उन्हाळ्यात चेहऱ्याला फ्रेश ठेवण्यासाठी हे लोशन लावावे – Beauty tips for summer in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

उन्हाळा आणि चेहऱ्याची त्वचा :

उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवरही होत असतो. याशिवाय या काळात घामसुद्धा जास्त येत असतो. त्यामुळे घाम आणि धूळ यांमुळे त्वचा काळवंडत असते. यासाठी उन्हाळ्यात चेहऱ्याच्या त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते.

उन्हाळ्यात चेहऱ्याची अशी घ्यावी काळजी :

दुपारच्या वेळी उन्हात फिरणे टाळा –
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सुर्यकिरणे जास्त प्रखर असतात. त्या प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडते, चेहऱ्यावर काळे डाग पडतात, चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते त्यामुळे उन्हाळ्यात दुपारच्या वेळी उन्हात फिरू नये.

उन्हाळ्यात चेहऱ्याला सनस्क्रीन लावावे –
कामानिमित्त उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपल्या चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन लावावे. त्यामुळे उन्हाच्या परिणामापासून आपल्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. सनस्क्रीन लोशनही चांगल्या कंपनीचे वापरा. विशेषतः SPF30 किंवा त्यापेक्षा जास्त SPF (Sun Protection Factor) असणारी सनस्क्रीन लोशन उन्हाळ्यात वापरावे. घराबाहेर पडण्यापूर्वी साधारण पंधरा मिनीटे आधी सनस्क्रीन लोशन त्वचेवर लावावी.

चेहऱ्यावर स्कार्फचा वापर करावा –
उन्हामुळे चेहऱ्याची त्वचा काळवंडण्याची व चेहऱ्यावर काळे डाग पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावर होऊ नये यासाठी तोंडाभोवती स्कार्फ गुंडाळावा. यासाठी गॉगल व छत्रीचाही वापर करू शकता.

दिवसातून दोनवेळा चेहरा धुवावा –
उन्हाळ्यात घाम भरपूर येत असतो त्यामुळे बाहेरील धुळ, प्रदूषण त्वचेवर बसत असते. तसेच घामामुळे चेहऱ्यावर तेल जमा होते. ज्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक तेलकट दिसू लागते. यासाठी दिवसातून किमान दोनवेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा तसेच त्वचेवर आलेला घाम ओल्या कापडाने पुसून घ्यावा. चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करू शकता.

जास्त मेकअप करणे टाळावे –
उन्हामुळे भरपूर प्रमाणात घाम येत असतो. त्यामुळे घामामध्ये मेकअपमधील केमिकलयुक्त घटक मिसळतात आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन बसतात व चेहऱ्यावरील छिद्र ब्लॉक होतात. त्यामुळे पुढे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होत असतात. म्हणून उन्हाळ्यात जास्त मेकअप करणे टाळावे.

पुरेसे पाणी प्यावे –
उन्हामुळे भरपूर घाम येत असतो. घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या होऊ शकते. यासाठी उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. साधारण 8 ते 10 ग्लास पाणी दिवसभरात प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहिलच शिवाय शरीरातील अशुद्धी घाम व लघवीवाटे निघून जाण्यास मदत होईल. पर्यायाने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल म्हणून उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावे. पाण्याव्यतिरिक्त नारळपाणी, फळांचे ज्यूस, लिंबूपाणी, कोकमचे सरबतही आपण उन्हाळ्यात पिऊ शकता.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

उन्हाळ्यात चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी हे करा घरगुती उपाय :

उन्हाळ्यातही चेहरा ताजातवाना राखण्यासाठी रोज सकाळी व रात्री चेहऱ्यावर गुलाबपाणी लावावे. याशिवाय दोन चमचे बेसन आणि हळद यामध्ये गुलाबजल मिसळावे. ह्या मिश्रणाचा लेप चेहऱ्यावर लावून दहा मिनिटाने स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. हा फेसपॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर जरूर लावा. यामुळे आपली त्वचा सुंदर व तजलेदार बनेल. उन्हाळ्यात चेहरा तेलकट होण्याची ज्यांना समस्या आहे त्यांच्यासाठीही हा फेसपॅक खूप उपयोगी आहे.

चेहऱ्याची त्वचा तेलकट असल्यास आठवड्यातून एकदा त्वचेला कोरफडीचा गर लावावा आणि 15 मिनीटांनी पाण्याने धुऊन टाकावा. तेलकट त्वचेवर कोरफडीचा गर खूपच उपयोगी ठरतो. यामुळे त्वचेवरील धुळ आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.

उन्हामुळे तेलकट चेहरा होत असल्यास दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा दही आणि 2 ते 3 बिंदू लिंबूरस या सर्वांचे एकजीव मिश्रण करावे. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा व त्यानंतर वरील लेप चेहऱ्यावर लावावा. 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा व चेहऱ्यावर एक चांगली माश्चराइज़र क्रीम लावावी. आठवड्यातून 3 वेळा हा फेसपॅक आपण चेहऱ्यावर लावावा.