डोळ्यांच्याखाली काळे वर्तुळं होणे :
आजकाल डोळ्यांखाली काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल्स होण्याची एक सामान्य समस्या बनली आहे. बर्याच लोकांना ही समस्या भेडसावत असते. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे असल्यास त्याचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होत असतो. तसेच डोळ्याखालील काळ्या वर्तुळांमुळे ती व्यक्ती अशक्त, आजारी असल्याचेही वाटत असते. येथे डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर कसे करावे यासाठीचे घरगुती आयुर्वेदिक उपाय दिले आहेत.
डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
काकडी –
डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काकडी सर्वोत्तम ठरते. यासाठी थंड काकडीचे दोन काप घेऊन ते 25-30 मिनिटे डोळ्यावर ठेवावेत.
गुलाब जल –
डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी देखील गुलाब जलाचा वापर होतो. यासाठी कापसाच्या बोळ्याने गुलाबजल डोळ्याच्या खालील काळ्या वर्तुळांवर लावावा. त्यामुळे तेथील त्वचा मऊ आणि मुलायम बनते तसेच काळी वर्तुळे कमी होतात.
बटाटा –
बटाटा किसून त्याचा रस काळ्या वर्तुळाभोवती लावावा. याशिवाय बटाटाच्या चकत्या डोळ्यांवर ठेव्याव्यात आणि दहा मिनिटांनी डोळे व चेहरा गार पाण्याने धुवावा. याशिवाय काकडीचे कापही डोळ्यांवर ठेवू शकता. त्याचाही या समस्येत फायदा होतो.
टोमॅटो आणि लिंबाचा रस –
लिंबाचा रस आणि टोमॅटोचा रस एकत्र करावा आणि या मिश्रणानं डोळ्याखालील काळ्या वर्तुळावर मसाज करावा. वीस मिनिटानंतर पाण्याने डोळे व चेहरा धुवावा. यामुळेही डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे दूर होण्यासाठी मदत होते.
मसाज –
खोबऱ्याचे आणि बदामाच तेल एकत्र करून त्यानं काळ्या वर्तुळांवर हलक्या हाताने मसाज करावा. एक तास हे तेल चेहऱ्यावर राहू द्यावं. तासाभरानं कोमट पाण्यानं चेहरा व डोळे धुवावेत.
हर्बल टी-बॅग –
हर्बल चहा बनवल्यानंतर त्या टी बॅग्ज किंवा वापरलेला चहा पावडरचा चोथा टाकून न देता ते फ्रीजमध्ये ठेवावा. त्यानंतर त्या थंड टी बॅग्ज किंवा हर्बल चहा पावडर कापडात बांधून डोळ्यांवर ठेवावी. याचाही खूप चांगला परिणाम होतो आणि काळी वर्तुळ कमी होण्यासाठी मदत होते.
डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी अशी घ्या काळजी :
पूर्ण झोपे घ्यावी –
अपुरी झोप किंवा जागरण करणे हे डोळ्याखाली काळी वर्तुळे होण्यासाठी जबाबदार ठरत असते. यासाठी जागरण न करता पुरेशी झोप घ्यावी.
भरपूर पाणी प्यावे –
दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होत नाही व त्वचा आद्र राहण्यास मदत होते. तसेच लघवीवाटे शरीरातील अपायकारक घटक निघून जातात. पर्यायाने डोळ्याखाली काळी वर्तुळे होत नाहीत.
उन्हात फिरताना काळजी घ्यावी –
उन्हामुळेही डोळ्याखाली काळी वर्तुळे होत असतात. यासाठी बाहेर उन्हात फिरताना गॉगल, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.