे वजन आवश्यक वजनापेक्षा कमी राहिल्यास गरोदरपणात काही समस्या होऊ शकतात. अशावेळी गर्भपात होण्याची, बाळ दगावण्याची किंवा जन्मणारे बाळ हे कमी वजनाचे असण्याची समस्या होत असते. अशी कमी वजनाची बाळे ही सारखी आजारी पडण्याची शक्यता असते.

ज्या स्त्रियांचे वजन गरोदरपणात कमी असते त्यांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. विशेषतः त्यांनी प्रोटिन्स, कर्बोदके, व्हिटॅमिन, खनिजे, फायबर्स अशी पोषकतत्वे असणारा पोषक आहार घ्यावा. यासाठी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, सुकामेवा, विविध फळे, फळांचा ताजा रस, कडधान्ये, धान्ये, पालेभाज्या, फळभाज्या, मांस, मासे, अंडी यांचा आहारात समावेश करावा. आहार वेळच्यावेळी व पुरेसा घ्यावा. दिवसातून 3 ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा. पुरेसे पाणीही प्यावे. तसेच दुपारच्या वेळेस थोडी विश्रांती व झोप घ्यावी.

Marathi information about How much weight will I put on during my pregnancy?


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...