चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे –
चेहऱ्यावर नको असलेले केस येणे ही स्त्रियांसाठी एक मुख्य समस्या आहे. चेहऱ्यावर अनावश्यक केस येण्याची समस्या अनेक तरुणींमध्ये होत असते. ओठांवर आणि हनुवटीवर अनावश्यक केस आल्यामुळे एकूणच सौंदर्यावरच बाधा निर्माण होते. चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा जेलमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.
चेहऱ्यावर अनावश्यक केस का येतात ..?
चेहऱ्यावर नको असलेले केस येण्याची कारणे अनेक असू शकतात. प्रामुख्याने, स्त्रियांमध्ये होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात. शरीरातील एंड्रोजन ह्या हार्मोनचे प्रमाण वाढल्यामुळे PCOD मुळे किंवा रजोनिवृत्ती (मेनोपॉज) यामुळे हार्मोन्समध्ये बदल झाल्याने चेहऱ्यावर केस येतात. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात.
- अनुवांशिक घटक,
- सौंदर्य प्रसाधनांच्या चुकीच्या वापरामुळे,
- गर्भ निरोधक गोळ्यांच्या दुष्परिणामामुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस येऊ शकतात.
- याशिवाय मानसिक तणाव ह्यासारख्या कारणांनी चेहऱ्यावर केस येऊ शकतात.
चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी घरगुती उपाय :
कच्ची पपई आणि हळद –
कच्या पपईचे बारीक तुकडे करून ते चांगले बारीक वाटून घ्यावे. 2 चमचे बारीक वाटलेला पपईचा गर घेऊन त्यात अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करावे. चेहऱ्यावर जेथे अनावश्यक केस आले आहेत तेथे हे मिश्रण लावून 15 ते 20 मिनिटे मसाज करावा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय आपण करू शकता. कच्च्या पपईमध्ये पपाइन हे कार्यकारी घटक असते. त्यामुळे त्वचेतील रोम छिद्र मोकळे होऊन अनावश्यक केस दूर होतात. चेहऱ्यावरील केस घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर आहे.
साखर, लिंबाचा रस आणि मध –
दोन चमचे साखर, दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध हे सर्व एकत्र मिश्रण तयार करून ते थोडे गरम करून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यावर जेथे चेहऱ्यावर अनावश्यक केस आहेत तेथे थोडा मैदा लावून वरील मिश्रण लावावे. त्यानंतर वैक्सिंग स्ट्रिप किंवा कापडाच्या साहाय्याने अनावश्यक केस दूर करा. आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय आपण करू शकता.
ओटमील पावडर, मध आणि लिंबाचा रस –
एक चमचा ओटमील पावडर, दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर अनावश्यक केस असणाऱ्या ठिकाणी लावावी आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. आठवड्यातून एक वेळा हा उपाय केल्यामुळे चेहऱ्यावरचे अनावश्यक केस दूर होण्यास मदत होते.
बेसन, हळद आणि दुध –
अर्धा चमचा बेसन, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा दुध आणि एक चमचा ताजी साय हे सर्व एकत्रित करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहर्यावरील अनावश्यक केस आलेल्या ठिकाणी लावून हलक्या हाताने 20 मिनिटांपर्यंत मसाज करून चेहरा पाण्याने धुवून घ्यावा.
कांदा आणि तुळशीची पाने –
एक कांदा बारीक करून त्यात तुळशीची 8 ते 10 पाने घालून मिश्रण वाटून घ्यावे. हे मिश्रण अनावश्यक केसांच्या ठिकाणी लावून 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. चेहऱ्यावर नको असलेले केस घालवण्यासाठी हा एक चांगला घरगुती उपाय असून आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय करू शकता.
लिंबू आणि मध –
चेहऱ्यावरील अनावश्यक केसांच्या ठिकाणी कापलेला लिंबू मधाच्या साहाय्याने घासावा. यामुळेही चेहऱ्यावरचे नको असलेले केस दूर होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील केस घालवण्याचे अन्य उपाय –
थ्रेडिंग (Threading hair removal Method) –
यामध्ये चेहऱ्यावरील अनावश्यक केस हे दोऱ्याच्या साहाय्याने हटवले जातात. ब्यूटी पार्लरमध्ये आईब्रो करताना ही पद्धत वापरली जाते. त्याचप्रमाणे ओठांवरील केस घालवण्यासाठीही थ्रेडिंग पद्धत वापरता येते. थ्रेडिंग केल्यामुळे बरेच दिवस अनावश्यक केसांपासून सुटका मिळवता येते मात्र यामुळे त्याठिकाणी थोड्या वेदना होऊ शकतात.
वॅक्सिंग (Waxing) –
चेहऱ्यावरील अनावश्यक केसांवर वॅक्सिंग हा एक चांगला पर्याय आहेत. यामुळे नको असलेले केस मुळासकट दूर होतात. वॅक्सिंग केल्यानंतर अनेक आठवडे केस येत नाहीत. मात्र वॅक्सिंग करतानाही केस हटवलेल्या ठिकाणी थोड्या वेदना होऊ शकतात.
लेजर (Laser Hair Removal Treatment) –
आज चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी अत्याधुनिक लेजर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ह्या पद्धतीमध्ये फारशा वेदना होत नाहीत आणि कमी वेळेमध्ये अनावश्यक केस दूर होतात. लेजर पद्धतीने कायमस्वरूपी अनावश्यक केसांपासून मुक्तता मिळू शकते. मात्र लेजर हेअर रिमुव्हल पद्धत थोडी महाग असते.
हे सुध्दा वाचा – चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्याचे उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Facial unwanted hair removal tips. Last Medically Reviewed on February 21, 2024 By Dr. Satish Upalkar.