घोळ भाजी – Purslane Leaves :
घोळूची भाजी ही एक रानभाजी असून ती बुळबुळीत आणि चवीला थोडी वेगळी लागते. घोळ भाजीत अनेक पोषकघटक, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर्स असतात. लो कॅलरीज असणाऱ्या या भाजीत फॅटचे व कोलेस्टेरॉलचे प्रमाण 0% असते.
घोळ भाजीतील पोषक घटक :
घोळूच्या भाजीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C असून काही प्रमाणात riboflavin, niacin, pyridoxine, carotenoids यासारखे B-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनही आढळते. घोळीच्या भाजीत आयर्न (लोह), मॅग्नेशियम, तांबे, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मँगनीज ही उपयुक्त खनिजे (मिनरल्स) मुबलक असतात.
घोळ भाजीची इतर नावे :
शास्त्रीय नाव – Portulaca oleracea
इंग्लिश नाव – Purslane Leaves
हिंदी नाव – कुलफा की सब्जी
मराठी नाव – मराठीत घोळ भाजीस घोळूची भाजी, घोळ भाजी किंवा घोळीची भाजी अशाही नावाने ओळखले जाते.
आरोग्यासाठी घोळीच्या भाजीचे अनेक फायदे असतात. घोळची भाजी अन्नपचनास मदत करते, यामुळे यकृताचे कार्यही सुधारते. हृदयाच्या आरोग्यासाठी घोळ भाजी चांगली असते. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन-A चे प्रमाण घोळ भाजीत अधिक असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वजन कमी करण्यासाठी घोळ भाजी उपयुक्त असते. यामुळे हिमोग्लोबिन देखील वाढते.
घोळ भाजी खाण्याचे फायदे –
1) हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त..
ओमेगा-3 फॅटी ऍसिड ह्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या घटकाचे प्रमाण घोळीच्या भाजीत इतर कोणत्याही भाज्यांच्यामानाने सर्वात जास्त असते. 100 gm घोळीच्या भाजीत 350 mgओमेगा-3 फॅटी ऍसिड असते.
ओमेगा-3 फॅटी ऍसिडचा आहारात समावेश असल्यास हार्ट अटॅक, पक्षाघात (लकवा), हाय ब्लडप्रेशर यासारख्या आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. कारण त्यामुळे वाईट LDL कोलेस्टेरॉल कमी होऊन चांगले HDL कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. हार्ट अटॅकची संपूर्ण माहिती वाचा..
2) व्हिटॅमिन-A चा मुबलक स्त्रोत..
घोळूच्या भाजीत व्हिटॅमिन-A सुद्धा भरपूर प्रमाणात असते. घोळूच्या 100 gm भाजीतून 1320 IU व्हिटॅमिन-A मिळते. व्हिटॅमिन-A ला नैसर्गिक अँटीऑक्सिडंट म्हणूनही ओळखले जाते. डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन-A चे महत्व असाधारण आहे. याशिवाय यामुळे तोंडाचा कर्करोग आणि फुफुसाचा कर्करोग होण्यापासूनही रक्षण होते.
3) वजन कमी करते..
घोळीची भाजी हा लो कॅलरीज डायट असून अनेक पोषकतत्वे, व्हिटॅमिन, फायबर्स यामध्ये असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश करू शकता. कारण 100 ग्रॅम भाजीत केवळ 18 ग्रॅम कॅलरीज असतात व कोणतेही फॅट नसते.
4) हिमोग्लोबिन वाढवते..
या भाजीत लोहाचे व तांब्याचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यानी ही भाजी आहारात घ्यावी. रक्तल्पता किंवा ऍनिमिया आजारात ह्या भाजीचे सेवन करावे. तांब्यामुळे रक्तातील अशुद्धी दूर होण्यास मदत होते. पर्यायाने ह्या भाजीमुळे रक्त प्रवाह व्यवस्थित होतो.
5) मूळव्याधवर उपयुक्त..
मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. याशिवाय घोळाची भाजी खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. त्यामुळे लघवीस जळजळ होत असल्यास ही भाजी जरूर खा.
घोळ भाजी कोणी ही भाजी खाऊ नये व घोळूची भाजी खाण्याचे नुकसान :
घोळीच्या भाजीत Oxalic Acid चे प्रमाण जास्त असते त्यामुळे जास्त प्रमाणात हा घटक शरीरात गेल्यास किडनी स्टोन (मुतखडा) होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असल्यास घोळीची भाजी खाऊ नका. भाजी शिजवून खाण्याच्या पद्धतीमुळे बऱ्यापैकी Oxalic Acid कमी होण्यास मदत होते.
हे सुध्दा वाचा – मेथीची भाजी खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about Ghol bhaji Nutritional contents. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar..