चक्कर येणे व घाम येणे –
अनेक कारणांनी चक्कर येऊ शकते. चक्कर येते तेंव्हा आजूबाजूच्या वस्तू भोवताली फिरत असल्यासारखे वाटते. चक्कर येते तेंव्हा त्याबरोबरच अन्य काही डोकेदुखी, मळमळ अशी लक्षणेही जाणवू लागतात. अशावेळी घामही येत असतो.
चक्कर येऊन घाम येण्याची कारणे –
अनेक कारणांमुळे चक्कर व घाम येऊ शकतो. याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- रक्तातील साखर कमी झाल्यामुळे चक्कर व घाम येऊ शकतो,
- हायपरथायरॉईडीझम ह्या थायरॉईड विकारामुळेही चक्कर व घाम येऊ शकतो,
- उष्माघातामुळे,
- हार्ट अटॅकमुळे,
- प्रवासादरम्यान गाडी लागणे (मोशन सिकनेस) यामुळे,
- तसेच मानसिक तणावामुळे चक्कर व घाम येऊ शकतो.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
चक्कर येऊन अत्यधिक घाम आल्यास खालील लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
- छातीत दुखणे,
- छातीच्या मध्यभागी दाब दिल्यासारखे वाटणे,
- डावा जबडा, खांदा किंवा डाव्या हाताकडे वेदना होणे,
- श्वास घेण्यास त्रास होणे,
- हृदयाचे ठोके वाढणे,
- तीव्र डोकेदुखी,
- खूप उलट्या होणे,
- हातापायात किंवा चेहऱ्याला मुंग्या येणे,
- चेहरा किंवा हातापायात लुळेपणा जाणवणे,
- अडखळत बोलणे,
- वस्तूच्या दोन-दोन प्रतिमा दिसणे (Double vision – diplopia),
- डोळ्यांनी अंधुक अस्पष्ट दिसणे,
- कमी ऐकू येणे,
- चालण्यास असमर्थ असणे,
- तोल जाऊन पडणे,
- रुग्ण अधिक काळ बेशुद्ध असणे,
ही लक्षणे दिसून येत असल्यास रुग्णास तातडीने दवाखान्यात घेऊन जावे किंवा 108 ह्या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी. अशावेळी कोणतेही घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये.
चक्कर व घाम येणे यावरील उपचार –
कोणत्या कारणांमुळे चक्कर व घाम येत आहे यानुसार यावर उपचार ठरतात. यासाठी डोळे व कानांची तपासणी केली जाते. तसेच रक्तदाब, ब्लडशुगर तपासले जाईल.
चक्कर व घाम येणे हे ह्रदयासंबंधित आहे का ते पाहण्यासाठी Electrocardiogram (ECG) तपासणी केली जाईल. तसेच मेंदूसंबंधित कारणामुळे चक्कर येत आहे का ते पाहण्यासाठी एक्स-रे, CT स्कॅन, MRI स्कॅन अशा तपासण्या करण्याची आवश्यकता भासू शकते.
हे सुध्दा वाचा – हार्ट अटॅकची कारणे, लक्षणे व उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Vertigo and Sweating causes. Last Medically Reviewed on February 20, 2024 By Dr. Satish Upalkar.