उन्हाळा आणि केसांच्या समस्या :
उन्हाळ्याच्या दिवसात हानिकारक यूवी किरणांचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही होत असतो. कडक ऊन, येणारा घाम, हवेतील धूळ, प्रदूषण यांमुळे केस गळणे, केस तुटणे, कमजोर होणे यासारख्या केसांच्या अनेक समस्या उन्हाळ्यात होत असतात. यासाठी याठिकाणी उन्हाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली आहे.
उन्हाळ्यात केसांची अशी घ्यावी काळजी :
प्रखर उन्हापासून केसांचा बचाव करा –
उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे केसांचे आरोग्य धोक्यात येते यासाठी दुपारच्या वेळी उन्हात बाहेर फिरताना छत्री किंवा स्कार्फचा वापर करावा. यांमुळे केस उन्हापासून सुरक्षित राहतील आणि चेहऱ्याची त्वचाही काळवंडणार नाही.
अँटी-डैंड्रफ शाम्पूचा वापर करावा –
उन्हाळ्यात केसांमध्ये घाम जास्त येतो. घामामुळे केसात धूळ, प्रदूषण चिकटते. त्यामुळे केसातील कचरा निघून जाण्यासाठी केस सुंदर होण्यासाठी अँटी-डैंड्रफ शॅम्पूचा वापर करा. मात्र शॅम्पूचा जास्त वापर करणे टाळावे. उन्हाळ्यात शाम्पूचा वापर अधिक केल्यास, केसांमधील नैसर्गिक ऑईल कमी होते त्यामुळे केस निस्तेज आणि रुक्ष बनतात. यासाठी दोन किंवा तीन दिवसांनी शाम्पूचा वापर करू शकता.
लिंबाचा रस –
उन्हाळ्यात जास्त घाम येत असतो. डोक्यात येणारा घाम स्काल्पला चिकटतो त्यामुळे त्याठिकाणी Dandruff (कोंडा) होण्याची समस्या निर्माण होते. अशी समस्या असल्यास लिंबू रस केसांच्या मुळाला लावावा व अर्ध्या तासाने केस धुवावेत. हा उपाय आठवड्यातून एकवेळ करावा.
कंडिशनरही करावे –
कंडिशनर केल्याने केसांच्या वर एक प्रकारचे कोटिंगचं होते त्यामुळे केस मऊ बनण्यास मदत होते. उन्हाळ्यात केसांना दही लावून कंडीशन करू शकता. यामुळे केस चमकदार आणि काळे बनतात. शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुण्यापूर्वी जास्वंदीची फुले पाण्यात उकळवा व त्या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा. यामुळेही उन्हाळ्यात केसांना चांगला उपयोग होतो.
ड्रायरचा वापर कमी करा –
हेअर ड्रायरमधून निघणारी गरम हवा उन्हाळ्याच्या दिवसात नुकसानदायक ठरू शकते. यामुळे केस लवकर खराब (डॅमेज) होऊ शकतात. यासाठी उन्हाळ्यात हेअर ड्रायरचा कमी वापर करावा.
तेल मसाज करावा –
शॅम्पू केल्यावर खोबरेल तेल थोडे कोमट करून केसांच्या मुळांना लावावे व हलकी मालिश करावी. त्यानंतर थोड्यावेळाने केस धुवून कंडिशनर करावे. यामुळे केस मुलायम, मजबूत आणि चमकदार बनतात. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
तसेच केसांना तेल रात्री झोपताना लावू शकता. रात्रभर जर तेल ठेवायचं नसेल तर मग आंघोळीच्या एक तास आधी तेल मसाज करणंही फायदेशीर ठरतं. खोबरेल तेलाबरोबरच मसाजसाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केल्यास फायदेशीर ठरतं.
केस हळुवार विंचरा –
उन्हाळ्यातील घामामुळे केस तुटण्याची शक्यता जास्त असते. तसेच केसातील घामात धूळ, प्रदूषण बसल्याने केस विंचरताना अडथळे येत असतात यासाठी उन्हाळ्यात केस कंगव्याने विंचरताना खूप काळजी घ्यावी यासाठी मोठ्या दाताच्या कंगव्याने हळुवारपणे केस विंचरावे.
स्विमिंग करताना काळजी घ्या –
उन्हाळ्यात स्विमिंग पूलमध्ये पोहण्यास जात असाल्टर, स्विमिंग कॅपचा वापर करावा जेणेकरून आपले केस भिजणार नाहीत. स्विमिंग पूलमधील पाण्यात क्लोरीन असते त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.
दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे –
उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. याचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यासह केसांवरही होऊ शकतो. यासाठी पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरातील अपायकारक घटक बाहेर निघून जातात आणि केस रुक्ष होऊन झडतही नाहीत.
हे सुद्धा वाचा..
उन्हाळ्यात आहार कसा असावा ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Hair care tips for Summer. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.