पोटात गुडगुड होणे – Stomach Growling :
काहीवेळा आपल्या पोटात गुडगुड होत असते. आपली पचनक्रिया, खानपान, भूक, हार्मोन्समधील बदल, मानसिक ताण अशी अनेक कारणे यासाठी जबाबदार असतात.
आपण खाल्लेल्या अन्नावर पचनसंस्थेचे कार्य सुरू असल्याने पोटात गुडगुड होऊ लागते. कारण पचन प्रक्रियेत पोटातील अन्न, द्रव आणि गॅस्ट्रिक ज्यूस हे लहान आतड्यांमध्ये जात असते व त्यावेळी पोटात गुडगुड होते.
तसेच उपाशी राहिल्याने अधिक भूक लागल्यास शरीरातील हार्मोन्स आपल्या मेंदूला संदेश देतात की, तुमचे पोट आता पूर्णपणे रिकामे आहे आणि पोटात पुन्हा खाण्यासाठी जागा आहे. यावेळीही पोटात गुडगुड होऊ लागते. त्याचप्रमाणे काहीवेळा परीक्षेचा किंवा कामाचा ताण, भीती यामुळेही हार्मोन्सद्वारे मेंदूला गेलेल्या संदेशामुळे पोटात गुडगुड होते.
पोटात गुडगुड आवाज येणे याची कारणे –
खालील कारणांमुळे पोटात गुडगुड होत असते.
- लहान आतड्यात अन्नावर होणाऱ्या पचनप्रक्रियेमुळे,
- भरपेट जेवल्यामुळे,
- पचनास जड असणारे पदार्थ खाण्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित न झाल्याने,
- घाई गडबडीने जेवण खाण्यामुळे हवा
- पोटात गेल्यानेही पोटात गुडगुड होऊ लागते,
- अधिकवेळ उपाशी राहिल्याने भूक लागून पोटात गुडगुड होऊ लागते,
- जुलाब अतिसार यामुळेही पोटातून जास्त मोठा प्रमाणात गुडगुड होऊन पातळ शौचास होते.
- मानसिक ताण किंवा भीतीमुळेही पोटात गुडगुड होते.
पोटात गुडगुड होणे यावर उपाय –
1) पोटात गुडगुड होत असल्यास थोडे पाणी प्यावे.
पाणी पिण्यामुळे आतड्यातील अन्नावरील पचनप्रक्रियेला मदत होते व पोटातील गुडगुड कमी होते. पोटात गुडगुड होणे यावर हा उपाय फायदेशीर आहे.
2) एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे.
यामुळे पचनप्रक्रियेला अडचणी येतात. यापेक्षा दिवसातून चार ते पाच वेळा थोडे थोडे खावे. यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते. पचनप्रक्रिया सुलभ झाल्याने पोटात गुडगुड होत नाही.
3) अधिकवेळ उपाशी राहू नका.
अधिकवेळ उपाशी राहिल्याने भूक लागून आपले पोट गुडगुड करते. यासाठी वेळेवर जेवण घ्यावे.
4) जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावा.
भराभर जेवल्याने अन्न व्यवस्थित बारीक होत नाही तसेच यामुळे पोटात हवा शिरत असते. यामुळे मग पोटात गुडगुड सुरू होते. यासाठी जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावा. यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते तसेच जेवताना पोटात हवा जात नाही.
5) पचनास जड असणारे पदार्थ जास्त खाणे टाळावे.
पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाल्याने पचनक्रिया बिघडते. यासाठी तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार, हरभरा, मटार, बटाटा, कोबी इत्यादी जड पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. तसेच सोडा, बिअर आणि इतर कार्बोनेटेड पेये पिणे टाळावे. तसेच चहा-कॉफी वारंवार पिणे टाळावे.
या त्रासावर वरील घरगुती उपाय उपयुक्त ठरतात.
हे सुध्दा वाचा – पोटात गॅस होणे यावरील उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Stomach Growling causes and treatments. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.